ऐतिहासिक कागदपत्रांचे
जतन - भास्कर धाटावकर
शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०
राज्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाची
कागदपत्रे, इतिहासकालीन पत्र
व्यवहार, शासन व्यवस्थेतले तसेच
लोकांच्या खाजगी संग्रहातले
महत्त्वाचे अभिलेख अशा अनेक
कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि
जतन राज्याचा पुराभिलेख विभाग
करीत असतो. १८२१ मध्ये स्थापन
झालेला पूरालेखागार विभागाने
शिवकालीन, पेशवेकालीन, ब्रिटीशकालीन
तसेच स्वातंत्र्य लढयातील व
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची
अनेक महत्त्वाची कागदपत्रे
जतन करुन ठेवली आहेत. परंतु, जतन
केलेल्या या कागदपत्रांचा उपयोग
कोणत्या कामासाठी होतो, तसंच
या विभागाचं काम नेमकं कसं चालतं,
पुराभिलेख विभागाचे कार्य आणि
महत्त्व याविषयी पुराभिलेख
विभागाचे संचालक डॉ. भास्कर
धाटावकर यांनी माहिती दिली.
प्रश्न:- पुराभिलेख म्हणजे नेमकं
काय?
उत्तर:- आमच्या विभागाच्या दृष्टीने
हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न
आहे. पुरा म्हणजे जुने आणि अभिलेख
म्हणजे कागदपत्रे. ज्या ठिकाणी
जुनी कागदपत्रे सुरक्षितरित्या
ठेवण्यात आली आहेत त्याला पुराभिलेख
विभाग असे म्हणतात.
प्रश्न:- या विभागाची स्थापना
केव्हा झाली?
उत्तर:- ब्रिटीश आपल्याकडे १६००
साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
करुन आले. सुरुवातीला त्यांचा
हेतू व्यापाराचा होता. १७५७
च्या प्लासीच्या युध्दानंतर
त्यांनी राजकीय मुहूर्तमेढीस
सुरुवात केली आणि या देशाचा
कारभार १८१८ ला संपूर्णपणे त्यांच्या
हातात घेतला. या प्रदीर्घ कालावधीमध्ये
जी कागदपत्रे निर्माण झाली होती
ती सुव्यवस्थितपणे ठेवण्याची
जबाबदारी त्यांची होती आणि त्या
दृष्टीकोनातून त्यांनी सुरुवातीला
कामचलाऊ यंत्रणा केली होती.
शेवटी १८८५ मध्ये त्यांनी एक
ठराव पास केला. पण तत्पूर्वै
त्यांनी सर्व प्रथम आपल्या देशामध्ये
१८१८ ला मद्रासमध्ये, १८१९ ला
कोलकत्यामध्ये आणि मुंबईमध्ये
१ सप्टेंबर १८२१ मध्ये पुराभिलेख
विभागाची स्थापना केली होती.
महाराष्ट्र शासनाचा हा सर्वात
जुना विभाग म्हणता येईल. आज त्याला
पुराभिलेख विभाग असे नांव दिलेले
आहे.
प्रश्न:- सध्या या विभागाचे काम
नेमके काय आहे.?
उत्तर:-अभिलेखाचे जतन करणे, संरक्षण
करणे, अप्रकाशित कागदपत्रांचे
प्रकाशन करणे आणि अजूनही ज्या
खाजगी व्यक्तींकडे कागदपत्रे
आहेत त्यांचे संपादन करणे म्हणजे
जतन, संरक्षण आणि संपादन ही पुराभिलेख
विभागाची कामे आहेत.
प्रश्न:- एवढया मोठया कालखंडामधली
ही सगळी कागदपत्रे आहेत. ती जतन
करून ठेवण्याची कोणती पद्धत
आहे. तसेच शासकीय पुरालेखागाराची
स्थानं कुठे आहेत आणि कुठल्या
प्रकारचे पुराभिलेख आपल्याकडे
आहेत?
उत्तर:- १६८७ मध्ये ब्रिटीशांनी
सुरतहून सत्ताकेंद्र मुंबईमध्ये
आणलं. तेंव्हापासून जी कागदपत्रं
निर्माण झाली, स्वातंत्र्य मिळेपर्यंत
ती सर्व कागदपत्रं मुंबईत ठेवली
अहेत. नंतर आमचा दुसरा जो भाग
आहे तो पुण्यामध्ये आहे. शिवकालाच्या
सुरुवातीपासून ते पेशवाईचा
अस्त होईपर्यंत जी जी कागदपत्रे
निर्माण झाली ती पुण्यामधे ठेवण्यात
आली आहेत. त्याला पूर्वीचे लोक
पेशवे दफ्तर असे म्हणत. आता आपण
त्याला पुणे पुरालेखागार किंवा
पुराभिलेख असे म्हणतो. त्याचबरोबर
मराठा राज्याची दुसरी शाखा कोल्हापूरला
झाली. ती ताराराणींनी सुरु केली.
सुरुवातीला त्यांची राजधानी
पन्हाळा गडावर होती. पुढे ती
कोल्हापूरमध्ये आली. राजर्षि
शाहू महाराजापासून ते देश स्वतंत्र
होईपर्यंत. त्याठिकाणी कोल्हापूरचे
पुराभिलेखागार निर्माण झालं.
मराठवाडा आणि विदर्भ, महाराष्ट्राच्या
निर्मितीनंतर महाराष्ट्रात
आले . या दोन ठिकाणी आमची पुराभिलेखागारं
नव्हती म्हणून शासनाने १९७१
ला मराठवाड्यासाठी औरंगाबाद
येथे आणि विदर्भासाठी नागपूर
या ठिकाणी पुरालेखागाराची स्थापना
केली. या सर्व ठिकाणी अतिशय महत्त्वाची
अशी कागदपत्रे ठेवण्यात आली
आहेत.
प्रश्न:- साधारण कोणत्या प्रकारची
कागदपत्रे आहेत?
उत्तर:- मुंबईचं म्हटलं तर ईस्ट
इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून
ते देश स्वतंत्र होईपर्यंत मुंबईची
जडणघडण कशी झाली, ही सात बेटं
कशी जोडली, दळणवळण रस्त्यांची
सुरुवात कशी झाली या प्रत्येक
घटनेची साक्ष देणारी कागदपत्रं
आपल्याकडे आहेत. इतकंच नव्हे
तर सर्वात महत्त्वाच्या कागदपत्राचा
उल्लेख करायचाच तर १८५८ ला राणीने
जो जाहीरनामा केला तो आमच्या
मुंबई पुरालेखा विभागामध्येच
आहे. महात्मा गांधी यांच्या
हस्ताक्षरांपासून पंडीत जवाहरलाल
नेहरु यांनी अहमदनगरच्या किल्ल्यातून
इंदिरा गांधींना जी पत्रं लिहिली
आणि ज्याचा उल्लेख 'डिस्कव्हरी
ऑफ इंडिया'मध्ये केला. ती कागदपत्रं
आपल्याकडे आहेत. सेनापती बापट,
सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर
सावरकर इतकंच नव्हे तर डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना
लिहिली त्याचे सर्व मसुद्याची
कागदपत्रं आपल्याकडे आहेत. चवदार
तळ्याचा त्यांनी जो दावा केला
ज्याला आपण संगर म्हणतो त्याचा
सुरुवातीचा दावा मोडीलिपीत
आहे. हायकोर्टातून ते जिंकल्यानंतर
म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत
चवदार तळ्याचा इतिहास सांगणारी
कागदपत्रं काही मोडी लिपीतील,
काही इंग्रजीमधील आपल्या मुंबई
पुराभिलेखागारांमध्ये आहेत.
राजश्री शाहू महाराज आणि डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये
झालेल्या पत्रव्यवहारही आपल्या
मुंबई पुरालेखागारामध्ये आहे.
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत
फडके यांचे सर्व पेपर्स आपल्याकडेच
आहेत. १८५७ चे युध्द फसल्यानंतर
महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्राच्या
सुपूत्राने वासुदेव बळवंत फडके
यांनी पहिला सशस्त्र लढा दिला
आहे. याच्यानंतर आपले उमाजी
नाईक आहेत. त्यांचे पेपर्स याठिकाणी
आहेत. असे अनेक क्रांतीकारकांचे,
स्वातंत्र्य सैनिकांचे पेपर्स
आहेत. काँग्रेसच्या स्थापनेची
सुध्दा कागदपत्रे आहेत. त्याच्या
अगोदर १८४४ ला बॉम्बे असोसिएशन
म्हणून एक संस्था स्थापन झाली
होती. ती काँग्रेसची पूर्वपिठीका
होती. तिथपासून लोकमान्य टिळक
असतील, आगरकर असतील, महात्मा
गांधी असतील किंवा त्यांचे अनुयायी
या सर्वांनी दिलेला लढा विशेषत:
क्विट इंडिया मुहमेन्टची, ही
सर्व महत्त्वाची कागदपत्रे
आपल्याकडे आहेत.
प्रश्न:- सामाजिक संस्था किंवा
शैक्षणिक संस्था याच्या विषयी
सुध्दा आपल्याकडे कागदपत्रे
आहेत का?
उत्तर:- हो आहेत. आता एक गोष्ट
आपण लक्षात घ्यायला पाहिजे की
इतिहास म्हटलं म्हणजे तो फक्त
राजकीय लढ्याचा इतिहास नाही.
ही कन्सेप्ट फार पूर्वी होती.
पण आता इतिहास म्हणजे तुमच्या
सामाजिक संस्थांचा इतिहास आहे,
आर्थिक इतिहास आहे. धार्मिक
इतिहास आहे, शैक्षणिक चळवळीचा
इतिहास आहे. शैक्षणिक संस्थांचा
इतिहास आहे, स्त्री शिक्षणाचा
इतिहास आहे. अनेक संस्थांचा
इतिहास त्या ठिकाणी आहे. थोडक्यात
मुंबई पुरालेखागार म्हणजे अजब
खजिना आहे.
प्रश्न:- या अभिलेखा व्यतिरिक्त
कोणते अभिलेख या शासकीय पुराभिलेखागारामध्ये
ठेवण्यात आले आहेत?
उत्तर- अभिलेख दोन प्रकारचे
असतात. ऐतिहासिक अभिलेख आणि
शासनाचे निर्माण होणारे अभिलेख
म्हणजे शासनाच्या एखादा धोरणात्मक
निर्णय असेल, एखाद्या पुलाची,
धरणांची किंवा महत्त्वकांक्षी
प्रकल्पाची निर्मिती असेल. या
योजनेच्या सुरुवातीपासून ते
ती योजना शेवटास जाईपर्यंत जी
कागदपत्रे निर्माण होतात ती
अ वर्गात येतात. ही आजची कागदपत्रे
उद्याच्या इतिहासाची साधने
होतात. मुंबई पुरालेखागारात
नुसती ऐतिहासिक कागदपत्रं नाहीत.
तर त्या ठिकाणी वृत्तपत्रे सुध्दा
आहेत. १८९७ ला बॉम्बे क्रॉनिकल
नावाचं एक वृत्तपत्र सुरु झाले
होते. त्याचा पहिला अंक आपल्याकडे
आहे. पहिलं वुत्तपत्र सुरु झालं
ते बाळशास्त्री जांभेकर याचं
दर्पण १८३२ साली . त्याची पहिली
प्रत आपल्याकडे आहे. त्याचा
अर्धा भाग मराठीत व अर्धा भाग
इंग्रजीत आहे. त्यामध्ये जाहिरातीही
आहेत. हा पहिला अंक सुध्दा पहाण्यासारखा
आहे. नंतर लोकमान्यांचा केसरी,
मराठा त्याठिकाणी आहे. महात्मा
गांधी यांनी सुरु केलेला हरिजनचा
अंक ठेवलेला आहे. वृत्तपत्राच्या
इतिहासावर पी.एचडीचा अभ्यास
करण्यासाठी अनेक अभ्यासक येत
असतात. आपली जुनी राजपत्रे, केंद्र
सरकारची आणि महाराष्ट्र शासनाची.
त्यांनी जे सेन्सेस सुरु केले
त्याचे सर्व रिपोर्ट आपल्याकडे
आहेत. इतकेच नव्हे तर भूगर्भ
शास्त्राचा त्यांनी केलेला
अभ्यास आहे, पाण्याचा स्त्रोत
कसा आहे कुठून कुठली नदी वाहते,
पाण्याचे झरे कुठून वाहतात त्याचा
सर्व सायंटीफिक अभ्यास करुन
ठेवला आहे. मुंबईतल्या ज्या
प्रसिध्द ब्रिटीशकालीन इमारती
आहेत, या सर्वांचे आराखडे, रेल्वेचे
नकाशे हे आपल्याकडे जवळजवळ ४०
हजार आहेत. सर्व प्रकारची अतिशय
दुर्मिळ कागदपत्रे आपल्याकडे
आहेत.
प्रश्न:- सर्वात जुना असा कागद
आपल्याकडे कोणत्या वर्षाचा
आहे.?
उत्तर:- मुंबई पुराभिलेखागारांत
१६३० सालचा सर्वात जुना कागद
आहे आणि देशात सर्वात जुना कागद
नॅशनल आर्क हाऊस, दिल्लीमध्ये
१३४८ चा आहे. त्यानंतर दोन नंबरचा
ज्याला आपण म्हणू तो अभिलेख
आपल्या मराठवाडा लेखागाराच्या
औरंगाबाद याठिकाणी १३९८ चा आहे.
त्याला आम्ही महजरनामा म्हणतो.
अतिशय इंटरेस्टिंग असे हे पेपर
आहेत. फारशी कागदपत्रे आहेत.
काही मोडी लिपीतली आहेत.
प्रश्न:- तुमच्या या विभागाने
मोडी लिपीच्या प्रसारासाठी
काही उपक्रम हाती घेतले आहेत.
त्या विषयी सांगाल का?
उत्तर:- आपल्या महाराष्ट्राचे
जे ऐतिहासिक दस्तावेज आहेत,
म्हणजे शिवकालापासून ते पेशवाईच्या
अंतापर्यंतचा इतिहास सांगणारं
ते सर्व मोडी भाषेत लिहिलेले
आहेत. इतकेच नव्हे तर १९६० पर्यंत
मोडी लिपीमध्ये आपण सर्व व्यवहार
करीत होतो. म्हणजे लोकांची लिहिण्याची
लिपी मोडीच होती. या मोडी लिपीचा
उगम १२ व्या शतकामध्ये हेमाडपंथीयांनी
केला. पण पुढे ज्ञानदेव कालीन
लिपी आली. शिवकालात तिचा प्रचार
आणि प्रसार झाला आणि पेशवाईत
तर ती बहरुन आली. पुढे या मोडी
लिपीचा वाचकवर्गच नष्ट झाला.
आणि मग ज्यांना मुलभूत संशोधन
करायचे आहे त्यांना मोडी लिपीचा
अभ्यास करणे आवश्यक होते. पण
शिकवणारी कुठलीही यंत्रणा नव्हती.
या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन
माझ्याकडे जेव्हा संचालक पदाचा
कार्यभार आला तेव्हा आमच्या
भारतीय ऐतिहासिक आयोगाचा एक
ठराव जो १९०० साली पास झाला होता
की, जुन्या लिपीचे पुनरुज्जीवन
करायचे. त्याचा आधार घेऊन शासनाच्या
मान्यतेनंतर आम्ही ३ डिसेंबर
२००३ रोजी विद्यमान मुख्यमंत्री
हे त्यावेळी संसदीय कार्यमंत्री
होते. त्यांच्या प्रोत्साहनाने
आम्ही हे वर्ग सुरु केले. मुंबईत
त्याचा पहिला वर्ग घेतला आणि
आतापर्यंत २८ जिल्ह्यातून आम्ही
३६ प्रशिक्षण वर्ग आयोजित केले.
जवळ जवळ ३६०० हून जास्त विद्यार्थी
यामध्ये सहभागी झाले. आम्ही
१० दिवसात २५ वाक्यांतून मोडी
लिपी लिहायला अणि वाचायला शिकवतो.
त्यासाठी आम्ही पुस्तकेही तयार
केली आहेत. हा एक उपक्रम आमच्या
पुराभिलेख विभागाला लोकाभिमुख
करण्यास ठरला आहे. आमच्याकडचा
मोडी लिपीचा वर्ग म्हणजे प्रौढ
साक्षरता वर्ग असतो. आमच्या
रायगडमध्ये मी जेव्हा वर्ग घेतला
तेव्हा एक ७५ वर्षांचे आजोबा
असायचे आणि त्यांची नात पण सोबत
असायची. कोकणामध्ये असे दृष्य
नेहमीच दिसायचे. शेवटचा आमचा
वर्ग भंडार्यात झाला तिथे ८६
विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
याच्यामध्ये फक्त इतिहासाचे
विद्यार्थी असतात अशातला भाग
नाही. वकील असतात, कॉलिग्राफीमध्ये
इंटरेस्ट असणारे लोक असतात.
ज्याला आवड आहे तो सवड काढून
येतो. लवकरच आम्ही महाराष्ट्राच्या
उर्वरित जिल्हयामधून प्रशिक्षण
वर्ग अयोजित करणार आहोत. इतकच
नव्हे तर जे कोणी अशा प्रकारचे
उपक्रम घेऊ इच्छितात त्यांना
आम्ही मदत करतो. आम्ही त्यांची
रितसर परीक्षा घेतो. त्यांना
प्रमाणपत्र देतो. त्यामुळे आताच्या
तरुण पिढीला आकर्षित करण्याची
फार मोठी संधी मिळाली आहे. एका
मोडी कागदपत्राचे भाषांतर केले.
तर त्याला १५० ते २०० रुपये सहज
मिळू शकतात.
'महान्यूज'मधील मजकूर
आपण 'महान्यूज'च्या
उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास
आम्हाला आनंदच वाटेल.
|