खाली दिलेली लिंक पहावी. या वेबसाईटवरील आवाहनच खाली दिले आहे. ते वाचावे.
प्राथमिक तयारीसाठी उद्या ३ ऑगस्टला TISS मध्ये महेश कांबळेंच्या खोलीत स. १० ते ११ असा १ तास बैठक घेत आहोत. आपण यावे, ही विनंती.
आपला,
सुरेश सावंत
-----------------------------------------------------------------------------------------
आवाहनवेबसाईटची ही आवृत्ती नमुन्यादाखल आहे. तूर्त त्यातील साहित्य अन्य ठिकाणांहून घेतले आहे.
पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्य साहित्य येथे प्रसिद्ध केले जार्इल. फोटो, व्हिडिओ क्लिप्सही देता येतील. वृत्तपत्रे-नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले साहित्य त्यांच्या सौजन्याने पुनर्मुद्रित करता येईल. चळवळींचे संपूर्ण अंकही अपलोड करता येतील किंवा त्यांच्या लिंक्स देता येतील. हे साहित्य'मराठी युनिकोड'मध्ये टाईप केलेले असल्यास जसेच्या तसे टाकता येईल. अगदी अशक्य असल्यास पीडीएफ फाईल पाठवावी. ब्लॉगवरील मुख्य व्यवहार मराठीतच असला तरी इंग्रजी साहित्याचेही स्वागत आहे. साहित्य पाठविण्यासाठी तसेच अन्य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्ताः
samyak...@gmail.com
थोडे अधिकचे आवाहन महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या २५ ते २७ फेब्रुवारी २०११ रोजी साने गुरुजी स्मारक, माणगाव, जि. रायगड येथे झालेल्या 'पुरोगामी चळवळीसमोरील सामायिक आव्हाने व पेच' या विषयावरील 'विचारविनिमय बैठकी'तील एका सूचनेनुसार संपर्क-संवादासाठी ‘सम्यक संवाद’ हा ब्लॉग तयार करण्यात आला होता. ब्लॉगला काही एक मर्यादा आहेत. स्वतंत्र वेबसाईटची तुलना त्याच्याशी अर्थातच होऊ शकत नाही. पण त्याविषयीची तज्ज्ञता व खर्च याबाबत आमची काहीच तयारी नसल्याने वेबसाईटचा आम्ही विचारच केला नव्हता.
अलिकडेच सुनिल गजाकोश हे आमचे चळवळीतले जुने सहकारी भेटले. मधला बराच काळ ते परदेशात असल्याने त्यांच्याशी फारसा संपर्क राहिलेला नव्हता. संगणकीय व्यवहार, वेबसाईट्स यातले ते जाणकार आहेत. तो त्यांचा व्यवसायच आहे. आपल्या माहितीतल्या ‘कलमनामा’ साप्ताहिकाच्या वेबसाईटची रचना त्यांनीच केली आहे. भेटीत त्यांनी पुरोगामी विचारांना वाहिलेली मराठीतली वेबसाईट आपण तयार केली पाहिजे, असा विचार मांडला. माणगाव बैठक, सम्यक संवाद ब्लॉग या प्रक्रियेची चर्चा झाल्यावर हीच प्रक्रिया आपण पुढे नेऊया, असे ते म्हणाले. ते लगेच कामाला लागले आणि त्यांनी ही वेबसाईट तयार केली. प्रारंभीचा खर्च त्यांनीच केला आहे. पुढे मात्र तो उभा करावा लागेल.
आपल्याकडून अपेक्षाः
· इंटरनेटवरील मजकूर जगात कोठूनही वाचता येतो. संदर्भासाठी सर्च केल्यास तातडीने समोर येतो. तो कॉपी-पेस्ट करता येतो. चळवळींनी-कार्यकर्त्यांनी (खरे म्हणजे कोणीही) आपले लेखन, वृत्तांत वेबसाईटवर टाकल्यास ते कायमचे डॉक्युमेंटेशन होऊन जाते. अधिक लोकांपर्यंत पोहोचते. ‘सम्यक संवाद’ या वेबसाईटच्या उपक्रमाचे महत्व त्यादृष्टीने समजून घ्यावे.
· हा उपक्रम अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीने आपल्या सूचना हव्या आहेत.
· साहित्य गोळा करणे, निवडणे, संपादन करणे यात सहकार्य हवे आहे.
· मराठी युनिकोडमध्ये विनामूल्य टायपिंग करून देणारे स्वयंसेवक हवेत. पाठवलेला मजकूर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार टाईप करून ईमेल करायचा आहे.
· या वेबसाईटच्या संयोजनात सहभागी मंडळी चळवळ तसेच अन्य व्यवधाने सांभाळून त्यात लक्ष घालत आहेत. यथावकाश त्यांच्या साथीला निश्चित वेळ देणारे (अंशकालीन/अर्धवेळ) लोक लागतील. त्यांच्या मानधनाची व्यवस्था करावी लागेल. वेबसाईटच्या जागेसाठीचे भाडे द्यावे लागेल. यासाठीचा निधी कसा उभा करता येईल, यासंबंधी आपल्या सूचना व सहकार्य मिळावे.
· आजच्या घडीला एखादी संघटना किंवा गट या उपक्रमाचा नियंत्रक नाही. पुरोगामी चळवळीशी संबंधित काही व्यक्तींनी यास प्रारंभीची चालना दिली आहे. ज्यांचा यात क्रियाशील सहभाग राहील, तेच त्याचे निर्णयकर्तेही राहतील, हे उघड आहे. यादृष्टीने अशा उपक्रमात रस असलेल्या मंडळींनी-विशेषतः तरुण मंडळींनी यात सहभागी होऊन त्याचे संचालन करावे, ही अपेक्षा आहे.
धन्यवाद!
सदिच्छांसह,
संपादक मंडळ