somthing to read
आपली "ओळख' ठरते तरी कशी?http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5004945646123805889&SectionId=2&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF&NewsDate=20130705&Provider=-&NewsTitle=%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%80
मी त्याच्याहून जास्त शिकलेय, तरी केवळ जातीच्या
आधारे तो वरचढ ठरावा आणि त्याला मला नाकारायचा हक्क प्राप्त व्हावा? अनेक
प्रश्न मनात घोंगावू लागले. व्यक्ती म्हणून आपली ओळख तरी कोणती?
- मनस्विनी लता रवींद्र
आमचं
लग्न होणारच, असं मी गृहितच धरलं होतं. त्याच्या घरी मी जायचे. अनेकदा.
फक्त फर्मली सगळं बोलायचं बाकी आहे बास. एक दिवस तो हसत-हसत म्हणाला, "अगं,
काल बाबांनी विचारलं, की तुझी जात काय आहे? मला काही पडलेली नाही गं, पण
लग्न म्हटल्यावर विचारलं जातंच ना... काय गं काय जात तुझी?' मला त्या
प्रश्नाचं काहीच नाही वाटलं खरंतर. मी सरळ सांगितलं, "अरे, मी दलित आहे.
तुला माहीत नव्हतं का?' त्याचा चेहरा खर्रकन उतरला. "तुला बघून वाटत नाही,'
असं तो म्हणाला. मला राग आला खरंतर. मला बघून वाटत नाही म्हणजे? आपल्या
बोलण्या-चालण्यावर लिहिलेलं असतं का, आपली जात कोणती ते? आणि बोलणं,
रीतीभाती वेगळ्या म्हणजे त्या कमी दर्जाच्या, हे कोणी ठरवलं? मला कळायचं
होतं ते कळलं. त्यानंतर इकडतिकडच्या गोष्टी बोलून तो निघाला, या विषयाला
सरळ टांग देत.

नंतर
त्याचा मोबाईल आला. त्यानं सुरवातच अशी केली, "आय लव्ह यू, पण... पण मला
वाटतं, की हे नाही शक्य. मी माझ्या आई-बाबांना कसं समजावू? ते जुन्या
विचारांचे आहेत. तू मला आधी कधीच का बोलली नाहीस. आपल्या आयुष्याचा प्रश्न
होता. तू तुझी जात लपवलीस वगैरे... आपण थांबू.' मी सगळं ऐकून घेतलं आणि
त्याला म्हटलं, "उद्या बोलू. आता मी कामात आहे.' मला खूप रडायला वगैरे आलं.
सगळ्या जुन्या आठवणी. मी जात कधीच लपवली नाही. पण जात इतकी महत्त्वाची
असते, हे मला माहीतच नव्हतं. लहान असताना आई-बाबांनी इतकंच शिकवलं,
"तुमच्या शिक्षणावरून, तुमच्या गुणवत्तेवरून तुमचा दर्जा ठरतो. तुमच्या
हुशारीनं, वाचनानं, अभ्यासानं तुमचं व्यक्तिमत्त्व खुलतं.' मला
लहानपणापासून पुस्तकं मिळाली. आमच्या घरात देव्हारा नव्हता, कुठल्या
रीतीभाती नव्हत्या, अंधश्रद्धा नव्हत्या. "या देवाला नवस केला तर हे
मिळेल', अशी देवाला लाच देणं नव्हतं. त्यामुळे मला कधीच आपली जात-धर्म याचा
न्यूनगंड आलाच नाही. मोठी होत गेले, तसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा
फुले, शाहू महाराज यांच्याबद्दल वाचनात आलं आणि मी कोणाला बिलॉंग करते हे
कळलं. आपली परंपरा, आपला वारसा हा किती मोठा आहे, वैचारिक आहे, याचा सल
वाटावं असं काहीच नव्हतं. उलट अभिमानच वाटत आला मला.
माझ्या
आई-वडिलांनी माझ्यासाठी "रिझर्व्हेशन' घेतलं नाही. खूप उत्तम परिस्थिती
होती असं नसलं, तरी ते माझ्या शिक्षणाचा खर्च करू शकत होते. पण जे
"रिझर्व्हेशन' घेतात ते का घेतात, हे मात्र सांगितलं. अनेक वर्षं
जातीयतेच्या उतरंडीत सतत उपेक्षा ज्यांच्या वाट्याला आली आहे, त्यांना समान
हक्क प्राप्त व्हायला बराच काळ जावा लागणार. तरी मी आईला म्हणायचे, "अगं,
पण ज्यांना परवडतं ते का घेतात "रिझर्व्हेशन?' आई म्हणायची, "अगं,
हजारो-लाखो लोकांना ज्या कायद्यानं फायदा होणार आहे, त्यात शे-दोनशे लोकं
त्यांचा फायदा करून घेतात, म्हणजे ती काही प्रातिनिधिक माणसं ठरत नाहीत.
वरच्या जातीत कित्येक लोकांना केवळ त्यांच्या जातीच्या जोरावर कितीतरी
दालनं उघडी होतात. ऑफिशिअली, अनऑफिशिअली. केवळ नाव ऐकून ही माणसं जातीनं
वरची आहेत म्हणजे बुद्धिमत्तेनंही सरसच असतील, असं मानलं जातं. पण आपल्याला
ते सिद्ध करावं लागतं ना.' पण मला वाटायचं, की "नाही, आता समाज बदललाय.
आमची पिढी तरी इतकं सरसकट नाही बघत. आम्हाला नाही फरक पडत आमच्या
मित्र-मैत्रिणींमध्ये कोण खालच्या जातीचा आणि कोण वरच्या.' मी भांडत होते
आई-बाबांशी. पण आज जेव्हा माझ्या आयुष्यात असं घडलं, खाडकन कोणीतरी
पाण्याचा शिपकारे मारून गाढ झोपेतून जागं केल्यासारखं वाटलं मला.
माझा
मित्र, सहचर, हमसफर हमनजर म्हणवणारा दोस्त- जो "ब्लॅक लिटरेचर'वर गप्पा
झोडतो आणि समांतर सिनेमाची दर दोन मिनिटांनी उदाहरणं देतो, "कसं जग बदलायला
पाहिजे', असे पुरोगामी म्हणावेत अशी वक्तव्यं करत राहतो- तो मुलगा आज माझी
जात कळल्यावर असा कसा रिऍक्ट झाला? काय फरक आहे त्याच्यात आणि माझ्यात?
आणि आपल्याला काय माहीत कोणाच्या कुठल्या संकरातून आपले पूर्वज जन्माला आले
आहेत. सगळे हिशेब काढायचेत का आता? मग त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर
पवित्र असू आपण? मी त्याच्याहून जास्त शिकलेय, तरी केवळ जातीच्या आधारे तो
वरचढ ठरावा, आणि त्याला मला नाकारायचा हक्क प्राप्त व्हावा? अजून कुठलंही
कारण असतं ना, तर मी एक वेळ सहन करू शकले असते; पण हे? आपण ओळखण्यात चुकलो.
मी शांत व्हायला पेपर उघडला. उगीच सकाळी वाचायच्या राहून गेलेल्या बातम्या
चाळू लागले, तर एक आख्खी पुरवणी विवाहोत्सुकांची. "वर अडतीस, शिक्षण
एमबीए, अपेक्षा - गोरी, कमावती, तिशीच्या आतली वधू हवी. एससी-एसटी
क्षमस्व.' बापरे! अजून काही वाचूच नये असं वाटलं.
अंगावर गार गार
पाणी घेतलं आणि म्हणतात ना, पूर्वी आमची सावली पडली, तरी हे लोक अंघोळ
करायचे, तशी मी अंघोळ करून टाकली आणि शुचिर्भूत झाले आणि गाढ झोपून गेले.
सकाळी उठून मी त्याच्या आई-वडिलांना फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती
सांगितली आणि म्हटलं, "आमचा लग्नाचा विचार होता; पण आता मला ते शक्य नाही
होणार. कारण तुमच्या मुलाचे विचार ऐकून मला त्याच्यासोबत आयुष्य काढणं अवघड
वाटतंय. तो आत्ताच इतका घाबरलाय तर पुढे तो कशी साथ देईल मला?' त्याची आई
म्हणाली, "मी समजू शकते. अगं मी दलित नसले, तरी यांच्यापेक्षा खालच्याच
जातीतली होते आणि त्याबद्दल आयुष्यभर ऐकावं लागलंय मला. त्यामुळे तू हा
निर्णय का घेतला असशील हे मला कळू शकतं. फक्त इतकंच सांगते- कोणी चुकलं
म्हणून त्यांचा दुःस्वास करू नकोस. सोडून दे. आणि हो सासर म्हणून नसलं, तरी
हे घर तुझ्यासाठी कायम उघडं आहे.' मला खूप छान वाटलं मोकळं-मोकळं. जगात
सगळंच निराशाजनक नाहीये... असं काहीतरी... खरंच गोष्टी बदलतील. हळूहळू का
होईना, पण नक्कीच...
--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.
Assistant Professor,
University Department of Physics,
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile -
9869197376e-mail:
che...@physics.mu.ac.in che...@mu.ac.in