॥हरि ॐ॥
श्रीसाईसच्चरिताची महती सांगताना माझे सद्गुरु श्री अनिरुद्धसिंह (अनिरुद्धबापू) म्हणतात -
'साईसच्चरित हा ग्रंथ फक्त श्रीसाईनाथांचे चरित्र नसून श्रीसाईनाथांच्या सानिध्यात आलेल्या अनेक प्रकारच्या भक्तांनी सद्गुरु साईनाथांची कृपा कशी प्राप्त करून घेतली ह्याचा इतिहास आहे. हे साईभक्तांचेही चरित्र आहे, ज्याद्वारे आम्ही परमेश्वराची कृपा कशी संपादन करायची हे शिकू शकतो. श्रीसाईनाथांचा महिमा गाताना ’साईमहिम्या’च्या पहिल्याच ओवीत/चरणात बापू म्हणतात -
"साईनाथ माझा देव। साईनाथ माझा माव।
साईनाथ माझा साव। साईनाथ सद्गुरु॥"
१९९६ साली जेव्हा प्रथम उपासना चालू झाली तेव्हा बापू स्वत: उपासनेला बसायचे. कालांतराने
सुचितदादा उपासनेला बसू लागले. सर्व श्रद्धावानही त्यांच्याबरोबर हा साईमहिमा म्हणत
असत.
बापू सांगतात, साईनाथ माझा दिग्दर्शक गुरु आहे. आन्हिक’मधील ’अचिंत्यदानी’ स्तोत्रात साईनाथांना
प्रार्थना आहे -
’साईरामा तव शरणम्। कृपासिन्धो तव शरणम् ।
दिगंबरा दीनदयाळा। दिशादर्शका तव शरणम्॥’
’ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नम:’ व ’ॐ अभयदाता श्रीस्वामीसमर्थाय नम:’ हे तर बापूंच्या कार्याचे आद्यजप असून सुरुवातीपासूनच गुरुवारच्या उपासनेचा भाग आहेत.
कलियुगात भरकटलेल्या जीवाला हाच साईनाथ दिशा देऊ शकतो आणि देतो; परिस्थितीने गांजलेला संकटांनी त्रस्त झालेला मानव चुकीच्या मार्गावर जातो व त्यामुळे परमेश्वराचे प्रेम व कृपा मिळणे तर लांबच रहिले, त्याची परिस्थिती चक्रव्यूहात अडकल्यासारखी होते; आत जायचा मार्ग असतो, पण बाहेर पडण्याचा मार्ग मात्र त्याला दिसत नाही; आणि अशा परिस्थितीत भक्तिमार्गावर टाकलेलं एक पाऊल त्याला सर्व दु:खाच्या खाईतून बाहेर काढू शकतं. साईमहिम्यात बापू म्हणतात -
आधिव्याधी चिंतारोग। क्लेश ताप दु:ख भोग।
करिता तुझा नामयोग। नष्ट होती॥
साईंचे नाम भक्तिमार्गावर दृढ करणारे आहेच, ते तारक आहेच परंतु ह्या मार्गावरील वाटचाल मात्र ज्याची त्यालाच करायची आहे, ह्या मार्गावर प्रयास आणि पुरुषार्थ भक्तांनीच करायचा असतो. श्रीसाईसच्चरित आम्हाला हा भक्तिमार्ग समजून देतं, भक्ति कशी करावी हे शिकवतं आणि हे शिकवता शिकवता आमची भक्तिही वाढवत नेतं.
भक्तिमार्गावरील ही वाटचाल अधिक सहजसोपी व्हावी म्हणून बापू हिंदीतून श्रीसाईसच्चरितावर आधारित प्रवचनं तर करतातच, शिवाय त्यांनी सुरू केलेली पंचशील परीक्षाही श्रीसाईसच्चरितावरच आधारित असून, त्यामागील हेतू - ’हा ग्रंथ अभ्यासण्याच्या निमित्ताने त्यावर मनन-चिंतन घडावे व त्यातील साईभक्तांचे आचरण, त्यांची मूल्ये आपल्याला सहज आत्मसात करता यावीत’ हा आहे.
हा श्रीसाईसच्चरिताचा फोरम प्रत्येक श्रद्धावानाला त्याला साईनाथांची शिकवण समजून घेऊन आचरणात आणण्यास मदत करेल, असा मला विश्वास वाटतो. या फोरममध्ये या श्रीसाईसच्चरिताशी निगडित एक एक विषय दिला जाईल, ओवी दिली जाईल अथवा गोष्ट अथवा स्थळ दिलं जाईल. फोरमचा प्रत्येक श्रद्धावान सदस्य/मेंबर आपले विचार, आपली मतं त्यावर मांडू शकेल. या चर्चासत्रातूनच या श्रीसाईसच्चरिताचे अनेक कंगोरे उलगडले जातील व साईसच्चरित समजावून घेणं सोपं होऊ शकेल.
शेवटी प्रत्येक साईभक्ताला साईनाथांचं वचनच आहे -
"मज जो गाई वाडेकोडे। माझे चरित्र माझे पवाडे।
तयाचिया मी मागेपुढे। चोहीकडे उभाचि॥
श्रीसाईसच्चरिताचा ’साई - द गाईडिंग स्पिरिट’ हा फोरम चालू करताना माझे सद्गुरु अनिरुद्धबापूंनी लिहिलेला साईमहिमा सर्व श्रद्धावानांना व साईभक्तांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
साईमहिमा