ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडुन वेद म्हणवुन घेतले असे म्हणतात, यात कितपत तथ्य आहे. असे खरोखरच शक्य आहे का?
........................ ....... .. .. .. ..
.. .. .. .. .. .. ..
शक्य असल्यास...
... तंत्र समजून घेउन ह्या काळात तुमचाही कोणाकडून तत्सम काही वदवून घ्यायचा विचार आहे की काय? समजा जरी तुम्ही तसे वदवून जरी घेतले तरी मात्र ज्ञानेश्वर म्हणून नक्कीच ओळखले जाणार नाहीत.
ह. घ्या.
जर आपली विद्वत्ता, बुध्दिमत्ता, दृढ आत्मविश्वास, सुयोजित आचार-विचार, समाजाभिमुख दृष्टिकोन, आदी जर अत्त्युष्कृष्ट असेल तर; अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुध्दा सातत्याने साध्य होतात.
म्हैस संगणक वापरते.
रेड्याकडून वेद वदवता आले का याबाबत फारशी माहीती नाही. म्हैस संगणक वापरते हे आज आलेल्या विरोपावरून कळलं. (ह. घ्या)
मठ्ठ मनुष्याकडून
मला तरी असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडून म्हणजे म्हणजे रेड्यासारख्या माणसाकडून वेद वदवले असावेत. जो मनुष्य केवळ अंगानी रेड्यासारखा ताकदवान पण बुद्धीने मठ्ठ व जड जिभेचा असावा आणि कलौघात तथ्यांचा अपभ्रंश होत होत 'रेड्यासारख्याकडून वेद वदविले' चे फक्त 'रेड्याकडून' उरले असावे.
बाकी खरेखुरे ज्ञानेश्वर माऊलीच जाणे!!
आवडले
प्रियाली, म्हैस संगणक वापरते हे पुराव्यानिशी सिद्ध केलेत!गारुड्याचा खेळ
"संत ज्ञानेश्वर" चित्रपटांत असे दाखविले आहे की ज्ञानेश्वरांच्या विरोधांत असलेल्या तत्कालीन ब्राह्मणांनी "रेड्याकडून वेद" या गोष्टीची संभावना "गारुड्याचा खेळ" अशी केली होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आवाज फेकण्याचे तंत्र (व्हेंट्रिलोक्विझम) वापरून बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारे प्रभाकर पाध्येही रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेऊ शकतात.खरा चमत्कार..
ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले असतील का नाही माहीत नाही. साध्या तर्काने ही दंतकथा वाटते - त्यांनी केलेला चमत्कार नाही. असली तर असली नसली म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही.
पण अगदी तरूण वयात (१६-२४), त्यांनी लिहीलेली ज्ञानेश्वरी (भावार्थ दिपिका), अमृतानुभव व असंख्य अभंग/ओव्या हा खराखुरा चमत्कार वाटतो. एव्हढे विश्वाचे आणि मनुष्याबद्द्लचे ज्ञान त्यांना कसे लाभले हा कुतुहलाचा विषय आहे.शिवाय याच वयात (संजीवन समाधी घेण्याआधी) त्यांनी भागवत धर्म (वारकरी संप्रदाय) स्थापला आणि कुणावरही टिका न करता सहजतेने सर्वजातींना एकत्र आणायचा प्रयत्न केला. म्हणून काहीजण त्यांना बंडखोर समजतात. कवी बीं नी तर ज्ञानेश्वरांनी क्रांती ऐवजी "शांतीमय उत्क्रांती" केली असे म्हणले आहे. असाच प्रकार आदी शंकराचार्यांचा आणि अनेक इतर संत अथवा बहीणाबाईंसारख्या साहीत्यिकांचा आहे.
त्यांच्या आळंदीतील भिंती बद्द्ल ऐकावातील गोष्ट अशी आहे की ती भिंत गेल्या काही वर्षांपर्यंत (१९००च्या) अस्तित्वात होती (!). पण लोक "ती" भिंत प्रसाद म्हणून खाऊ लागले अथवा टवका घरी नेऊ लागले. मग सरकारने/संस्थानाने त्या भिंतीवर आवरण करून दुसरी दगडी भिंत बांधली आणि त्यावर कुलकर्णी भावंडांचे छोटेसे देऊळ केले. आता लोक या बाहेरच्या भिंतीचेच दर्शन घेतात!
मानवाला वैषम्य का वाटते ?
' संतकृपा ' म्हणून एक
मराठी मासिक आहे. त्यात डॉ. ग.
नि. जोगळेकर यांचा नियमितपणे
एक लेख असतो ज्यात ते विविध
विषयावर विवेचन करतात. पैकी एक
उतारा देत आहे -
"
संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचे
तोंडून वेद वदविले या
गोष्टीचे वैषम्य का वाटावे हे
कोडे न सुटण्यासारखे आहे.
आम्ही मानव असून आम्हाला
वेदविद्यचा गंध नाही आणि संत
मंडळी निर्बुद्ध मानल्या
गेलेल्या, म्हणजे मानव
ज्यांना निर्बुद्ध मानतो
अशांच्या तोंडून वेद वदवितात
हे कसे शक्य आहे अशी शंका
त्यांना येते. मध्यंतरी
कर्नाटक शासनाने चंदनचोर
विरप्पन याला यमसदनास धाडले
तर अनेक मानवांचा त्यावर
विश्वासच बसेना. ' मारला गेला
तो विरप्पन कशावरून ' अशी शंका
त्यांचे मनात आली. तानाजी
कोंडाणा सर करायला गेला
त्यावेळी कडा चढण्यासाठी
घोरपडीला दोर लावून वर गेला
असे लोकमानसांत रूजलेले
असताना या मानवाच्या मनात ' हे
कसे शक्य आहे ' हा विचार असतो.
छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा
वाघनखांनी बाहेर काढला आणि
विजापूरकरांचा एवढा मातब्बर
सरदार धरणीवर लोळवला म्हणून
देशातील मुले अभिमान बाळगतात
तर यांच्या मनात शंका की '
शिवाजीची कुडी इतकी लहान
असताना एवढे अवाढव्य धूड तो
मारू शकेल यावर विश्वासच बसत
नाही '. अशा मानवांना शंका घेत
घेत त्यंचे आयुष्य त्या कारणी
समर्पित करण्याची मुभा आपण
द्यावयास हवी. " ह्या
उतारातील शेवटचे वाक्य
उपहासाने लिहिलेले दिसते.
आता
चर्चेच्या विषयाबद्दल मला
काय वाटते. श्री ज्ञानेश्वर
हे एक निष्णात योगी होते.
पाठीवर मांडे भाजता येतील
इतका जठरातील वैश्वानर
प्रदीप्त करणे, अचेतन भिंत
चालविणे ह्या गोष्टी
योग्याला घडवून आणणे कठीण
नाही. चांगदेव भेटायला आला
तेव्हां तोही वाघावर बसून व
एका सापाचा चाबूक बनवून आला.
पण वाघ व साप दोन्ही चेतन
असल्यामुळे त्यांना आटोक्यात
आणणे अचेतन भिंत
चालविण्यापेक्षा सोपे आहे.
माऊलींनी आपल्या
ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी
म्हटले आहे की ब्रह्मत्वाला
पोचलेल्या महात्म्याला
अष्टसिद्धि हात जोडून उभ्या
असतात. मग तो स्वर्गलोकात
चाललेली संभाषणे ऐकू शकतो,
मुंगीच्या मनांतले विचार
ओळखू शकतो वगैरे. आणि माझी ठाम
समजूत आहे की
ज्ञानेश्वरांसारखे प्रभूति
ऐकीव माहिती आपल्या ग्रंथात
लिहिणार नाही. जे अनुभव सिद्ध
नाही ते लोकांना
रंजविण्यासाठी लिहिलेला हा
ग्रन्थ नव्हे. नुकतेच कुठेतरी
वाचले की दक्षिण महासागरातील
हिमनग गातात आणि
वैज्ञानिकांनी त्याचे
ध्वनीमुद्रण केलेले आहे. पण ती
frequency मानवी कानाला आकलन
होण्यासारखी नाही. जर चेतना
नसलेले हिमनग गाऊ शकतात तर
रेडा तर चेतन प्राणी. त्याच्या
तोंडून वेद वदविण्याची कृति
त्याचाकडून करवून घेणे कठीण
नाही. आपण महात्म्यांचे चौकात
जसे पुतळे उभे करतो तद्वत
पैठणला ७०० वर्षांपासून त्या
रेड्याच्या आठवणीचा एक खांब
आहे म्हणतात. आता हा खांबही
त्या ऱेड्याच्या निमित्ते
कशावरून असेही म्हणता येईलच
की.
"शांतीमय उत्क्रांती"
नामदेवा,
कुणावरही
टिका न करता सहजतेने
सर्वजातींना एकत्र आणायचा
प्रयत्न केला.
कवी बीं नी तर ज्ञानेश्वरांनी क्रांती ऐवजी "शांतीमय उत्क्रांती" केली असे म्हणले आहे.
फार छान. या मताबद्दल आणि इतर
माहितीसाठी आभार.
--लिखाळ.
संशय व अविश्वास
मिलिंद , विश्वमोहिनी ,
आपण
म्हणता ते अगदी बरोबर
आहे. हिमनगाचे गाणे आणि
रेड्याचे मंत्र म्हणणे
ह्याची तुलना चुकीची आहे.
प्रतीसादात काहीतरी घोटाळा
होत आहे असे जाणवत होते. पण
'प्रतीसाद पाठवा' म्हणून कळ
दाबून झाली होती, आणि कुठे
घोटाळा झालाय हे नंतर पाहू असा
विचार केला. पण आपण ते दाखवून
माझ्या डोक्याचा ताण लवकरच
कमी केलात. धन्यवाद.
पण
आता माझ्या मनांत शंका आणि
अविश्वास , व ' अविश्वासातूनच
विज्ञानात मोठमोठे शोध
लागतात ' ह्याबद्दल एक वेगळाच
प्रश्न निर्माण झालाय. माझ्या
मते जिज्ञासेपोटी शोध घेणे -
" हे खरच असू शकेल का ? आणि असेल
तर त्यामागे काहीतरी कारण
असणे जरूरी आहे" , आणि " हे असं
असूच शकत नाही, कारण मी
अनुभविलेले नाही (पहिले नाही
म्हणा हवे तर) " म्हणून
अविश्वास दाखविणे, ह्या दोन
गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
पहिल्या प्रकारच्या संशयात
संशय निरसन करून घेण्यासाठी
काही विशिष्ट प्रयत्न लागतात,
काही विशिष्ट पात्रता लागते
ह्याची जाण असते. ती जर
आपल्याजवळ नसेल तर जे कोण ती
सांगतो त्या माणसाच्या
पात्रतेची जाण असते म्हणून
त्यावर विश्वास असतो. आता
तुम्ही दिलेल्या उदा. जर कोणी
"तुम्ही (वा सर्व जग) सांगते
पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण
मी तर रोज बघतो त्याप्रमाणे
सूर्यच तर पृथ्वीभोंवती
फि्रतो " असे म्हणत तर असेल तर
तो अविश्वास झाला, त्याच्या
मागे शोध वृत्ति नसते. आणि
अशा अविश्वासाला औषधच नाही.
दुसरे नमून
करावेसे वाटते की, कोणी (खरे)
संत आपण केलेले चमत्कार (खरे
तर ते करत नाहीतच, ते घडतात)
ह्यांची कधीही, अगदी चुकूनही
चर्चा करीत नाहीत. त्यामुळे
श्री. ज्ञानेश्वरांनी
रेड्यामुखी वेद वदविले हे
आपणहून सांगणे अपेक्षितच
नाही. ते जरी ज्ञानी असले तरी
आपणहून कोणताही ग्रंथ
त्यांनी लिहिला नाही. चांगदेव
पासष्टीच्या वेळेस कोरा कागद
बघून निवृत्तिनाथ म्हणाले,
कागद कोरा आहे त्या अर्थी
चांगदेव अजून शुद्ध आहे,
ज्ञाना त्याला बोध कर.
(घटनेकडे बघायचा दृष्टीकोनही
किती वेगवेगळे असतात,
मुक्ताबाई तर कोरा कागद बघून
हसली - म्हणाली शेवटी कोराच का ?
) निवृत्तिनाथांना
त्यावेळच्या सामान्य
जनाबद्दल कळवळा येऊन त्यांनी
ज्ञानदेवांना जेव्हां आज्ञा
केली तेव्हां
' भावार्थदीपिका ' उदयाला
आली. तीही भ. गीतेवरील टीकाच.
कृष्ण भगवान काय सांगतील तेच
विषद करायचे. आपले म्हणणे
त्यात घुसवायचे नाही. म्हणून
ती झाल्यावर निवृत्तिनाथांनी
' आता स्वानुभवाचे कथन कर ' हा
आदेश दिल्यावरच त्यांनी '
अमृतानुभव ' लिहिला. असे
ज्ञानदेव आपले चमत्कार आपणच
कथन करतील ?
आता
संशय,अविश्वास दाखवायला जागा
असलेली एक गोष्ट सांगतो.
साधारण ७०-८० वर्षापूर्वी एक
संत होऊन गेले. श्री गुलाबराव
महाराज. जन्मांध. त्यांनी
ज्ञानेश्वरीवर जी टीका केली
आहे त्याला तोड नाही. संपूर्ण
(९००० श्लोक) ज्ञानेश्वरी
त्यांना तोंडपाठ होती.
त्यांनी ज्ञानेश्वर कसे
असतील असे आपल्या
ज्ञानचक्षूंनी जे चित्र
काढले ते हुबेहूब
ज्ञानदेवांसारखे आहे.
त्यांनी ५० हून अधिक पुस्तके
लिहिली आहेत आणि त्यातली काही
संस्कृतामधून आहेत. जन्मांध
एवढे सगळे करेल ? विश्वास
बसणेच कठीण. पण हेही फार
पूर्वीचे नाही. असो.
वरील गोष्टीचा रेड्याकडून
वेद वदविणेशी संबंध नाही, वा
तुलनेसाठी नाही. संशय ,
अविश्वास आणि
अविश्वासातून विज्ञानात शोध
लागतात ह्याबद्दल आणखी जाणून
घेण्यासाठी मला जे सुचले ते
सांगण्याचा एक प्रयत्न.
हिमनगांचे गाणे
हिमनग गात असल्याची बातमी मीही ऐकली आहे. हिमनग तयार होताना हिमामध्ये काही पोकळ्या राहतात. त्या पोकळीत पाणी शिरताना त्यातली हवा बाहेर फेकली जाते आणि त्यावेळी ह्या हवेचा आवाज येतो त्यामुळे ते हिमनग गात आहेत असा भास होतो. ते हिमनग ठरवून गात नसतात किंवा कोणी त्यांना गायलाही लावत नसते. त्यामुळे तुमचे " जर चेतना नसलेले हिमनग गाऊ शकतात तर रेडा तर चेतन प्राणी. त्याच्या तोंडून वेद वदविण्याची कृति त्याचाकडून करवून घेणे कठीण नाही." हे वाक्य पटले नाही. गाणारे हिमनग आणि रेड्याकडून वेद वदवणे ह्यामध्ये तुलना करत एक होऊ शकते तर दुसरे का नाही हे म्हणणे योग्य वाटत नाही.
तुमचे बाकी विवेचन छान आहे. त्याबद्दल काही अभ्यास नसल्याने टीका करू शकत नाही.
रेडे आड्नाव.
मठ्ठ मनुष्याकडुन......आणि मानवाला वैषम्य का वाटते.. या दोन्ही मतांशी सहमत....शंका त्यात एक किंवा भर अशी, मठ्ठ माणसाचे आड्नाव..रेडे असेल तर... चू.भू. दे ̱̱̱.घे.
अविश्वास कशावर?
श्री. गुलाबराव महाराजांनी जन्मांध असून त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली आणि ज्ञानेश्वरीवर भाष्य केले, ५० पुस्तके लिहिली; या सर्व गोष्टी अवघड असल्या तरी अशक्य नाहीत. अंधत्व असताना केलेली थोर कामे करू शकतात हे हेलन केलर किंवा सूरदासांच्या उदाहरणावरून आपल्याला माहिती आहे. त्याविरुद्ध कोणी "अविश्वास" दाखवू नये.
मात्र ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदविले या गोष्टीवर अविश्वास दाखविणे योग्य आहे. कारण रेड्याकडून वेद म्हणवून घेणे हे शक्य नाही. त्याकडे सत्य मानून न बघता ते एक रूपक आहे असे म्हणा मग कोणताहि वाद होणार नाही.
दुसरी एक शक्यता म्हणजे कुत्र्यांकडून "जिंगल बेल किंवा तत्सम" गाणी म्हणवून घेण्याचे प्रयोग आपण ऐकले असतील. तद्वत एखादवेळेस रेडा रेकत असता त्याच्या रेकण्याच्या तालासुराला अनुसरून एखादी ऋचा ज्ञानेश्वरांनी म्हणून दाखवून तो रेडाच जणू वेदमंत्र म्हणू शकतो असे त्यांच्यावर "सन्याशाचे पोर" म्हणून वाळीत टाकणाऱ्या ब्रह्मवृंदाला माऊलींनी दर्शविले असेल. ही गोष्ट शक्य आहे. परंतु रेडा जाणून बुजून वेदाची एखादी ऋचा किंवा भावगीताची एखादी ओळ म्हणेल यावर विश्वास ठेवणे हे पूर्ण अयोग्य आहे.
तुम्हाला तरीही त्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पोपट त्याच्या घशाच्या रचनेमुळे आणि अनुकरण करण्याच्या स्वभावामुळे मानव सदृश आवाज काढतो. अशा पोपटाला कोणी विठू म्हणायला शिकवले तर तो योगी होऊ शकणार नाही.
कलोअ,
सुभाष
वेगळेच वळण -
त्याविरुद्ध कोणी
"अविश्वास" दाखवू नये.
रेडा
वेदाची एखादी ऋचा विश्वास
ठेवणे हे पूर्ण अयोग्य आहे.
काय
योग्य व काय अयोग्य हे तर
भाषरावांनी ठरवून टाकले. पण
मला जे कुतुहल होते ते मिलिंद
आणि विश्वमोहिनी म्हणतात अविश्वासातूनच
विज्ञानात मोठमोठे शोध
लागतात त्याबद्दल. त्यावर
जर प्रकाश टाकला असता तर बरे
झाले असते. कारण माझ्या मते
ज्या गोष्टीच्या शक्यतेवर
दृढ विश्वास वाटत असेल
त्यावरच प्रयत्नाची
पराकाष्ठा होऊन संशोधन होऊं
शकते आणि अशा संशोधनांतूनच
विज्ञानातील शोध लागू शकतात.
अविश्वासातून विज्ञानांतील
शोध कसे लागू शकतील हे समजत
नाही.
दुसरी interesting
गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला
आपण दुसऱ्याला काय म्हणायचे
आहे हे अनुमान (premise का hypothesis ?)
करून त्यावरच आपण आपले
वक्तव्य करतो. माझ्या दोन्ही
प्रतिसादात मी "ह्यावर माझा
विश्वास आहे" असे कुठेही
म्हटलेले नाही. फक्त त्याच्या
शक्यतेबद्दल विचार मांडत
होतो. जोगळेकरांच्या
उताऱ्याचा मी पुरस्कार करतो
असे मिलिंदने बहुधा अनुमान
केले असावे. पण माझा प्रतिसाद
नीट वाचला असता तर
जोगळेकरांच्या उताऱ्यावर
त्यांनी "शेवटचे वाक्य उपहासाने लिहिले आहे
असे दिसते" असेही म्हटले
होते हे लक्षात आले असते
असो. भाष रावांनीही बहुधा '
रेड्याने वेद म्हटले ' ह्यावर
माझा विश्वास आहे असे ठरवून
टाकले आणि तुम्हाला तरीही त्यावर विश्वास
ठेवायचा असेल तर तो तुमचा
वैयक्तिक प्रश्न आहे असेही
म्हणून टाकले. अर्थात् ते बरेच
मोठे आहेत, त्यांनी जास्त
पावसाळे पाहिलेत आणि जास्त
देशाटन केले आहे, त्यांच्या
अनुभवाचे गाठोडे मोठे आहे.
त्यांना असे म्हणायचा अधिकार
आहे हीच माझी भावना आहे.
आता आपण मूळ
मुद्द्याकडे वळू. चर्चेच्या
विषयात म्हटले आहे ' यात कितपत
तथ्य आहे. असे खरोखरच शक्य आहे
का? ' आणि मला वाटत होते की
त्याच अनुषंगाने माझी वाटचाल
चाललेली होती. मी कसे शक्य आहे
ह्यावर आपले म्हणणे मांडले
एवढेच. चर्चेत सहभाग
घेणाऱ्यांनी शोध घेणे
अपेक्षित आहे असे मला वाटते.
अजूनही मला " हे खरच शक्य आहे का
" ह्याचा शोध घ्यावा असेच
म्हणायचे आहे. पण त्या ऐवजी
चर्चेला वेगळे वळण लागतेय असे
दिसते आहे. खरेतर मला अजून mass
hypnotism चे तंत्र वापरण्याची एक
शक्यता आहे ह्याबद्दल मला
लिहायचे आहे. पण आता ह्या
विषयावर आणखी काही मांडणेचे
धाडस करणे कितपत योग्य होईल
ह्याबद्दल साशंक आहे.
विरभि -
रूपक
रेड्याकडून वेद वदविणे हे एक रूपक असावे असे वाटते.