मतदार
नोंदणीपासून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामांत राज्यातील सहकारी
गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य घेण्यासाठी या संस्थांचे अध्यक्ष व सचिवांची ' मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक ' म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ८० हजार गृहनिर्माण संस्थांचे एक लाख ६० हजार
स्वयंसेवक मतदार याद्या व तत्सम कामासाठी उपलब्ध होणार आहेत. या
स्वयंसेवकांनी मतदार नोंदणी , स्थलांतरित मतदार , मृत मतदार , मतदार यादी फेरनिरीक्षण कार्यक्रम , राष्ट्रीय मतदार दिवस व तत्सम कामांत सहकार्य करणे अपेक्षित आहे.
गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिवांनी ही जबाबदारी टाळू नये , याचीही पावले सरकारने उचलली आहेत. गृहनिर्माण संस्थेचा वार्षिक लेखापरिक्षण अहवाल उपनिबंधकांना पाठविताना त्यात ,
मतदार यादीशी संबंधित कामांत अध्यक्ष व सचिव यांनी केंद्रस्तरीय स्वयंसेवक
या नात्याने अद्ययावत आणि अचूक माहिती सादर केल्याचे प्रमाणपत्र जोडणे
बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नव्हे , तर या प्रमाणपत्राचा उल्लेख वार्षिक लेखा परीक्षण अहवालात स्वतंत्र मुद्द्याद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
निवडणुकीशी संबंधित कामांत गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिवांचा सहभाग वाढावा ,
यासाठी संबंधित भागातील मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी
संस्था यांची वर्षांतून किमान दोनदा संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या कामात सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सहभाग अलीकडच्या काळात
वाढविण्यात आला आहे. मतदानाच्या सोयीसाठी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे
सुरू करण्यात आली. एकीकडे असे सहकार्य होत असताना मतदार नोंदणी ते
याद्यांचे फेरनिरीक्षण करण्यापर्यंतच्या कामांत सोसायट्यांचे सहकार्य लाभत
नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या
पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेण्यासाठी त्यांना केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून
जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यानुसार आदेश देण्याची सूचना
सहकार खात्याला केली. त्यानंतर सहकार खात्याने हे आदेश काढले आहेत.
- गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव निवडणुकीचे काम करणार
- मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक (बूथ लेव्हल व्हॉलेंटिअर्स) म्हणून नेमणूक
- सोसायटीतील नवीन , स्थलांतरित , मृत मतदारांची नावे द्यावी लागणार
- संस्थेच्या वार्षिक लेखापरीक्षणात स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामाची नोंद
- अचूक माहिती दिल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार