'मर्स'चा पहिला संशयित पेशंट कस्तुरबात
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
आखाती देशांमध्ये धुमाकूळ घातलेल्या 'मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम-कोरोना व्हायरस'चा (मर्स) पहिला संशयित पेशंट आढळून आला आहे. वाशीतील ४० वर्षीय व्यक्तीकडे या संसर्गाचा देशातील पहिला संशयित पेशंट म्हणून पाहिले जात असून त्याच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे.
आखाती देशांमध्ये मर्सचा संसर्ग झालेले पेशंट सन सप्टेंबर २०१२ पासून आढळू लागले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे आजवर जगभरात मर्सचे ९४ पेशंट आढळले असून आठ देशांमधील ४६ पेशंटचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. भारतालाही या संसर्गाचा धोका असल्याने खबरदारी बाळगण्यात येत होती.
दरम्यान, वाशीमधील एका ४० वर्षीय व्यक्तीला संसर्गाची लक्षणे दिसू लागल्याने त्याला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियामध्ये महिनाभर राहून भारतात परतली होती. भारतात परतल्यानंतर सतत ताप येत असल्याने त्याने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने या संशयित पेशंटवर सध्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचे थुंकीचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (एनओव्ही) येथे पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या साथ रोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
खबरदारी घ्या!
आखाती देशांमध्ये नुकतेच जाऊन आलेले आणि संसर्गाची लक्षणे आढळणाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेऊन पालिकेच्या हॉस्पिटलांत संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. पेशंटच्या नमुन्याच्या तपासणीचे निष्कर्ष शुक्रवारी येण्याची शक्यता आहे.
मर्सची लक्षणे
ताप, खोकला, घसा सुजणे, श्वास घेण्यात अडथळे, न्यूमोनिया.