करार

करार

चर्चच्या घड्याळात रात्री दोनचे टोले पडले, आणि फादर केंड्रीक दचकुन जागे झाले. अशा परिस्थितीतही आपला खुर्चीत बसल्या बसल्या डोळा लागला याचा विस्मय वाटुन ते मनाशीच वरमले. समोर पलंगावर अंगाची मुटकुळी करून झोपलेल्या भारत्याकडे, आठ वर्षांच्या त्या निरागस बालकाकडे बघुन त्यांच्या भावना अनावर झाल्या.

त्यांनी त्याच्या कपाळावरील कापडाची सुकून गेलेली घडी काढली, पाण्यात भिजवुन, थोडी पिळुन पुन्हा त्याच्या कपाळावर ठेवली. भारत्याचा रक्तस्त्राव आता थांबला होता, पण अजुनही ताप अजिबात उतरला नव्हता.

त्यांनी चिंताग्रस्त नजरेने एकदा घड्याळाकडे पाहिले. आज ते एकटेच होते, बाकीची मंडळी पहाटे परततील बायबल वनशिबीरातुन.  'तोपर्यंत काही...' मनात येणारे विचार त्यांनी कसेबसे बाजुला सारले.

आज तसे विशेष काहीच घडले नव्हते, नेहेमीप्रमाणेच ते डोंगरापलिकडच्या अनेक दुर्गम पाड्यांपैकी एका अस्पर्शीत वस्तीवर सकाळी सकाळी पोहोचले होते. तिथेच डबक्यात डुंबणार्‍या भारत्यावर त्यांची नजर पडली होती. पाणीदार डोळ्यांच, कुरळ्या केसांच ते चुणचुणीत पोरग त्यांना फार आवडल. 'याला देवाच्या शाळेत घालतो, शिकुन माझ्यासारखा मोठा करतो, तीन वेळेला खायला प्यायला देतो, याला पाठवा माझ्याबरोबर' ते त्याच्या मायेला म्हणाले होते. 'तीन वेळा ?' भारत्याचे आणि त्याच्या खंगलेल्या मायेचे डोळे लकाकले होते, 'पन ह्याचा बा पाय मोडुन बसलाय, हाच काम करतो जंगलात. ह्याला पाठवला तर आता आमाला खायला...' फादरनी पिशवीतून गोड्या तेलाची बाटली आणि पन्नास रुपये काढले. दहाव्या मिनिटाला ते भारत्याबरोबर परतीची वाट चालू लागले होते.

आता ते आठवताना 'आपण घाई केली, वीस रुपयात काम झाले असते' असे वाटुन ते थोडे खजील झाले. पण देवाच्या दरबारी एवढा रुपया पैशांचा विचार कशाला असे त्यांनी स्वत:ला समजावले. शिवाय एका बाप्तीस्म्याबद्दल मिशनकडून मिळणार्‍या बाराशे डॉलर्समधुन हा खर्च भागवणे अवघड नव्हते.

'बाप्तीस्मा रजिस्टरमध्ये नोंद करायची राहिलीच आहे', त्यांच्या लक्षात आले.  'पण एकदा तहसिल कार्यालयात रजिस्टर पाठवले की पोलिस येतील, भारत्याला प्रश्न विचारतील. आता नकोच ते, जरा आठ दिवसांनी सरावला की बघुया' असे म्हणुन हाही विचार त्यांनी बाजुला सारला आणि त्यांचे लक्ष पुन्हा भारत्याकडे वळले.

झोपेतही वेदनेच्या साम्राज्यातून त्याची सुटका झाली नव्हती.  फादरचे डोळे आसवांनी भरून आले. 'जगणे हाच वेदना सोसण्याचा करार आहे', त्यांच्या मनात शब्द उमटले. एवढेच तर लहान होते ते प्रथम इकडे आले तेंव्हा. दुसर्‍या दिवशी ओक्साबोक्षी रडणार्‍या त्यांचा चेहेरा पास्टर दयालनी हाताच्या ओंजळीत घेतला होता, त्यांना क्रॉससमोर नेले होते आणि त्यांना ख्रिस्ताने सहन केलेल्या वेदना कथन केल्या होत्या. 'मानवाच्या मुक्तीसाठी वेदना आणि मृत्यूच्या कराराला कवटाळले होते येशूने. मग तूही किंचीतश्या वेदनेचा हा पवित्र करार स्वीकारणे, आणि नंतर त्यातील सुखाचा साक्षात्कार करुन घेणे हेच योग्य आहे', पास्टर दयाल म्हणाले होते. ते त्यांना तेंव्हा कळले नव्हते, पण त्यांना देवाला नाराज करायचे नव्हते. नंतर खरच त्यातील सुख समजू लागले आणि पिढ्यानुपिढ्या लाखो चर्चमध्ये चालत आलेला हा वारसा ते पुढे चालवू लागले होते.

चर्चच्या घड्याळात तीनचे टोले पडले आणि फादर पुन्हा भानावर आले. त्यांनी आपले डोळे पुसले. समोर पलंगावर अंगाची मुटकुळी करून झोपलेल्या आठ वर्षांच्या त्या निरागस बालकाकडे बघुन त्यांच्या भावना पुन्हा अनावर झाल्या...आणि फादर केंड्रीकनी पुन्हा एकदा आपले कपडे उतरवण्यास सुरूवात केली.

 

 ( सत्य घटनांवर आधारीत )