ज्ञानेश्वरांचे मत

राधिका

चांगला विषय उपस्थित केला आहेस. पण हे अध्यात्मशास्त्र नाही, यातुविद्या आहे.

द्वारकानाथ, आपले म्हणणे योग्य आहे. ज्ञानेश्वरांचे मत सांगतो. अतिशय सुंदर विवेचन आहे. ज्ञानेश्वरी अध्याय ९, ओव्या ३०७- ३३४. 

गीतेतल्या ९ व्या अध्यायातील २० आणि २१ व्या श्लोकावर भाष्य आहे. ते एकूण तीन भागात आहे.

पहिल्या भागात ओव्या ३०७ - ३१७ मध्ये यज्ञ करून मिळालेले स्वर्गसुख हे नरकासमान असून परमात्म्याची प्राप्ती हे शुद्ध सुख असे सांगितले आहे.

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयंते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान् देवभोगान् ॥ २० ॥

देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी ।
विधीमार्गा कसवटी । आपणचि होती ॥ ३०७ ॥

ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो.

यजन करता कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके ।
क्रिया फळेसी उभी ठाके । पुढां जाया ॥ ३०८ ॥

ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचे स्वरूप ।
तिहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिले देखें ॥ ३०९ ॥

सोमप- सोमरसपान करणारे

जे श्रुतित्रयातें जाणोनि । शतवरी यज्ञ करूनि ।
यजिलिया मातें चुकोनि । स्वर्गु वरिती ॥ ३१० ॥

मातें - मला (श्रीकृष्णाला, परमात्म्याला), चुकोनि- सोडून

जैसें कल्पतरुतळवटीं । बैसोनि झोळिये पाडी गांठी ।
मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करूं ॥ ३११ ॥

झोळिये- भीक मागण्याच्या झोळीला, निदैव - दुर्दैवी

तैसें शतक्रतूं यजिले मातें । की ईप्सिताति स्वर्गसुखांतें ।
आता पुण्य की हें निरुतें । पाप नोहे ॥ ३१२ ॥

निरुतें- खरोखर

म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु ।
ज्ञानिये तयाते उपसर्गु । हानि म्हणती ॥ ३१३ ॥

एऱ्हवीं तरी नरकींचे दुःख । पावोनि स्वर्गा मान कीं सुख ।
वांचूनि नित्यानंद गा निर्दोष । तें स्वरूप माझें ॥ ३१४ ॥

मज येता पैं सुभटा । या द्विविध गा अव्हांटा ।
स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५ ॥

सुभटा- अर्जुना, अव्हांटा- आडवाटा

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येईजे । पापात्मकें पापें नरका जाईजे ।
मग मातें जेणें पाविजे । ते शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥

आणि मजचिमाजीं असतां । जेणे मी दूरी होय पांडुसुता ।
तें पुण्य ऐसे म्हणता । जीभ न तुटे काई ॥ ३१७ ॥

दुसऱ्या भागात ओव्या ३१८ - ३२७ मध्ये स्वर्गाचे वर्णन आहे.

परि हें असो आतां अप्रस्तुत । ऐकें यापरी ते दीक्षित ।
यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥

मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे ।
तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥३१९ ॥

लाधलेनि- लाभलेल्या, सौरसें - योग्यतेने

जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखे वाहन ।
राजधानीभुवन । अमरावती ॥ ३२० ॥

जेथ महासिद्धींची भांडारें । अमृताची कोठारें ।
जियें गांवीं खिल्लारें । कामधेनूंची ॥ ३२१ ॥

जेथ वोळगे देव पाइका । सैंघ चिंतामणिचिया भूमिका ।
विनोदवनवाटिका । सुरतरूंचिया ॥ ३२२ ॥

वोळगे देव पाइका - देवांचे समुदाय चाकर होऊन सेवा करतात, सैंघ- जिकडेतिकडे, भूमिका- जमिनी, विनोदवनवाटिका । सुरतरूंचिया - करमणुकीकरता कल्पवृक्षांचे बगीचे आहेत

गंघर्वगान गाणीं । जेथ रंभेऐशिया नाचणिया ।
उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥ ३२३ ॥

नाचणिया- नर्तकी, अंतौरिया- (विलासासाठीच्या) स्त्रियांमधील (मुख्य)

मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांबरें ।
पवना ऐसें म्हाणयारें । धावणे जेथ ॥ ३२४ ॥

वोळगे- सेवा करतो, शेजारें - शय्यागृहात, शिंपे सांबरें - अमृतकिरणांनी सडासंमार्जन, पवना ऐसें म्हाणयारें । धावणे जेथ - वाऱ्यासारखा चपळ जासूद म्हटलेले काम करावयास तयार असतो

पैं बृहस्पती आपण । ऐसे स्वस्तिश्रियेचे ब्राह्मण ।
ताटियेचे सुरगण । विकार जेथ ॥३२५ ॥

स्वस्तिश्रियेचे- अशीर्वाद देणारे आणि कल्याण करणारे, ताटियेचे - पंगतीला

लोकपाळरांगेचे । राऊत जिये पदींचे ।
उचैःश्रवा खांचे । खोलणिये ॥ ३२६ ॥

 (जिथले) राऊत - घोडेस्वार, लोकपाळरांगेचे- पूर्वादि दिशांच्याइंद्रादिक स्वामीच्या (बरोबरीचे आहेत), उचैःश्रवा - इंद्राच्या घोड्यचे नाव, खांचे- चालतो, खोलणिये  - पुढे

हें बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे ।
ते भोगिजति जंव असे । पुण्यलेशु ॥ ३२७ ॥

तिसरा आणि climax भाग म्हणजे ओव्या ३२८-३३४. यात पुण्य संपल्यावर हे लोक पृथ्वीवर येतात ते सांगितले आहे.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥

मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेचि इंद्रपणाची उटी उतरे ।
येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥ ३२८ ॥

पाउटी - साठा

जैसा वेश्याभोगी कवडा वेचें । आणि दारही न चेपूं न ये तियेचें ।
तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे । काय सांगों ॥ ३२९ ॥

कवडा- पैसे, संपत्ती, वेचें- संपवतो

एवं थितिया माते चुकले । जिहीं पुण्ये स्वर्ग कामिले ।
तया अमरपण तें वावों जालें । आतां मृत्युलोकु ॥ ३३० ॥

वावों- व्यर्थ

मातेचिया उदरकुहरीं । पचुनि विष्ठेचां दाथरीं ।
उकडुनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥

अगा स्वप्नी निधान फावे । परि चेइलिया हारपे ।
तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥

निधान - खजिना, फावे- प्राप्त होतो, चेइलिया हारपे - जाग आल्यावर नाहीसा होतो

अर्जुना वेदु जऱ्ही जाहला । तरी मातें नेणतां वायां गेला ।
कणु सांडुनि उपणिला । कोंडा जैसा ॥ ३३३ ॥

म्हणऊनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म कारण ।
आतां मातें जाणोन कांही नेण । तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥

विनायक