मी काय केले

एकदा पुणे-मुंबई प्रवासामधे घडलेली गोष्ट. आरक्षण असलेल्या डब्यामधे माझी खिडकीजवळची जागा होती, तर माझ्या शेजारी एक मध्यमवयीन गृहस्थ बसले होते. वेळ सकाळची होती. गाडीतील कर्मचारी सकाळच्या नाश्त्याची ऑर्डर घेण्यासाठी आल्यावर माझ्याप्रमाणे शेजारील गृहस्थांनीही नाश्त्याची ऑर्डर दिली. खाऊन झाल्यावर त्या गृहस्थांनी हात लांब करून नाश्ता बांधून आलेली पिशवी आणि त्याबरोबरचे कागद खिडकीतून बाहेर भिरकावले. मी मात्र ते कागद नाश्ता बांधून आलेल्या पिशवीत घालून ती पिशवी माझ्याजवळच ठेवली. ते गृहस्थ हे बघत होते. नन्तर आम्ही दोघांनी ही कॉफि मागवली. ती पिऊन झाल्यावर मी कॉफीचा थेर्माकोल चा कप आधिच्याच पिशवीत घातला आणि ती पिशवी गाडीतील बेसीनखाली असणाऱ्या कचरापेटीमधे टाकण्यासाठी उठले. जाता जाता त्या गृहस्थांना मी म्हटले "तुमची कॉफी पिऊन झाली असल्यास तुमचा कपही मी कचरापेटीत टाकेन." त्यांनी त्यांचा कपही मला दिला व मी सर्व कचरा कचरापेटीत टाकून आले. त्या गृहस्थांव्यतिरिक्त आजूबाजूला बसलेल्यांनीही हा प्रसंग पाहिला. त्यातून त्यांनी बोध घेतला असल्यास उत्तमच. कृतीने दाखवणे हा उत्तम उपाय आहे असे मी मानते.

मात्र त्याबरोबरच दिसलेली आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की, मी कचरापेटीत कचरा टाकायला गेले तेव्हा ती कचरापेटी ओसं डून वहात होती. कचरापेटीत जागाच नसेल तरीही तिथे कचरा कोण टाकेल? मी तसाच खुपसून टाकला, मात्र प्रत्येकजण असे करेल का? कचरापेट्यांची संख्या व आकार हा त्या डब्यातून प्रवास करू शकणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार असायला नको का? मात्र रेल्वे प्रशासन पुरेशा संख्येने व पुरेशा आकाराच्या कचरापेट्या गाड्यांमधे पुरवत नसेल व त्या वेळोवेळी रिकाम्याही केल्या जात नसतील तर प्रवाशांकडून स्वच्छतेची अपेक्षा तरी कशी करावी?