आणि ओझोनला घातक ठरणारे सीएफसी व इतर वायू न वापरण्याचे सर्वानी मिळून
ठरविल्यामुळे! जगात विविध देशांमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या समस्या असल्या आणि
त्यांची वेगवेगळी विचारसरणी असली तरी सर्वजण या मुद्दय़ावर एकत्र आले हे
विशेष! त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत ओझोन
कृती गटाने पुढाकार घेतला आणि सर्वाना हा विषय पटवून देऊनत्यानुसार
वागण्यास भाग पाडले. या ओझोन कृती गटाच्या यशात एका भारतीयाचे मोठे
योगदान आहे. ते म्हणजे या कृती गटाचे प्रमुख डॉ. राजेंद्र शेंडे. त्यांनी
या क्षेत्रासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना कालच
अमेरिकेच्या ‘एन्व्हायर्न्मेंट प्रोटेक्शन एजन्सी’तर्फे क्लायमेट
प्रोटेक्शन अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव
तालुक्यातील रहिमतपूर या गावापासून ते थेट ओझोन कृती गटाच्या
प्रमुखपदापर्यंतची त्यांची प्रगती प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांला
प्रेरणादायक ठरेल. शेंडे यांनी आपल्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर
मुंबईतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेतून
रासायनिक अभियंता म्हणून पदवी प्राप्त केली. त्यानंतर सुमारे वीस वर्षे
त्यांनी उद्योग क्षेत्रात विविध पदांवर काम केले. या काळात ‘हाय
इंजिनिअरिंग प्लॅस्टिक’ची निर्मिती, तसेच ओझोनचा थर नष्ट करणाऱ्या
पदार्थाना पर्याय शोधून काढणे, रासायनिक उद्योगात पुनर्निर्मित ऊर्जेचा
वापर अशा विविध प्रकल्पांवर संशोधन केले. त्यात भरीव कामगिरीसुद्धा केली.
पण तेवढय़ावरच ते समाधानी नव्हते. १९८० च्या दशकात ओझोनच्या थराच्या
संरक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय ‘मॉन्ट्रियल करारा’वर चर्चा सुरू झाली.
याबाबतची भारतीय भूमिका ठरविण्याच्या कृती गटात सरकारने त्यांचा समावेश
केला. हा करार स्वीकारण्याच्या बदल्यात विकसनशील देशांना विकासासाठी
आर्थिक सहकार्य मिळविण्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला. विशेष म्हणजे या
आंतरराष्ट्रीय वाटाघाटींना यश आले आणि विकसित देशांनी भारतासारख्या
विकसनशील देशांना यासाठी स्वतंत्र दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी उभा
केला. त्यानंतर शेंडे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या
समर्थपणे पेलल्या. १९९९ साली त्यांची ओझोन कृती गटाच्या प्रमुखपदी नेमणूक
झाली. इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या
संघटनेच्या २००७ साली प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालाचे
संपादन करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. (याच वर्षी या संघटनेला
नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.) याचबरोबर जागतिक पर्यावरणाच्या
समस्यांबाबत सरकार, तसेच उद्योगांना त्यांचे धोरण ठरविण्यासाठी आणि
तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले.
या योगदानाबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विशेष
म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ही कामगिरी बजावत असताना आणि पॅरिसमधील
आपल्या कार्यालयात सक्रिय असतानाच आपल्या मूळगावी काहीतरी चांगले करून
दाखविण्याची त्यांची इच्छा आहे, त्यासाठी ते प्रयत्नशीलही आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भरघोस यश मिळत असतानाच त्यांना मूळगावी करावयाच्या
भावी प्रकल्पातही यश लाभो, याच शुभेच्छा!