- कोळपिंप्रीच्या सतीश काटेंनी शोधला शेतीच्या समस्येवर तोडगा
चंद्रकांत जाधव। दि. ५ (जळगाव)
शेतीचा न पेलवणारा खर्च, मजुरांची समस्या आणि बेभरवशाचे उत्पन्न.. शेतीसमोरील या प्रश्नांवर कोळपिंप्री तालुका पारोळा तेथील शेतकरी सतीश काटे यांनी उत्तर शोधले; शिवाय शाश्वत शेतीचा एक वेगळा प्रयोग सिद्ध केला.
बोरी नदीच्या काठावर कोळपिंप्रीच्या शिवारात ही शाश्वत शेती साकारली असून, गूळ, गोबर (शेण), गोमूत्र यांचे मोठे बळ त्यांच्या शेतीला मिळाले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षण घेतलेल्या काटे यांनी आपल्यातील उपक्रमशीलतेला कष्टांची जोड देऊन प्रतिष्ठा आणि संपन्नता मिळविली आहे.
फलदायी बहुपीक पद्धत
फुलशेती, वनशेती, फळशेती, भाजीपाला शेती यांना एकवटणारी बहुपीक पद्धत काटे यांनी स्वीकारली. साडेतीन एकर एवढी वडिलोपाजिर्त शेती त्यांच्याकडे आहे. यातील दोन एकर क्षेत्रात त्यांनी १00 लिंबू, १00 चिकू, १४ नारळ, ५00 शेवगा, १00 साग, ७0 कडीपत्ता, ३८ कडूनिंब, नऊ उंबर, १२ अशोक, २0 सीताफळ, दोन पेरू, पाच आवळा, दोन अंजीर, दोन रामफळ, सहा सुरू, दोन भोकर, एक बेल आदी प्रकारची झाडे लावली आहेत. तर या क्षेत्राच्या आजूबाजूला केलेल्या कुंपणावर गिलके व इतर वेलवर्गीय भाजीपाला पिके ते घेतात. तर झेंडू व तेरडा ही फुलपिके आंतर पीक प्रमुख सणांच्या पार्श्वभूमीवर घेतात. चिकू, शेवगा, लिंबू ही उत्पन्न देणारी प्रमुख पिके आहे. चिकूची ३0 बाय ३0 फूट या अंतरात लागवड केली असून, या अंतरात १५ बाय १५ फुटांवर लिंबू व सात बाय सात फुटांवर शेवग्याची लागवड केली आहे. पट पद्धतीने ते सिंचन करतात. त्यासाठी विहीर असून, नुकतीच एक कूपनलिका केली आहे. उर्वरित दीड एकरात त्यांनी सरसकट शेवग्याची लागवड केली आहे.
उत्पन्नाची हमी, थेट मार्केटिंग
बहुपीक पद्धतीमुळे त्यांना बारमाही उत्पन्न मिळत आहे. लिंबू बारमाही येतो. ज्या वेळी लिंबूला कमी भाव असतो त्या वेळी चिकूमुळे बुडीत उत्पन्नाची भर निघते आणि ज्या वेळी चिकूला फारशी मागणी नसते, त्या वेळेस लिंबू तारतो. शेवग्याला वाशी, नाशिक येथील व्यापार्यांकडून कायम मागणी आहे. शेतात येऊन व्यापारी शेवगा घेऊन जातात. तर सेंद्रीय घटकांमुळे चिकू व लिंबूला बाजारातील प्रचलित दरांपेक्षा दुप्पट भाव मिळतो. अमळनेर, पारोळा येथेदेखील गरज असताना ते स्वत: विक्रीचे स्टॉल लावतात. अनेक ग्राहक थेट शेतात येऊन चिकू, लिंबू, शेवगा खरेदी करतात. एकाच वेळी ४0 किलो लिंबू, २0 किलो चिकू खरेदी करणारे अनेक ग्राहक त्यांच्याकडे येतात. लिंबू, चिकू व शेवगा तोडण्यासाठी रोज दोन मजूर त्यांना हंगाम भरात असताना लागतात. अलीकडे त्यांनी लिंबूचे लोणचे तयार करायला सुरुवात केली आहे. त्यांची पत्नी व कुटुंबीय त्यांना मदत करतात. या लोणच्यामध्ये ते कृत्रिम सायट्रीक अँसिड व व्हिनेगर टाकत नाहीत. एक किलोमागे एक किलो साखर व गरजेएवढी चटणी, मिठ वापरले जाते. हे लोणचे ते नाशिक व पुणे येथील मॉलमध्ये पाठवितात. १४0 रुपये प्रतिकिलो या घाऊक दरात त्यांच्या लोणच्याची विक्री होत आहे. तर या वर्षी एक स्वयंसेवी संस्था त्यांचे लोणचे हमीभावात वर्षभर खरेदी करणार आहे.
१५ वर्षे त्यांना शेतात मशागत करावी लागलेली नाही. त्यामुळे बैलजोडी ठेवण्याची गरज त्यांना राहिलेली नाही. झाडांच्या दाट सावलीत तण उगवण्याची प्रक्रिया बंद झाल्याने निंदणीच्या खर्चाचा प्रश्नच येत नाही.
असे बनतात सेंद्रीय घटक
काटे स्वत: जीवामृत, दशप्रणार्क, व्हर्मीवॉश तयार करतात. जीवामृतसाठी ते २00 लीटर पाण्यात १0 किलो शेण, पाच ते दहा लीटर गोमूत्र, दोन किलो काळा किंवा लाल गूळ, कोणत्याही कडधान्याचे दोन किलो पीठ आणि बांधावरील किंवा वड, पिंपळ, उंबर या झाडांखालील मूठभर जीवाणू माती वापरतात. या सर्व घटकांचे मिश्रण दोन किंवा सात दिवस आंबवतात. मिश्रण दिवसातून तीन वेळा ते स्वत: डावीकडून उजवीकडे फिरवून ढवळतात. या मिश्रणाचा ड्रम ते दाट सावलीत ठेवतात. त्यावर गोणपाट झाकतात. गोणपाटातून या मिश्रणातील कार्बन डाय ऑक्साईड व मिथेन वायू हा हवेत जातो. एक एकर क्षेत्रात झाडांच्या मुळांना देण्यासाठी या २00 लीटर जीवामृताचा ते वापर करतात. दशप्रणार्क तयार करण्यासाठी ते २00 लीटर पाण्यात विविध प्रकारचा पाला टाकतात. यामध्ये पाच किलो कडूनिंबाचा, दोन किलो निरगुडीचा, दोन किलो सीताफळाचा, दोन किलो पपईचा, दोन किलो करंजचा, दोन किलो गुळवेलचा, दोन किलो लाल कन्हेरचा, दोन किलो रुईचा, दोन किलो मायली एरंड, दोन किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, २५0 ग्रॅम लसणाचा ठेचा, दोन किलो देशी गाईचे शेण व पाच लीटर गोमूत्राचा वापर करतात. हे मिश्रण ३0 दिवस आंबवतात. दिवसातून तीन वेळा डावीकडून उजवीकडे फिरवून ढवळतात. हे मिश्रणही सावलीत ठेवून त्यावर गोणपाट झाकून ठेवतात. ३0 दिवसांनंतर हे सर्व द्रावण किंवा मिश्रण गाळून घेतात. २00 लीटर पाण्यात अडीच लीटर दशप्रणार्क (गाळलेले द्रावण) याप्रमाणे वापर करून त्याची सर्व झाडांवर फवारणी करतात.
पुरस्कार, गौरवाचे धनी
काटे यांना राज्य शासनाने शेतीनिष्ठ शेतकरी व सेंद्रीय शेतीसाठी कृषिभूषण हा पुरस्कार दिला आहे. राज्यभरातील शेतीचे अभ्यासक व विद्यार्थी त्यांच्या शेताचा अभ्यास करण्यासाठी येतात. संकरित जातींची लागवड शेवग्याच्या पीकेएम-२१, चिकूची क्रिकेट बॉल व कालीपत्ती आणि लिंबूच्या साई शरबती या जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली होती.
ससे पालन, मधुमक्षिका पालन
ससे पालन व मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय काटे यांनी सुरू केला आहे. अंभुरा (आफ्रिकन) जातीचे ससे आहेत. त्यात १६ माद्या व चार नर आहेत. ३0 ते ४0 हजार रुपये या व्यवसायातून वर्षाला त्यांना मिळतात. तर मधुमक्षिका पालनातून मध मिळतोच व मधमाशांमुळे बारीक अळ्य़ांचे नियंत्रणही होते.
खते, औषधांचा वापर शून्य
काटे यांनी रासायनिक खते व औषधांचा वापर १५ वर्षांमध्ये एकदाही केलेला नाही. फळ-झाडांच्या पालापाचोळ्याचे आच्छादन त्यांनी पूर्ण क्षेत्रात केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची अतिशय कमी गरज असते. आठ ते १0 दिवसांत एकदा पाणी दिले जाते. पालापाचोळ्यामुळे गांडुळांची संख्या वाढली आहे. व्हर्मीवॉश, जीवामृत, अमृतपाणी, दशपर्णीअर्क ते स्वत: तयार करतात. फवारणीसाठी दशपर्णीअर्क व व्हर्मीवॉशचा वापर करतात. तर इतर सेंद्रीय घटक झाडांना मुळाद्वारे महिन्यातून एकदा एकरी २00 लीटर या प्रमाणात दिले जातात. २00 लीटर जीवामृत किंवा दशपर्णीअर्क तयार करण्यासाठी त्यांना केवळ २00 रुपये खर्च येतो.
या वाळूच्या थरावर अर्धवट कुजलेले शेणखत असून, या शेणखताच्या थरावर शेवरीच्या पाल्याचा थर आहे. या मोठय़ा माठामध्ये पाव किलो गांडूळ सोडले असून, या माठावर एक कोरे लहान मडके आहे. कोर्या मडक्यातही पाणी भरले जाते. या कोर्या मडक्यातील पाणी झिरपून मोठय़ा म्हणजेच गांडूळ असलेल्या माठात पडते. तर मोठय़ा माठाच्या कापड टाकलेल्या छिद्रातून पाणी तळाशी ठेवलेल्या प्लास्टिकच्या भांड्यात साठवले जाते. अर्थात तळाशी ठेवलेल्या भांड्यात पडणारे हे व्हर्मीवॉश १00 लीटर पाण्यात अडीच लीटर या प्रमाणात पिकांवर फवारतात.
व्हर्मीवॉश तयार करण्यासाठी त्यांनी
एक मोठा जुना माठ तिवईवर ठेवला आहे. त्याच्या तळाशी छिद्र पाडले असून, त्या छिद्रावर आतून कापड टाकला आहे. या माठय़ाच्या तळात
जाड वाळू त्या जाड वाळूवर थोड्या बारीक वाळूचा थर आहे.
सेंद्रीय शेती करताना किमान तीन वर्षे चांगला परिणाम दिसून येत नाही, असा चुकीचा प्रचार तज्ज्ञ व शासकीय कृषी यंत्रणा करतात. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळत नाहीत.
-सतीश निंबाजी काटे,
कोळपिंप्री, ता. पारोळा
सतीश काटे यांचा संपर्क
९८९0८२५0३२