पुणे - संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या ओझोन
कृती विभागाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांची अमेरिकी सरकारच्या पर्यावरण
संरक्षण संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा
पुरस्कार मंगळवारी (ता. २१) वॉशिंग्टन येथे देण्यात येणार आहे.
सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करणारा ओझोन थर
वाचवण्यासाठी "मॉंट्रिएल' करार करण्यात आला होता. १४५ विकसनशील
देशांमध्ये या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी शेंडे यांच्या विभागातर्फे
साहाय्य करण्यात येते. ओझोनचे संरक्षण करतानाच, हरित वायूंचे उत्सर्जन
होणार नाही, यासाठी कल्पकतेने योजलेल्या उपायांबद्दल त्यांची
पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शीतकारक वायूंचे तंत्रज्ञान कमी
करणे, इमारती, घरगुती उपकरणांमधील वातानुकूलन यंत्रणेची ऊर्जा
कार्यक्षमता सुधारणे यांच्याशी संबंधित धोरणांच्या अंमलबजावणीसाठी शेंडे
यांनी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी अभ्यास अहवालाचे प्रकाशन,
चर्चासत्रांचे आयोजन, १४५ देशांमध्ये संघटित यंत्रणा उभारून विविध प्रयोग
राबविण्याचे काम त्यांनी केले आहे. याआधी शेंडे यांच्या नेतृत्वाखालील
ओझोन कृती कार्यक्रमाला २००५ मध्ये अमेरिकी सरकारचा "स्ट्रॅटोस्फेरिक'
ओझोन संरक्षण पुरस्कार मिळाला होता. या वर्षी तापमानवाढ रोखण्यासाठी
मिळालेल्या पुरस्कारामुळे पर्यावरण विषयात अमेरिकी पुरस्कार मिळवणारे ते
पहिले भारतीय ठरले आहेत.