'मराठी तारका' जाणार गिनीज बुकात
सकाळ वृत्तसेवा
Friday, February 19, 2010 AT 12:15 AM (IST)
संतोष भिंगार्डे मुंबई
- मराठी चित्रपटांचे वारू वेगाने दौडत असताना... मराठी चित्रपट जागतिक
पातळीवर गौरविला जात असताना आता "मराठी तारकां'ची दखलही अख्ख्या जगाला
घ्यावी लागणार आहे. मराठीतील तब्बल 22 तारकांना घेऊन बनविलेला "मराठी
तारका' हा कार्यक्रम आता "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'मध्ये जाणार
आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नाही, तर मराठी प्रेक्षकांसाठी ही आणखी एक
गौरवाची बाब आहे.
मराठी चित्रपटसृष्टीला 75 वर्षे पूर्ण
झाल्यानिमित्त महेश टिळेकर यांनी "मराठी तारका' नावाचा कार्यक्रम दिवंगत
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या प्रोत्साहनामुळे आणला होता. मराठीतील
तारकांना एकत्रित करून मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचा त्यांनी एक प्रयत्न
केला. त्यांचा तो प्रयत्न भलताच यशस्वी ठरला आहे. केवळ महाराष्ट्रातच
नाही, तर दिल्लीतील राष्ट्रपती भवनातही हा कार्यक्रम झाला होता.
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्या वेळी मराठी तारकांचे कौतुक केले
होते. एवढ्या तारका आणि एकाच वेळी नृत्य करतात हे पाहून "लिम्का बुक ऑफ
वर्ल्ड रेकॉर्डस्'ने त्याची नोंद घेतली होती. आता हा कार्यक्रम "गिनीज
बुका'त जाणार आहे. कारण- आतापर्यंत असा प्रयोग कुणीही केलेला नव्हता, असा
दावा संयोजक व दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा आहे. अधिक माहिती देताना ते
म्हणाले, ""तसं पाहायला गेले, तर दोन महिला एकत्रित कधीही नांदू शकत
नाहीत. त्यांचे वारंवार खटके उडत असतात, असा गैरसमज आपल्याकडे रूढ आहे;
परंतु मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील तब्बल 20-22 तारका मनामध्ये कोणताही
इगो न बाळगता एकाच रंगमंचावर सादरीकरण करतात, ही मराठीसाठी अभिमानाची बाब
आहे. आतापर्यंत हिंदी-तमीळ-तेलगू चित्रपटसृष्टीत अशा प्रकारचा प्रयोग
कुणीही केला नव्हता; परंतु मराठीत आपण केलेल्या या प्रयोगाची दखल आता
"गिनीज बुका'ला घ्यावी लागणार आहे.
मराठी तारकांच्या
रौप्यमहोत्सवी प्रयोगाबद्दल श्री. टिळेकर म्हणाले, की हा प्रयोग नरिमन
पॉइंट येथील "यशवंतराव चव्हाण सेंटर'मध्ये 23 फेब्रुवारी रोजी पार पडणार
आहे. त्याला मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रसिद्ध
गायिका आशा भोसले आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत. "मराठी तारका'च्या
रौप्यमहोत्सवी प्रयोगात वर्षा उसगावकर, किशोरी अंबिये, रेशम टिपणीस,
क्रांती रेडकर, मधुरा वेलणकर, शर्वरी जमेनीस, स्मिता शेवाळे, आदिती भागवत,
किशोरी गोडबोले, सिया पाटील, मधुरा वेलणकर, मेघा घाडगे, गिरिजा ओक आदी
तारका सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे एकूणच या कार्यक्रमाची
लोकप्रियता पाहून हिंदीमधील सुधा चंद्रन व कश्मिरा शहा यांनीदेखील या
कार्यक्रमात सहभागी होण्याचे मान्य केले आहे.
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥