डॉ. दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर , १९४५ रोजी साताऱ्यात झाला. बंधू देवदत्त यांच्याकडून प्रेरणा घेऊन , त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात नागपूरमधील तरुण एकत्र आले आणि त्यांनी एका नास्तिक मंचाची उभारणी करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सुरू केले होते. पुढे त्याचेच रूपांतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीत झाले. ‘ एमबीबीएस ‘ ची पदवी घेतल्यानंतर , दाभोलकर यांनी , काही काळ वैद्यकीय व्यवसाय केला. तो बंद करून गेल्या २५ वर्षांपासून , ते परिवर्तनवादी चळवळीत , पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करीत होते.
अंधश्रद्धा दूर करण्यासाठी झटणारी ‘ अंनिस ‘ ही राज्यातील नव्हे , तर भारतातील एकमेव संघटना आहे. राज्यात ‘ अंनिस ‘ च्या १८० शाखा कार्यरत आहेत. या शाखांच्या माध्यमातून , विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचविण्यासाठी , शाळांमध्ये शिबिरे भरविली जातात. हे काम १५ वर्षांपासून केले जात आहे. ‘ विज्ञानबोध वाहिनी ‘ च्या माध्यमातून ग्रामीण आणि आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे हाती घेतलेले काम आजही सुरू आहे. ‘ साधना ‘ हे साप्ताहिकही दाभोलकर यांनी समर्थपणे चालविले. आपल्या संपादकत्वाचा ठसा त्यांनी या साप्ताहिकावर उमटविला. ‘ साधना ‘ ने सातत्याने सामाजिक , साहित्यिक परिवर्तनाचे विषय महाराष्ट्रासमोर मांडले. डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ साधना ‘ चे ४०० अंक प्रसिद्ध झाले आहेत.
परिवर्तनवादी पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. हा निधी एक कोटी रुपयांवर गेला असून , या रकमेच्या व्याजातून दर महिन्याला ५० कार्यकर्त्यांना एक हजार रुपये मानधन देण्यात येते. गेल्या १८ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. ‘ अंनिस ‘ च्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे निवासी स्वरूपाचे कार्य मोठ्या प्रमाणात चालवण्यात येते , याखेरीज जैविक शेती , दाया प्रशिक्षण दिले जाते.
या सर्वांमध्ये दाभोलकरांचा एक पैलू दुर्लक्षित होऊ नये…दाभोलकर राष्ट्रीय कबड्डीपटू होते. बांगलादेशात झालेल्या कबड्डी सामन्यासाठी , त्यांची भारतीय संघामध्ये निवड झाली होती.
ग्रंथसंपदा
भ्रम आणि निरास
विचार तर कराल
अंधश्रद्धा: विनाशपथ
अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
श्रद्धा-अंधश्रद्धा
तिमिरातून तेजाकडे
प्रश्न मनाचे
मती-भानामती
सन्मान
राज्य शिवछत्रपती पुरस्कार
शिवछत्रपती युवा पुरस्कार
राज्य सरकारचा ग्रंथ पुरस्कार ( ‘ तिमिरातून तेजाकडे ‘)
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाजगौरव पुरस्कार (१९९६)