* * ------------सगळीकडे हे असेच चालते...------------ *"सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार?" *हे वाक्य मी जवळपास सगळीकडे ऐकतो. लोकलमध्ये, मित्रांत बोलताना, कार्यालयात, सगळीकडे... *काय होते? *१."/अरे यार, बसमधून येताना जर तिकिट मागितले नाही तर ४ ऐवजी ३ रुपयांत काम होते. १ रु. वाचविला की नाही? "/ २. रस्त्यावर माझी चूक असल्याने (मी सिग्नल तोडला किंवा नो पार्किंगला गाडी लावली तर) अर्थात मला वाहतूक पोलिस पकडतील. (नाही पकडले तर सुटलो). मग काय .. दंडाचे ४०० रू. देण्यापेक्षा त्यालाच ५० रू देऊन मामला निकालात काढायचा. ३. काहीतरी विकत घेऊन खाल्ले किंवा घरातीलच काही वस्तू खाण्यासाठी नेली. खाल्ल्यानंतर कचरा काय केला? तर रस्त्यावरच टाकला. लोकलमध्ये असेल तर खिडकीतून बाहेर टाकला. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ना साफ करायला. *परिणाम?* १. जर मी तिकीट मागितले नाही तर माझे १/२ रु. वाचले. पण मी दिलेले ३ रुपये कुठे जातील? अर्थात वाहकाच्या खिशात. (त्याला मिळाले तर त्याचाच फायदा आहे ना? हे मला मिळालेले उत्तर) ते पैसे सरकार कडे जातात का? नाही. २. मी ५० रू दिले. तेही गेले. अर्थात पोलिसाच्या खिशात. माझे ३५० रू वाचले. ३. जर नाही कचरा साफ झाला, किंवा पावसाळ्यात पाणी तुंबले, तर आपण त्यांना शिव्या देऊन मोकळे. लोकांना त्याबद्दल सांगितले तर उत्तर काय? "सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार? आपण आपला फायदा बघावा" *मी काय करतो?* १. मी तर स्वतः तिकीट मागून घेतो. जाऊ दे माझा एक रुपया जास्त. शेवटी तोच दर ठरविण्यात आला आहे ना? आणि जर तिकिट तपासनीसाने तिकीट विचारले तर काय? तो वाहक येणार आहे का सांगायला? २. मी एकदा ४०० रू दिले तर मला एक धडा मिळेल ना? पुढे मी जे ५०/५० रू. त्याला देईन ते तर वाचतील ना? ३. मी काहीही रस्त्यावर फेकत नाही. स्वतःजवळील एका पिशवीत ते जमा करतो. मग कचऱ्याची पेटी दिसली तर त्यात फेकतो किंवा घरी कचऱ्याच्या डब्यात. अशा भरपूर गोष्टी आहेत जिथे आपण फक्त आपला फायदा बघतो. का आपण फक्त आपला फायदा बघावा? जर तुम्ही स्वतःच्या फायद्याकरीता समाजाची चाल बिघडवीत नाहीत का? "आपण एकटे काय करणार ?" असे म्हणणे ही पळवाट नाही का? मला सध्या दूरदर्शन वर दाखविण्यात येणारी एक जाहीरात खूप आवडली. एका गृहसंकुलात खूप कचरा जमा झालेला असतो. शेवटी तेथील लहान मुले पुढाकार घेऊन तो कचरा साफ करतात. तिथेही एका मुलापासून सुरुवात दाखविली आहे. */हे आपण प्रत्यक्षात नाही का करू शकत?/* मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी - मनोगत : आस्वाद विवाद संवाद *