डेक्कन मुजाहिद्दीनचा आणखी हल्ल्यांचा इशारा
मुंबई - मुंबईत झालेल्या सर्वाधिक घातक आंतकवादी हल्ल्याची जबाबदारी डेक्कन मुजाहिद्दीन या संघटनेने स्वीकारलेली आहे. या संघटनेचे नाव जरी नवे असले तरी यापुढे देशात अत्यंत घातक कारवाया करण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे.
या संघटनेने दोन पानी इ-मेल एका वृत्तवाहिनी कार्यालयाला पाठविला असून, यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सरकारला आव्हान देताना हा हल्ला म्हणजे केवळ झलक असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत आम्ही सरकारला वेळोवेळी आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन करीत आलो आहोत; मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.
सरकारला आता आमची दखल घ्यावीच लागेल. आमचे राष्ट्र आम्हाला परत मिळवायचे आहे. भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून एका विशिष्ट समाजावर अत्याचार सुरू आहेत व आम्ही ते निमूटपणे सहन करीत आलो आहेत; मात्र आता परिस्थिती बदलली असेल. आतापर्यंत अनेक अतिरेकी संघटनांनी येथे दहशतवादी कारवाया केल्या; मात्र त्या लपूनछपून होत्या. त्यांचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे आम्ही आता थेट आव्हान देत आहोत. आमच्यावरील अत्याचार कायम राहिल्यास देशातील अनेक शहरांत आम्ही यापेक्षाही भयंकर कारवाया करू. भारताबरोबरच अनेक पाश्चात्य देशांत आमच्या समाजावर अत्याचार झाल्यास आम्ही येथेही असेच हल्ले करू.