डिझायनर्स आयटम - मुथय्या मुरलीधरन

3 views
Skip to first unread message

Vaibhav Gaikwad

unread,
Aug 10, 2010, 10:59:47 PM8/10/10
to vgga...@googlegroups.com, Group TYIF

Vaibhav Gaikwad's Blog!!!



डिझायनर्स आयटम - मुथय्या मुरलीधरन

Posted: 09 Aug 2010 09:01 PM PDT

मुरलीधरनचं क्रिकेटच्या इतिहासातलं ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान क्रिकेट अस्तित्वात असेपर्यंत अबाधित राहणार आहे. दुसरा मुरली मला अशक्य वाटतोय. कारण परमेश्वर असे डिझायनर्स आयटम शतकात एकदाच तयार करतो. - द्वारकानाथ संझगिरी

‘‘स्वप्नवत निवृत्ती’’ कशाला म्हणायचं हा माझ्यापुढे प्रश्न होता. मुथय्या मुरलीधरनच्या निवृत्तीने मला त्याचं उत्तर मिळालंय.
निव्वळ कल्पनेतूनही निवृत्तीची पटकथा इतकी सुंदर जमली नसती. नियतीच्या लेखणीतून उतरलेली ही स्क्रिप्ट केवढी मस्त होती. ह्या स्क्रिप्टमधून उतरलेल्या दृष्यांना जेवढा सत्यजीत रेसारख्या दिग्दर्शकाच्या वास्तव्याचा स्पर्श होता, तेवढाच शेवट हा एखाद्या कमर्शियल सिनेमासारखा होता. नायक जिंकला. शेवटी त्याला नायिका मिळाली. साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण झाली. मुळात आठशेचा टप्पा गाठण्यासाठी आठ बळी शिल्लक असताना, ही शेवटची कसोटी असं जाहीर करणं एखाद्यालाच जमलं असतं. श्रीलंका मुरलीधरनच्या कसोटी निवृत्तीकडे डोळे लावून बसलीए असं चित्र नव्हतं. उलट अचानक हा देशाच्या डोळ्यात पाणी का आणतोय हेच कळत नव्हतं. मोठमोठे खेळाडू विक्रमासाठी लाचार होताना पाहिले आहेत. रिचर्ड हेडलीच्या विक्रमाकडे जाताना कपिलदेवला लागलेली धाप मला अजून ऐकू येतेय. ती वेळ अशी होती की, कपिलदेव चेंडूबरोबर धावला असता तर कपिलदेव आधी आणि मग चेंडू स्टंपजवळ पोहोचला असता. मुरलीधरन हा अख्खा मोसम खेळला असता तरी कुणी बोललं नसतं. किंबहुना त्याने उडवलेली ढोणीची दांडी किंवा युवराजची दोन्ही डावातली विकेट काढताना टाकलेले चेंडू पाहिल्यावर वाटलं की हा माणूस का कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होतोय? बरं त्याने जागा निवडली गॉल! कॅन्डी हे स्वत:चं घर नाही; पण त्यालाही कारण असावे. कारण त्याची गोलंदाजी जगातल्या फलंदाजांना सुनामीसारखी ह्याच मैदानावर भासली होती. आणि त्या अस्मानीच्या सुनामीत गॉल उद्ध्वस्त झाल्यावर तिथेच मुरलीधरनने समाजसेवेचं पहिलं वामनी पाऊल टाकलं होतं. हजार घरं पुन्हा वसवणं हे वामनी पाऊलच म्हटलं पाहिजे. बरं समोर संघ कसोटी क्रमवारीत जगात अव्वल क्रमांकाचा. भारत नावाचा सख्खा शेजारी. भारताची फलंदाजी जगात सर्वश्रेष्ठ! निदान कागदावर तरी. पहिल्या सहापैकी चार फलंदाजांची कसोटी सरासरी पन्नासच्या पुढे. त्यातला एक जगातला सर्वात संहारक फलंदाज (सेहवाग). दुसरा म्हणजे हिरकणी बुरुज, सर करायला कठीण (द्रविड). एक जगतमान्य जगातला सवरेत्कृष्ट फलंदाज (सचिन तेंडुलकर. हे नाव लिहिलेच पाहिजे का?). एकाच्या फलंदाजाच्या शैलीकडे पाहिल्यावर असं वाटतं की फलंदाजी ही सौंदर्य स्पर्धा असती तर त्याची फलंदाजी ‘मिस वर्ल्ड’ ठरली असती असा व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण! आणि ही सर्व मंडळी भारत नावाच्या फिरकी गोलंदाजीच्या माहेरघरात जन्मलेली, वाढलेली, बागडलेली आणि मोठी झालेली.
आणि तरी मुरलीधरनला आठ बळींचं आव्हान स्वीकारावंसं वाटलं. की, त्याला ८०० ह्या आकडय़ाचं आकर्षणच नव्हतं? असं असूच शकत नाही. पण मला वाटतं की, मुरलीधरनला शरीराने सांगितलं होतं की, पाच दिवसाचं कसोटी क्रिकेटच्या डावात ३०-३५ षटकं टाकणं थांबायला हवं तरच पुढे वनडे आणि टी-२० खेळता येईल. कारण आज पैसे तिथेच आहेत. हीच शरीराची व्यथा ऐकून ब्रेट ली, फ्लिन्टॉप, शेन वॉर्नने आपली कसोटी कारकीर्द थांबवली होती. गोलंदाजांच्या नशिबी फलंदाजांपेक्षा नेहमीच जास्त कष्ट असतात आणि तुम्ही संघाचे प्रमुख गोलंदाज असाल तर कष्ट हे गोलंदाजीचं दुसरं नाव असतं. गॉल हे त्याच्या गोलंदाजीच्या दृष्टीनेही तीर्थक्षेत्र बनवणं ही मुरलीधरनची भावना असावी.

पण काय शेवट झाला! पहिल्या डावात त्याने पाच बळी घेतले. क्रिकेटमध्ये गोलंदाजाचे पाच बळी फलंदाजाच्या शतकाच्या बरोबरीने मानले जातात. थोडक्यात ही गोष्ट फलंदाजाने शतक ठोकण्यासारखं होतं. त्यानंतर दुसऱ्या डावात ती आठशेवी विकेट काढताना नियतीने त्याला झगडायला लावलं. शेवटी नियतीनेही तरुण पिढीला दाखवायचं ठरवलं की, तुमच्याकडे गुणवत्ता कितीही असो, तुमचा इतिहास कितीही देदीप्यमान असो, पण ७९९ बळी घेतल्यावर क्रिकेटमध्ये एका बळीसाठीही झगडावं लागतं आणि तेही समोर १० आणि ११ क्रमांकाचा फलंदाज असताना. हा नियतीने दिलेला संदेश ही क्रिकेटची खासियत आणि धमाल आहे आणि म्हणून क्रिकेटच्या विक्रमांना एक वेगळं वलय आहे. पण नियतीच्या मनात मुरलीधरनला अप्रूप ठेवायचं नव्हतं. त्याला विकेट दिली. चांगल्या चेंडूवर दिली. त्या चेंडूवर झेल उडवतानाही तो जयवर्धने ह्या श्रीलंकेच्या सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे जाईल, असं त्याने पाहिलं. गवतातून चतुर पकडावा तसा त्याने झेल पकडला आणि एवढं सर्व झाल्यावर त्याच्या विक्रमाला विजयाचं ठसठशीत कुंकू लागेल हेही त्याने पाहिलं.
सर्वच जण मुरलीधरनसारखे नशीबवान नसतात. एवढा मोठा सर डॉन ब्रॅडमन, पण ह्या कसोटीनंतर निवृत्त होणार हे जाहीर केल्यावर नियती त्याच्याशी किती क्रूरपणे वागली! कुठल्याही फलंदाजाने शतक ठोकलं की त्याची कसोटी सरासरी वाढते. ब्रॅडमन हा असा एकमेव फलंदाज होता की फक्त शतक ठोकलं तर त्याची कसोटी सरासरी कमी व्हायची. (हा जोक नाही हं!) पण त्याला शतकी सरासरीसाठी फक्त चार धावा कमी पडल्या. शेवटच्या कसोटीत ब्रॅडमन शून्यावर बाद झाला. विचार करा, ब्रॅडमनसाठी चार धावा काय होत्या? मुकेश किंवा अनिल अंबानीसाठी चार लाख असतील तसे! (मी अंबानीला गरीब केलं नाही ना? मध्यमवर्गीय माणूस ह्यापेक्षा काय कल्पना करू शकणार?) पण ऐनवेळी ह्या चार धावा ब्रॅडमनला मिळाल्या नाहीत. त्या कसोटीत दुसरा डावही मिळाला नाही. त्याची सरासरी ९९.९४ अशीच राहिली. मी नेहमी म्हणतो की नियतीने ते ०.०६चं तीट ब्रॅडमनच्या सरासरीला लावलं. त्या सरासरीला दृष्ट लागू नये म्हणून! नाही लागणार कधी दृष्ट त्या सरासरीला, पण तशी दृष्ट मुरलीधरनच्या ८०० बळींनाही लागणं कठीण आहे, पण नियतीला त्याची दृष्ट काढावीशी वाटली नाही.
पण खरंच मुरलीधरनच्या ८०० बळींना दृष्ट लागून कोण एक तरी पाऊल पुढे टाकेल? पुढच्या २५ कसोटी हरभजनसिंग फक्त झिम्बाब्वे आणि बांगलादेशबरोबर खेळला तरी दृष्ट लागणार नाही. कारण त्या ८०० च्या वाटेच्या निम्म्यावरही कुणी नाही. मुरलीधरनने वारसदार म्हणून ज्या हरभजनसिंगचं नाव घेतलं तो ३५० च्या आसपास आहे आणि पुढे पळणं जाऊ देत, तो असा चालतोय की अपघातातून उठलेल्या माणसाने कुबडय़ांवर चालावं. हरभजनला विकेट मिळाली तर काही तरी रोमहर्षक घडलंय असं वाटतं. मुळात गोलंदाजाला फिटनेस टिकवणं फार कठीण असतं. त्यात आज गोलंदाजांसमोर अनेक पर्याय असतात, वनडे आणि टी-२० यात मिळणाऱ्या पैशांमुळे. ह्यापुढे कसोटीत कमी पैशात कितीजणं घाम गाळायला तयार होतील देव जाणे. सिनेमात खोऱ्याने पैसे मिळाल्यावर नाटकाची नाइट स्वीट डिशसुद्धा वाटत नाही. तसंच हे आहे. १९६४ साली जेव्हा फ्रेडी ट्रुमनने ३०० बळींचा टप्पा ओलांडला तेव्हा रिची बेनॉ म्हणाला होता, हा विक्रम मोडणारा गोलंदाज जन्माला येईल असं वाटत नाही. रिची बेनॉ आजही जिवंत आहे. फक्त तीनशेचाच नाही तर पुढे चारशे, पाचशे, सहाशे, सातशेचाही पल्ला ओलांडला गेला. कसोटी सामने इतके वाढतील असं तेव्हा कुणाला वाटलं होतं? पण आज घडय़ाळाचे काटे उलटे फिरतील असं वाटतंय. निदान ह्या क्षणी तरी त्यामुळेच मुरलीधरनचे ८०० बळी हे एव्हरेस्ट ठरेल असं वाटतंय. उद्या एखादा भूकंप झाला आणि एव्हरेस्ट मिटलं तर भाग वेगळा. पण माझ्या हयातीत घडेल? कठीण वाटतंय. बरं ज्या काळात फ्रेडी ट्रमनने ३००चा टप्पा ओलांडला तेव्हा निदान खेळपट्टय़ा कव्हर होत नव्हत्या. इंग्लंडमध्ये पाऊस पडला की गोलंदाजांसाठी नंदनवन निर्माण व्हायचं. आज बऱ्याच गोष्टी गोलंदाजांच्या विरोधात आहेत. खेळपट्टय़ा कव्हर केलेल्या असतात. त्या बऱ्याचदा पवारांनी काहीही झालं तरी प्रफुल्ल पटेलची बाजू घ्यावी तशी फलंदाजांची बाजू घेताना दिसतात. बऱ्याच देशांमध्ये सीमारेषाही पूर्वीपेक्षा छोटय़ा झाल्या आहेत. बॅट्सची क्वालिटी अशी वाढलीए की टायमिंग चुकलेला फटकाही षटकार ठरू शकतो. फलंदाजी इतकी सोपी झालीए की पन्नासच्या वरची सरासरी ही अचंबित करणारी गोष्ट राहिली नाही. वीसच्या वर शतकं कित्येक फलंदाज मिरवतात. पण अशा काळात कुंबळे काय, वॉर्न काय किंवा मुरली काय, ह्यांनी ६००, ७०० आणि ८०० चा टप्पा ओलांडणं ही ग्रेट गोष्ट आहे.
मी आकडेवारीत रमणारा माणूस नाही. बऱ्याचदा आकडेवारी फलंदाज किंवा गोलंदाजाचं खरं माहात्म्य सांगतेच असं नाही. आकडेवारी मुश्ताक अलीच्या फुटवर्कचं मोठेपण सांगू शकत नाही. ती सी. के. नायडूंचं वलय दाखवू शकत नाही किंवा डावखुऱ्या फ्रॅंक वूलीच्या फलंदाजीतलं सौंदर्य उलगडून दाखवू शकत नाही. पण बऱ्याचदा ती दर्जाचा घंटानादही करते. फलंदाजीत ब्रॅडमनच्या दर्जाचा घंटानाद हा क्रिकेट जिवंत आहे तोपर्यंत क्रिकेटरसिकांच्या कानात घुमत राहणार आणि गोलंदाजीत नि:संशयपणे मुरलीधरनच्या दर्जाचा घंटानाद सूर्यचंद्र असेपर्यंत लताच्या आवाजाप्रमाणे गोड लागत राहणार. त्याची विकेट्सची आकडेवारी ‘भयानक’ हे विशेषण कौतुकाने वापरावं एवढी छाती दडपून टाकणारी आहे. एका डावात दहा बळी (जिमी लेकर आणि अनिल कुंबळे) आणि दोन्ही डावांत मिळून १९ बळी हे दोन महान विक्रम सोडले तर गोलंदाजीतले अनेक मोठे विक्रम काखोटीला मारून मुरलीधरन निवृत्त झालाय. बाकी जाऊ देत, मुरलीधरनने ६७ वेळा एका डावात पाच बळी घेतले आहेत आणि २२ वेळा दोन्ही डावात मिळून १० बळी! दुसऱ्या भाषेत, त्याने ६७ शतकं ठोकली आहेत आणि २२ वेळा दोन्ही डावांत शतकं ठोकली आहेत किंवा मोघमपणे द्विशतकं ठोकली आहेत असं म्हणावं लागेल. सर डॉन ब्रॅडमनने ५२ कसोटीत २९ शतकं ठोकली होती. ब्रॅडमनला जर मुरलीधरन एवढे कसोटी सामने मिळाले असते तर त्याने मुरलीधरनसारखा विक्रम शतकांच्या हिशेबात केला असता. आणि ब्रॅडमनच्या काळात झिम्बाब्वे, बांगलादेश असते तर ब्रॅडमनने काय केलं असतं तर त्याला ‘प्रलय’ हा एकमेव शब्द आहे. असो. म्हणूनच मुरलीधरनची आकडेवारी किंवा विक्रमाच्या बाबतीत तुलना ब्रॅडमनशी होऊ शकते.

मुरलीधरनची अ‍ॅक्शन मुलखावेगळी होती. त्यामुळेच त्याबद्दल संशय व्यक्त केला गेला. ऑफ स्पिनर सर्वसाधारणपणे बोटाने चेंडू वळवतो. मुरलीधरन हा मनगटाने प्रामुख्याने ऑफ ब्रेक टाकणारा क्रिकेटच्या इतिहासातला एकमेव ऑफ स्पिनर होता. त्याचा उजवा हात थोडा वाकडा असल्यामुळे तो चेंडू फेकतो असा आभास होई.पण मुरलीधरन हा फक्त आकडेवारी किंवा विक्रमाने मोठा झालेला गोलंदाज नाही. तो काय किंवा शेन वॉर्न काय, ह्यांनी फिरकीच्या कलेचं पुनरुज्जीवन केलंच, पण ती कला सर्वोच्च स्तरावर नेऊन ठेवली. अर्थात, त्यांची तुलना क्रिकेटच्या इतिहासातल्या महान गोलंदाजांशी होतच राहील. एखादा सर गॅरी सोबर्स ठामपणे म्हणेल, ''Warne may be latest but Subhash Gupte was greatest'' आणि आपणही कॉलर टाइट करू. ऑस्ट्रेलियातही एखाद्याला ग्रिमॅट ओरायली वॉर्नपेक्षा मोठे वाटतील. जिमी लेकर (स्वर्गातून) किंवा प्रसन्ना बंगलोरमधून मुरलीधरनच्या अ‍ॅक्शनला नाक मुरडेल. पण ही महान मंडळीही कबूल करतील की, वॉर्न-मुरलीधरन आणि आपला कुंबळे ह्यांचं कार्य ऐतिहासिक आहे. कारण वनडेच्या भरभराटीनंतर वनडे क्रिकेट हे फिरकी गोलंदाजीच्या अंतिम क्रियाकर्माचं सामान आहे, असं मानलं गेलं. भारताची फिरकी परंपरा एवढी मोठी! मंकड-गुप्ते-गुलाम अहमद-प्रसन्ना-बेदी-चंद्रा-वेंकट- दोशीने फुलवलेली. पण त्या बागेत अस्सल फिरकीची फुलं येईनात. बटाटावडेवाला यांत्रिकपणे तेलात वडे सोडतो, तसे चेंडू सोडणारे फिरकी गोलंदाज तयार व्हायला लागले. फिरकीच्या महान परंपरेनंतरचा पहिला वडेवाला रवी शास्त्री. मग वडेवाले निर्माण व्हायला लागले किंवा कपिलदेवने आणलेल्या क्रांतीनंतर मध्यमगती गोलंदाज. ही भारताची अवस्था. तर इतरत्र परिस्थिती बिकट होती. चौहान-राजू-हिरवाणी वगैरे मंडळींनी त्यांच्यासाठी बनवलेल्या खेळपट्टय़ांवर विकेट काढल्या, पण बाहेर डाळ शिजली नाही.
या पाश्र्वभूमीवर मुरली-वॉर्नचं कार्य पाहायला हवं.
मुरलीधरनला मी प्रथम जवळून पाहिलं १९९३ साली. श्रीलंकेला श्रीलंकेत आपण त्या वेळी १-० असं हरवलं होतं. त्यानंतर ह्या क्षणापर्यंत आपण श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका श्रीलंकेत जिंकलेली नाही. त्या दौऱ्यात जाणवला त्याचा तो भलामोठा टर्न, त्याची गोलंदाजीची वेगळी अ‍ॅक्शन आणि शैली, त्याचं ते चेंडूला उंची देणं, त्याच्या गोलंदाजीतला ‘लूप’. तो काळ असा होता की त्या काळात चेंडूला चांगली उंची देणारा, लूप असणारा फिरकी गोलंदाज शोधणं हे दीपिका पडुकोणचा स्टेडी बॉयफ्रेंड शोधण्यासारखं होतं. (दीपिका पडुकोणचा बॉयफ्रेंड सकाळी एक असतो आणि संध्याकाळी दुसरा. ती प्रकाश पडुकोणची मुलगी आहे एवढंच तिच्याकडे एक शाश्वत नातं आहे. बाकी सर्व अशाश्वत नाती.) बरं त्याआधी दीड शतक वेस्ट इंडिजचे गोलंदाज जगभर धुमाकूळ घालत होते. त्यामुळे वेगवान गोलंदाजी हे जिंकण्याचं एकमेव चलती नाणं आहे अशी समजूत क्रिकेटजगात रूढ होत होती. तसा पाकिस्तानकडे दाखवायला एखादा अब्दुल कादीर होता. कुंबळेचा उदय झाला होता. त्याचं वेगळेपण जगाला जाणवलं होतं, पण कुंबळे हा अस्सल फिरकी गोलंदाज कुठे होता? ज्या दिवशी त्याचा चेंडू वळेल त्या दिवशी भारतभर सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असं गंमतीत म्हटलं जायचं. कुंबळेला दुसरं काही म्हणता येत नाही म्हणून फिरकी गोलंदाज म्हणायचं. शेन वॉर्न मोठा टर्न घेऊन पाळण्यातून बाहेर पडला होता. पण कोवळा सचिन आणि रवी शास्त्रीने त्याला १९९२ साली सिडनी कसोटीत शतकं ठोकताना असा हाणला की हे पाळण्यातले पाय वामनाचे आहेत आणि ते क्रिकेटचे तिन्ही लोक व्यापणार असं दिसलं नव्हतं, आणि हो, ‘दुसरा’ ह्या शब्दाचा जन्मही झाला नव्हता. कारण सकलेन मुश्ताकला ‘दुसरा’ तोपर्यंत सापडत नाहीत. केवळ मोठय़ा टर्नने मोठे फलंदाज सापडला नाही. त्यांना बाद करण्यासाठी गोलंदाजीत विविधता लागली. ही विविधता मुरलीधरनच्या गोलंदाजीत साधारण १९९७-९८ नंतर आली. तोपर्यंत तो यशस्वी होत नव्हता असं नाही. इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, झिम्बावे वगैरेचे फलंदाज त्याची शिकार होत होते. त्याने श्रीलंकेला इंग्लडमध्ये ओव्हलवर १६ बळी घेऊन मोठा विजयही मिळवून दिला. पण त्याने प्रथम सरळ जाणारा चेंडू डेव्हलप केला आणि मग लेग ब्रेकसारखा वळणारा ‘दुसरा’. तिथून मुरलीधरन अनप्लेयेबल झाला. म्हणजे मोठे मोठे भारतीय फलंदाज त्याचा चेंडू पडल्यावर कुठे वळणार आहे हे छातीठोकपणे सांगू शकत नव्हते. जगातल्या दोन फलंदाजांना स्वत: मुरलीधरन मानतो. एक सचिन, दुसरा लारा. ह्या काळात सचिनने स्वतचा खेळ बदलला होता. त्याची पाठदुखी, मग त्याचा तो टेनिस एल्बो. ह्या दुखण्यानंतर सचिनने स्वीप, पॅडलसारखे फटके डेव्हलप करून फिरकीविरुद्ध यष्टीमागे धावा जमवण्याचा जास्त प्रयत्न केला. दुखापतीमुळे त्याच्या काही फटक्यांवर विशेषत: रॉकेटसारख्या ड्राईव्हजवर मर्यादा आल्यावर सचिनने हे नवीन ऑप्शन्स शोधले. पण लाराचं मुरलीधरनच्या गोलंदाजीवर प्रभुत्व हे वेगळं होतं. लारा त्याला पुढे सरसावत बऱ्याचदा थेट भिडला. अनेकदा स्वतचा तंबू सोडून मुरलीधरनच्या तंबूत जाऊन भिडला. एका मालिकेत वेस्ट इंडिजने श्रीलंकेत, श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटीच्या मालिकेत ३-० असा मार खाल्ला. मुरलीधरनने ती मालिका श्रीलंकेला एकहाती जिंकून दिली. त्या मालिकेत लाराने सहा डावांत सहाशेच्या वर धावा केल्या. सचिनने अशीच ट्रीटमेंट त्याच्या तारुण्यात शेन वॉर्नला दिली होती. मुरलीधरनने फक्त कसोटी सामने गाजवले नाहीत. वनडे गाजवली. तिथेही तो शिखरावर राहिला. तिथे त्याची दहा षटकं ही प्रतिस्पध्र्यासाठी फारशी जोखीम न घेता खेळून काढण्याची षटकं होती. आणि श्रीलंकेसाठी ब्रेकथ्रू मिळवण्याची. शेनवॉर्नप्रमाणेच मुरलीधरन वनडेत विनिंग गोलंदाज म्हणून खेळला. मुरली आणि शेन वॉर्नची तुलना ही अटळ होती. त्यांच्यातली चुरस ही अटळ होती. एक लेगस्पिनर, दुसरा ऑफ स्पिनर. त्यात पुन्हा ऑस्ट्रेलियात मुरलीवर चेंडू फेकण्याचे आरोप झाले. त्याला थ्रोसाठी नोबॉल कॉल केलं गेलं. त्यामुळे ही चुरस फक्त चुरस नाही राहिली. ती लढाई वाटायला लागली. वॉर्नला गोऱ्या क्रिकेटजगाकडून सहानुभूती मिळायला लागली. काहींच म्हणणं होतं की, वॉर्नच्या वाटेला मुरली इतकी षटकं आली नाहीत. कारण ऑस्ट्रेलियाकडे मॅकग्रा, ब्रेट ली, गिलेस्पीसारखे गोलंदाज होते. पण आकडेवारीच्या गणितात हे बसत नाही. मुरलीधरनने वॉर्नपेक्षा साधारण ३३०० चेंडू जास्त नक्की टाकले! पण ९२ विकेटस्ही घेतल्या वॉर्नने कमी षटकात जास्त विकेटस् घेतल्या असं झालेलं नाही. उलट असं म्हणता येईल की, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हमखास वरच्या विकेटस् काढत. त्यामुळे वॉर्नचं काम सोपं होई. मुरलीला प्रतिस्पर्धी फलंदाजाचं डोकं, धड आणि पाय सर्व कापावं लागे.
मुरलीधरनची अ‍ॅक्शन मुलखावेगळी होती. त्यामुळेच त्याबद्दल संशय व्यक्त केला गेला. ऑफ स्पिनर सर्वसाधारणपणे बोटाने चेंडू वळवतो. मुरलीधरन हा मनगटाने प्रामुख्याने ऑफ ब्रेक टाकणारा क्रिकेटच्या इतिहासातला एकमेव ऑफ स्पिनर होता. त्याचं मनगट इतकं लवचिक होतं. त्याचा उजवा हात थोडा वाकडा असल्यामुळे तो चेंडू फेकतो असा आभास होई. मुरली चेंडू बोटापेक्षा मनगटाने वळवत असल्यामुळे तो भन्नाट वळायचा आणि तो उद्या काचेवरही वळवू शकेल असं वाटायचं.
मुळात ‘थ्रो’ चा नियम हा बदलायची वेळ आलीए. कारण तो गोंधळात टाकणारा आहे. त्या कायद्याने कुणालाही ‘थ्रो’च्या व्याख्येत बसवता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यावर असं जाणवलं की जगातले बरेच फलंदाज चेंडू फेकतात. पण ते डोळ्याला दिसत नाही. त्यांचे हात वळत असतात. कुणाचा २ अंश, कुणाचा १० अंश, कुणाचा पंधरा. मग आयसीसीने ठरवलं की, हा कोन १५ अंशाखाली असेल तर उघडय़ा डोळ्याला दिसत नाही. मुरलीधरनच्या हाताचा कोन हा पंधरा अंशांपेक्षा कमी आहे असं सर्टिफिकेट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात मुरलीधरनच्या तांत्रिक कसोटय़ा झाल्यावर सिद्ध झालं. अशा रीतीने आयसीसीने मुरलीच्या शर्टावरचे ‘थ्रो’चे डाग पुसले. पण मुरलीधरनवर आरोप होत राहिले, विशेषत: ‘दुसरा’ त्याचा लेग ब्रेकसारखा वळायला लागल्यावर. जे जे ऑफ स्पिनर दुसरा टाकतात, त्यांच्यावर आरोप होतो. सकलेन मुश्ताकवर झाला. आपल्या हरभजनसिंगवर झाला. त्यात मुरलीचा ‘दुसरा’ जास्त वळल्यावर बेदीसारख्या अनेक मंडळींनी त्यांच्यावर शरसंधान केलं. पूर्वीच्या ऑफ स्पिनरकडे फ्लोटर असायचा जो हवेतून बाहेर यायचा. काही ऑफ स्पिनर चेंडू मधूनच बाहेर कट करायचे. आज प्रसन्ना किंवा जॉन एम्बुरीप्रमाणे फ्लोटर टाकणारे ऑफ स्पिनर दिसत नाहीत. सकलेन मुश्ताकनंतर ऑफ स्पिनर फक्त ‘दुसरा’च्या मागे असतात. बेदीच्या शरसंधानाला खेळत असताना मुरलीधरनने कधी उलट उत्तर दिलं नाही मग निवृत्त झाल्यावर मुरली परवा बेदीच्या उंची दिलेल्या चेंडूला का स्टेपआऊट झाला हे मला कळलं नाही. बेदीचे बोबडे बोल त्याने अन्नुलेखाने मारायला हवे होते. कारण त्याला जगाने सॅल्युट ठोकला होता. त्यात शेन वॉर्न, स्टीव्ह वॉ हे त्याच्या ‘शत्रुराष्ट्रातल्या’ खेळाडूंनी ठोकलं होतं. बेदीच्या सॅल्युटची गरज कुठे होती त्याला? बरं त्यापेक्षा वाईट म्हणजे त्याने बेदीच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित केला. विकेट्स किंवा धावांवर फक्त गोलंदाज किंवा फलंदाजाचा दर्जा ठरत नाही. बेदीला कमी कसोटी सामने खेळायला मिळाले हे त्याचं दुर्दैव. बरं, बेदीच्या गोलंदाजीला, सर्टिफिकेट देण्याएवढी मुरलीने त्याची गोलंदाजी कुठल्या जाणत्या वयात पाहिली आहे? की रांगायला लागल्यापासून जाणतेपण मुरलीला अवगत होतं? मी एकच गोष्ट बेदीबद्दल म्हणेन, बेदी जर महान फिरकी गोलंदाज नसेल तर महानता कशी असते हे मला कळलेलं नाही. बेदीचं मुरलीबद्दलचं मत मला पटत नाही. बेदीची बकबक माझ्या डोक्यात जाते, पण म्हणून बेदीचं गोलंदाज म्हणून महानपण त्याच्याकडमून हिरावून घेता येत नाही. दुर्योधन दुष्ट असला तरी तो सवरेत्कृष्ट गदाधारी होता हे भीमालासुद्धा नाकारता येत नव्हतं. म्हणून तर कृष्णाला दुर्योधनाला मारण्यासाठी कपट करावं लागलं.
आणि ज्या मुरलीने हे आरोप खेळताना धैर्याने हाताळले आणि आपला तोल ढळू न देता लढला, त्याने आता का फिकीर करावी? त्या वेळी त्याचा कर्णधार, त्याचा अख्खा संघ खरं तर त्याचा संपूर्ण देश त्याच्यापाठी उभा राहिला. मुरलीधरन तामीळ. तिथल्या सिंहली-तामीळ वादाने देश उलखवून टाकणारे तामीळ अतिरेकी निर्माण केले. तिथे तामीळ मुरली देशाचा हिरो झाला. मुरलीधरन शापित कर्ण असेल, पण संपूर्ण देश त्याचं कवचकुंडल बनला. संपूर्ण देशाने चेंडू फेकल्याच्या आरोपाच्या दलदलीत अडकलेलं त्याचं चाक काढायला मदत केली आणि हा शापित कर्ण विजयी झाला. त्याने बेदीच्या कुत्सित बोलण्याकडे दुर्लक्ष करायला हवं. यापुढे करावं.
मुरलीधरनचं क्रिकेटच्या इतिहासातलं ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान क्रिकेट अस्तित्वात असेपर्यंत अबाधित राहणार आहे. त्याचे ते ८०० कसोटी बळी, त्याचे इतर विक्रम, त्याची लढाऊ वृत्ती, हे सर्व कुणीही पुसून टाकू शकणार नाही. दुसरा मुरली मला अशक्य वाटतोय. कारण परमेश्वर असे डिझायनर्स आयटम शतकात एकदाच तयार करतो.
dsan...@hotmail.com 


via Link

#################################################

हा लेख लोकप्रभाच्या १३ ऑगस्टच्या(?) अंकातून घेतलेला आहे. द्वारकानाथ संझगिरींचे लेख मला मुळातच आवडतात, त्यात हा तर साक्षात मुरलीधरन स्पेशल लेख. असे चांगले लेख आपल्याच भाषेतून वाचायला मिळणं हेच नशीब. शेअर न करणं अयोग्य झालं असतं. म्हणूनच हा आटापिटा. बाकी नंतर.....
- वैभव गायकवाड

Vaibhav Gaikwad's Blog

You are subscribed to email updates from Vaibhav Gaikwad's Blog
To stop receiving these emails, you may unsubscribe now.
Email delivery powered by Google
Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610
Reply all
Reply to author
Forward
0 new messages