एक अनुभव : माझाही

7 views
Skip to first unread message

Vaibhav Gaikwad

unread,
Jul 26, 2010, 6:25:05 AM7/26/10
to vgga...@googlegroups.com, Group TYIF

Vaibhav Gaikwad's Blog!!!



एक अनुभव : माझाही

Posted: 25 Jul 2010 12:36 AM PDT

२००५ च्या जुलैला मी ठाण्याला V.P.M.'s Polytechnic मध्ये तिसऱ्या वर्षाला होतो. आधीच Appendicitis च्या आजाराने हैराण, त्यात कावीळ, त्यात Second Year ची DBMS ची KT, अशी धडाक्यात सुरुवात झाली होती वर्षाला. ९ जुलैला मी दुपारी कॉलेज मधून अर्ध्या दिवसाने घरी आलो होतो. पोट तर दुखत होतंच, शिवाय शुक्रवार देखील होता. नुकत्याच
release झालेल्या 'सरकार' ची CD घरात पडली होती. शनिवारी कशाबद्दल तरी सुट्टी होती, आता लक्षात नाही. तशी कॉलेजला शनिवार सुट्टी असायची मी First Year ला होतो तेव्हा, नंतर ती दुसऱ्या-चौथ्या शनिवारवर आली, आणि मग कधी बंद झाली कोणाला कळलं ही नाही. Third Year पर्यंत तर आम्ही विसरून देखील गेलो ते. कावीळ detect झाल्याने नंतर पूर्ण दोन आठवडे मी घरातच होतो २३-२४ जुलैपर्यंत. २४ जुलै रविवार - डॉक्टरचं certificate नाही मिळालं म्हणून सोमवारीदेखील कॉलेजला दांडी. व्यवस्थित सगळी कागदपत्रे घेऊन मग मी दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो तो दिवस मंगळवार, २६ जुलै २००५.

तसा २३-२४ तारखेपासून पाऊस पडतच होता, २५ ला त्याचा जोर थोडा वाढलेला होता, पण लोकल्स चालू होत्या. लोकल्स आणि वीज मंडळ हे मुंबईमध्ये पावसाच्या मीटरचं काम करतात. किती पाऊस पडला तर लाईट जाण्यापासून ते अगदी लोकल्स बंद होईपर्यंत असा स्केल असतो. असो, मी कॉलेजला गेलो, पहिले तीन लेक्चर्स बसलो सव्वानऊ ते सव्वाबारा. सव्वाबारा ते एक असा पाऊण तास आमचा so-called लंच ब्रेक, त्यात मी ऑफिसमध्ये पाससाठी concession घ्यायला गेलो होतो. पस्तीस रुपये भरून मिळवलेलं जातीचं प्रमाणपत्र आतापर्यंत माझ्या फक्त इथेच कामाला यायचं. चांगलं 3/4th off concession मिळायचं. तिथे नुकतीच रुजू झालेली नवीन पोरगी चांगले २५-३० मिनिटे 'कल्याणचा पत्ता तर विठ्ठलवाडीचा पास कशाला?' चा वाद घालून शेवटी विठ्ठलवाडीपर्यंतच्या पाससाठी concession द्यायला तयार झाली आणि Principal नायकसरांची त्यावर सही घ्यायला त्यांच्या केबिनमध्ये गेली. तिथून परत आल्यावर तिने ते concession अक्षरशः माझ्या अंगावर फेकलं आणि गडबडीने आवरा-आवर करायला लागली. "काय झालं?", "अरे ट्रेन्स बंद झाल्यात आणि मी उल्हासनगरला राहते श्रीराम talkies च्या मागे ". मी असा भडकलो तिच्यावर, म्हटलं, " च्यायला! तिथेच राहतेस, तुला पत्त्यावरून कळत नाही, मला कल्याण जवळ पडेल कि विठ्ठलवाडी? इतका वेळ फालतूमध्ये वाद घालत होतीस." तितक्यात लक्षात आलं - अरे ट्रेन बंद, घरी जायचे वांदे. तसाच पळत क्लासरूमकडे आलो, एक वाजून १० मिनिटे झाली होती, JAVA चं मुखर्जी madam चं लेक्चर चालू झालं होतं कधीच. मला दारात बघूनच त्या बोलल्या,"आता बसू नाही देणार लेक्चरला", मी म्हटलं," कुणाला बसायचंय तेव्हा? मला माझी bag घेऊ द्या, मी जातो घरी, ट्रेन्स बंद झाल्यात आधीच". क्लास एकदम शांत झाला. bag घेतली, मित्रांना विचारलं काय करताय ते, येताय का माझ्यासोबत? अजिंक्य उठला लगेच मी येतो म्हणून, त्यामागोमाग शशांक, बोंडे आणि गवळीसुद्धा. "पण कसं जायचं?" म्हटलं पहिले इथून निघा, मग बघू. 


बाकीच्यांना कॉलेजच्या भरवशावर सोडून आम्ही निघालो. तेव्हा सुमारे दीड वाजले होते. पहिले स्टेशनला जाऊन inquiry केली की खरंच ट्रेन्स बंद झाल्यात का? एखादी special ट्रेन सोडणार आहेत काय? रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्वांना जागत शक्य तितक्या तुच्छतेने एकाने आम्हाला झिडकारलं - "अजिबात नाही, तुमचं तुम्ही बघा." बाजूला ST डेपोमध्ये विचारणा केली तर तिथेही नकार'घंटा'च. काम काही होत नव्हतं उगाच वेळ चालला होता. मग परत खाली CIDCO च्या bus-stop ला आलो. plan केला की इथून वाशीला जाऊ, तिथून दुसरी बस पकडून जाऊ कल्याण/डोंबिवलीला. तोपर्यंत जवळजवळ दोन वाजले होते. अवघ्या १०-१५ मिनिटांत वाशीची बस आली, अडीचला आम्ही तिथून निघालो असू. बोंडेचे चिक्कार non-sense jokes आणि त्यावर शशांकचे मोजकेच पण brilliant jokes मला आणि अजिंक्यला चांगलं हसत-खेळत ठेवत होते रस्त्यामध्ये. गवळीचं नेमकं काय चाललेलं असतं मला कधीच कळलं नाही, ना तेव्हा ना आता. रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाणी भरले होते, पण धमाल करत चाललो होतो आरामशीर. रस्त्याने दोन्ही बाजूंना पाणी भरून, दुकानांत/घरांत चाललं होतं. लोक गुडघाभर पाण्यातून जमेल तेवढं सामान उपसत होते. संपूर्ण रस्ता जवळ-जवळ असंच दृश्य होतं. आधीच तो ठाणे-बेलापूर रोड सुभान-अल्लाह, त्यात पावसाचं पाणी.... चार वाजले आम्हाला वाशीला पोहोचायला. 


Game Plan

वाशीला भावे नाट्यगृहासमोर जो बस डेपो आहे, तिथे उतरलो, पहिली चौकशी केली की कल्याण-डोंबिवली साठी काही बस सोडणार आहेत का? साडेचारची बस होती डोंबिवलीसाठी, जी तोपर्यंत तरी आली नव्हती. विचार केला की जर साडेचारपर्यंत थांबायचंच आहे, तर यांच्या बसने जायची काय गरज आहे. आमचे पिताश्री भारत पेट्रोलियममध्ये काम करतात, त्यांची बस via वाशी त्याच रस्त्याने कल्याणला जाते, त्यातून मी जाऊ शकतो. त्यांना फोन केला सेलवर आणि confirm केलं की पावणेपाचपर्यंत येतील ते वाशीला. तितक्यात ती डोंबिवलीला जाणारी बस आली. मित्रांना त्यात चढवलं, आणि मी मागे थांबलो पिताश्रींची वाट बघत. वेळ काढायला काही तरी म्हणून of course बाजूच्या हॉटेलात बसून मिसळ-पाव हाणली दोन प्लेट्स. पाच वाजले, साडेपाच झाले, सहा झाले.......बसचा काही पत्ता नाही, विचार केला बहुतेक कुठे तरी पाण्यात अडकले असावेत. फोन करायचा म्हटलं तर PCO वाल्याच्या line चे बारा वाजलेले.

मग plan B, कोपरखैराण्याला काका राहतात, त्यांच्या घरी जाऊन राहायचं. एका रिक्षावाल्याला थांबवलं, तो पण नेमका तिथेच राहणारा होता आणि धंदा गुंडाळून घरी चालला होता. वाशी बस डेपोपासून कोपरखैराण्यापर्यंत जाण्यासाठी १०० रुपये (WTF? एरवी वीसपण देणार नाही कोण, पण अडला हरी...) देण्यास तयार झाल्यावर आम्ही तिथून निघालो. मग ते पैसे वसूल व्हावेत म्हणून, पाणी भरलेले रस्ते चुकवत त्याने मला अख्खं वाशीदर्शन घडवलं आणि बोनकोडेमार्गे कोपरखैराण्याला आणून सोडलं, अगदी माझ्या काकाच्या बिल्डींगखाली. वर घरात गेलो तर काकी मला बघून हैराण. रोज ठाण्यावरून कल्याणला जाणारा (इथे अर्थ सरळमार्गी) माणूस इथे कोपरखैराण्याला कसा काय? असं वाटलं असावं बहुतेक. तिकडे गेल्यावर पहिल्यांदा अंघोळ केली, भिजलेले कपडे बदलले, आणि काकीने दिलेला चहा पीत पंख्याखाली बसलो. इतक्यात पिताश्रींचा फोन - "वैभव तिकडे आलाय का? वाशी बस डेपोला नव्हता". इथेच आहे म्हटल्यावर त्यांनी सांगितले, "त्याला बाहेर रस्त्यावर यायला सांग, आम्ही आता तिथे पोहोचतोच आहोत".

पटकन सगळं आवरून बाहेर आलो. दोन मिनिटांत पिताश्रींची बस तिथे आली. आत जाऊन बसलो - म्हटलं आता काही प्रॉब्लेम नाही, जाऊ घरी निवांत. पण अजून पिक्चर बराच बाकी होता. तिथून थोडं पुढे आम्ही महापेला गेलो व्यवस्थित. तिथून पुढे धीम्या चालणाऱ्या गाड्यांमुळे बऱ्यापैकी traffic होती. पुढे शिळफाट्याला आलो तर तिथे सगळ्या गाववाल्यांनी कल्याण/डोंबिवलीला नेण्यासाठी गाड्या काढल्या होत्या. तोंडाला येईल ती रक्कम सांगून असहाय्य लोकांना लुटायचा धंदा चालला होता. त्या गोंधळातून निघायला आम्हाला नऊ तिथेच वाजले. मग निवांत पाण्यातून रस्ता काढत साडेअकराच्या सुमारास आम्ही कल्याणला तीसगाव नाक्याला पोहोचलो. पुढचा रस्ता पोलिसांनी बंद केला होता, पाणी भरलेलं म्हणून.


इतका रस्ता आम्ही पायी चालत गेलो.
 आता ज्यांना तो भाग व्यवस्थित माहित आहे, त्यांना ह्या details नीट कळतील. कल्याण पूर्वेला लोकधारा नावाचं complex आहे एक, ज्याच्या बरोबर मध्यातून एक भले मोठे गटार जाते. ज्या ठिकाणी आम्ही उतरलो होतो, तिथे रस्त्यामुळे त्या गटाराचा आकार बराच निमुळता झालेला आहे, ज्यामुळे थोडा जास्त पाऊस झाला की ते गटार तुंबते आणि पाणी रस्त्यावर तसेच आजूबाजूच्या घरे/दुकानांत भरते. पण थोडं मागे जर लोकग्राम मधून गेले तर तिकडे पाणी तुंबण्याचा त्रास सहसा नसतो. आता २६ जुलैला तर 'न भूतो न भविष्यति' असा पाऊस पडला होता. कितीही आधुनिक तंत्रज्ञान असते, तरीही disaster management च्या अपेक्षित कक्षेच्या कितीतरी बाहेरचं काम होतं ते. मग दुसरा काहीच पर्याय उपलब्ध नसल्याने आमचे पिताश्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकग्राम through चालत पुढे जायचे ठरवले, त्यांच्यामागे पाय ओढत निघालो. रात्रीचे सुमारे बारा वाजले होते, आणि अंदाजे अडीच-तीन किलोमीटरचा रस्ता अजून चालत जायचे होते. पहिले गुडघ्याइतक्या, मग कमरेइतक्या तर नंतर छातीइतक्या पाण्यातून सावधानतेने रस्ता काढत काढत atleast आम्ही पाणी साठलेल्या भागातून तरी बाहेर पडलो. तिथून पुढे पाणी तर साठले नव्हते कुठे, पण दीड किलोमीटरचा उभा चढ चढत शेवटी आमच्या एरियात आलो. घरी पोहोचलो तेव्हा बरोबर दीड वाजले होते रात्रीचे.

कॉलेजमधून निघून बरोबर बारा तास झाले होते. घरात पाऊल टाकल्यावर आतापर्यंत टिकवून धरलेला सगळा जोर गळून पडला. आपण किती दमलो आहोत याचा अंदाज घ्यायला आतापर्यंत फुरसतच कुठे होती? मुळातच आजारी असल्याने weakness होताच, त्यात इतकी दगदग. मातोश्रींचा जीव भांड्यात पडला आम्हाला बघून, तोपर्यंत तिला काही कल्पनाच नव्हती की कोण कुठे आहे? btw आमच्या घरात असं उगाच काळजी करत बसायची पद्धत नाही, प्रत्येकजण आपापलं बघून घ्यायला समर्थ असल्याने ती तशी निश्चिंत होती.दिवसातून तिसऱ्यांदा अंघोळ करून जेवायला बसलो, तेव्हा मग सगळं रामायण ऐकवलं तिला.

चार दिवसांनी फोन चालू झाल्यावर मित्रांना फोन करून विचारलं तर त्यांनाही almost तितकाच वेळ लागला होता घरी पोहोचायला. जे कॉलेजच्या भरवशावर बसले त्यांना कॉलेजने साडेचारपर्यंत बसवून ठेवल्याचं कळलं. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव - कोणी कॉलेजमध्येच रात्र काढली, कोणी आजूबाजूच्या मित्रांकडे तर कोणी नातेवाईकांकडे. More specifically सांगायचं तर फक्त आम्ही पाचजणच आपल्या घरी पोहोचलो होतो, स्थानिक विद्यार्थी वगळले तर.

दोन आठवडे रेल्वे सेवा फुल-टू बंद, अख्खी मुंबई सुट्टीवर गेल्यासारखी.
भरपूर लोकांचं भरपूर नुकसान झालं, जे अपरिहार्य होतं...निसर्गाचा कोप शेवटी. आमचं कॉलेज देखील बंद होतं दोन आठवडे. मित्रांनी पुढे बऱ्याचदा ऐकवून दाखवलं...."दोन आठवड्यांनी कॉलेजला आला जेमतेम अर्धा दिवस, आणि परत दोन आठवड्यासाठी कॉलेज बंद पाडून गेला". ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हळू-हळू जनजीवन सुरळीत व्हायला लागलं. विधानसभेत विरोधकांनी विलासरावांना पळता भुई कमी केली होती disaster management चे धिंडवडे काढत, त्यांचं नशीब की मागोमाग अमेरिकेत आलेल्या कतरिना हरिकेनसमोर बुश प्रशासनाने हात टेकले आणि त्यांच्याकडे बोट दाखवत विलासरावांनी खुर्चीवर बुड कायम ठेवले. आज पाच वर्षानंतर सगळे आपापल्या नुकसानातून बऱ्यापैकी बाहेर आले असले, तरी २६ जुलैचा अनुभव आपल्या सगळ्यांना आयुष्यभर आठवण करून देत राहणार आहे....की चंद्रापर्यंत पोहोचला तरी निसर्गापुढे माणूस किती छोटा आहे!!!!!


वैभव गायकवाड



Share it, Comment it, Digg it

Vaibhav Gaikwad's Blog

You are subscribed to email updates from Vaibhav Gaikwad's Blog
To stop receiving these emails, you may unsubscribe now.
Email delivery powered by Google
Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610
Reply all
Reply to author
Forward
0 new messages