Fwd: डॉ. हेडगेवारांनी संघातून अस्पृश्यता कशी हद्दपार केली ?

9 views
Skip to first unread message

Amit Harhare

unread,
Apr 8, 2014, 12:38:54 PM4/8/14
to itmilanchinchwad
---------- Forwarded message ----------
From: "Vikas Phadke" <vika...@gmail.com>
Date: 08-Apr-2014 4:49 PM
Subject: Fwd: डॉ. हेडगेवारांनी संघातून अस्पृश्यता कशी हद्दपार केली ?
To:
Cc:

---------- Forwarded message ----------
From: Atul Agnihotri
Date: 2014-04-08 11:54 GMT+05:30
Subject: Fwd: डॉ. हेडगेवारांनी संघातून अस्पृश्यता कशी हद्दपार केली ?
To:

नमस्कार,

पर्वती भागाच्या प्रचार विभागाने पाठवलेला लेख..................
परत आपल्याला आला असल्यास क्षमस्व..................

मित्रहो, 

श्री. रमेश पतंगे यांनी लिहीलेला हा अप्रतिम लेख कृपया अवश्य वाचा आणि आपल्या मित्रांना अग्रेषित करा. 

आपली प्रतिक्रिया साप्ता. विवेक कडे पाठवा. --- vive...@gmail.com  


डॉ. हेडगेवारांनी संघातून अस्पृश्यता कशी हद्दपार केली ?  --- रमेश पतंगे ( साप्ता. विवेक - दि. ३० मार्च २०१४ )


(डॉक्टरांनी हिंदूंच्या मनात वैश्विक भाव निर्माण केला. मी हिंदू आहे म्हणून मला आदर्श मानव बनले पाहिजे, कारण मानवजातीला मानव्याचे दर्शन घडविण्याचे दायित्व माझ्यावर आहे. सगळी मानवजात सुसंस्कारित करणे आणि आपण सर्व मनुष्य या नात्याने सर्वांशी बांधलेलो आहोत, हा विश्वबोध निर्माण करणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी डॉक्टरांच्या पूर्वी हे कार्य सुरू केले होते. स्वामी विवेकानंद यांचे एक वाक्य प्रसिध्द आहे – विस्तार हेच जीवन आहे आणि संकुचितता हे मरण आहे. आपण ज्या वेळी संकुचित झालो, त्या वेळी आपला मृत्यू ओढविला आणि जेव्हा ‘आपण सर्व विश्वाला आर्य करू’ या भावनेने उभे होतो, तेव्हा सर्व जग पादाक्रांत करण्याची शक्ती आपल्यात आली. डॉक्टरांनी हाच वैश्विक भाव, एक अतिभव्य कल्पना सर्वांपुढे ठेवली.)

------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस हे नाव साऱ्या जगाला माहीत आहे, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण होते? आणि त्यांचे भारताच्या जडणघडणीतील योगदान कोणते होते? असे प्रश्न जर विद्वानांना विचारले तर त्यातील नव्वद टक्के लोकांना यातील काहीही माहिती नसते. उरलेल्या दहा टक्के लोकांना अर्धवट माहिती असते आणि काही लोकांना विकृत माहिती असते. आश्चर्याची गोष्ट अशी की या विद्वानांना आपल्या अज्ञानाची लाज किंवा शरम वाटत नाही.

अस्पृश्यतेचे उदाहरण घ्या! हिंदू समाजात अस्पृश्यता पाळली जाते. महाराष्ट्रातील थोर समाजशास्त्री महर्षी वि.रा. शिंदे यांचा ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ या शीर्षकाचा ग्रंथ फार प्रसिध्द आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटले की, 1901च्या जनगणनेनुसार 1907-08च्या सुमारास भारतात अस्पृश्यांची संख्या 5,32,36,632 (पाच कोटी बत्तीस लाख छत्तीस हजार सहाशे बत्तीस) आहे. त्यापूर्वी महात्मा जोतीराव फुलेंनी हिंदू समाजातील अस्पृश्यांची संख्या पाच ते सहा कोटी असावी असा अंदाज एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरदेखील अस्पृश्यांची संख्या सहा कोटीच्या आसपास आहे असे म्हणत. ‘अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे’ हे महात्मा गांधींचे विधान फार प्रसिध्द आहे.

अस्पृश्यतेची लक्षणे

अस्पृश्यतेची लक्षणे कोणती आहेत? ती अशी आहेत -

* अस्पृश्यता ही जन्माने ठरते.

* हिंदू समाजातील शेकडो जाती अस्पृश्य मानल्या गेल्या आहेत.

* अस्पृश्यांना स्पर्श केला असता विटाळ होतो (मनुष्य अपवित्र होतो).

* अस्पृश्यांचे व्यवसाय अत्यंत हीन दर्जाचे ठरविले गेले. हे व्यवसाय त्यांच्याशिवाय इतर कोणी करीत नाहीत.

* त्यांची वस्ती गावाच्या बाहेर असते.

* त्यांच्यावर कडक सामाजिक निर्बंध लादलेले असतात. सार्वजनिक ठिकाणी त्यांना जाता येत नाही. मंदिरात त्यांना प्रवेश नसतो. शिक्षण घेण्यास त्यांना मनाई केलेली असते.

* अत्यंत दारिद्रयात आणि सामाजिक उपेक्षेत त्यांना जीवन जगावे लागते. नगण्य अस्पृश्य जमीनमालक असतात. अन्य सर्व मजूर म्हणूनच काम करतात. आर्थिकदृष्टया ते शंभर टक्के परावलंबी असतात.

* ते ओळखू यावेत यासाठी त्यांच्या पोशाखावर निर्बंध घालण्यात आले.

लक्षणांची अशी यादी खूप मोठी करता येईल. अशा अस्पृश्य वर्गाला डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कसे सामावून घेतले? सवर्णांच्या मनातील संकुचित भाव कसा काढून टाकला आणि अस्पृश्यांच्या मनातील हीन भाव त्यांनी कसा नाहीसा केला? याचा समाजशास्त्रीय आणि संघटनशास्त्रीय अभ्यास करण्याचे भारतातील एकाही विद्वानाला सुचत नाही, ही फार मोठी वैचारिक दिवाळखोरी आहे.

अस्पृश्यता नाहीशी व्हावी, यासाठी आपल्या देशात महात्मा बसवेश्वरांपासून ते महात्मा गांधींपर्यंत शेकडो थोर पुरुषांनी प्रयत्न केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रयत्न केले. ‘सर्व लिंगधारक समान आहेत, तिथे कोणी लहानमोठा नाही, स्पृश्य-अस्पृश्य नाही’ ही भावना बसवेश्वरांनी आपल्या शिष्यांत निर्माण केली. महात्मा गांधीजींनी हरिजन सेवक संघाची निर्मिती करून सर्व देशभर अस्पृश्यतेच्या दुष्ट रूढीविरूध्द प्रचंड जागृती केली. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात अस्पृश्यतेला थारा दिला नाही. त्यांच्या साबरमती किंवा वर्ध्याच्या आश्रमात सर्व अस्पृश्यांना मुक्त प्रवेश असे. गांधीजी म्हणत, ”हिंदू धर्मसुधारणेसाठी आणि त्याच्या रक्षणासाठी अस्पृश्यता नाहीशी करणे हे महान कार्य आहे. जर अस्पृश्यता कायम राहणार असेल, तर हिंदू धर्माचा मृत्यू अटळ आहे. आणि मी अस्पृश्यता राहण्याऐवजी हिंदू धर्म संपला तरी चालेल अशा मताचा आहे.” एवढे टोकापर्यंत जाऊन त्यांनी अस्पृश्यतेचा विरोध केला. त्यांनी हरिजन असे अस्पृश्यांचे नामकरण केले.

अस्पृश्यता निवारण

महात्मा गांधी यांचे प्रयत्न प्रामाणिक होते, हिंदू धर्माच्या आणि समाजाच्या सुधारणेचे होते. परंतु त्यांच्या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातून अस्पृश्यता गेली का? याचे प्रामाणिक उत्तर द्यायचे असेल तर हिंदू समाजातून अस्पृश्यता संपलेली नाही. अस्पृश्यांचे नामांतर हरिजन केल्याने फक्त शब्दबदल झाला, भावबदल झाला नाही. गांधीविचारांच्या प्रभावामुळे पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर, केरळमधील अनेक मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली, परंतु अस्पृश्यता संपली नाही.

RSS-Rashtriya-Swam-Sevak-Saअस्पृश्यता संपविण्याचा दुसरा महान प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आपल्या जीवनाचे ध्येय सांगताना ते म्हणाले की, ”अस्पृश्यतेच्या भिंतीवर डोके आपटून मी ती जमीनदोस्त करणार आहे आणि त्यात मला यश आले नाही, तरी माझे सांडलेले रक्त पाहून माझ्या अस्पृश्य बांधवांना लढण्याची प्रेरणा मिळेल.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र जीवन म्हणजे अस्पृश्यतेविरुध्दचा महासंग्रामच आहे. त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्टये अशी होती -

* त्यांनी गांधीजींचा हरिजन हा शब्द नाकारला, त्याऐवजी बहिष्कृत भारत हा शब्दप्रयोग दिला आणि नंतर राज्यघटनेत अनुसूचित जाती असा शब्दप्रयोग केला.

* अस्पृश्यता ही सवर्णांची लहर आहे, आम्ही तुम्हाला अस्पृश्य मानतो म्हणून तुम्ही अस्पृश्य, अशी सवर्णांची भावना होती.

* सवर्णांची ही लहर दयेची भीक मागून किंवा अर्जविनंत्या करून, मवाळ धोरण ठेवून बदलणार नाही, त्यासाठी संघर्ष केला पाहिजे.

* अस्पृश्यता का निर्माण झाली? तिला हिंदू तत्त्वज्ञानाचे पाठबळ कसे आहे? आणि हे पाठबळ मोडून काढण्यासाठी परंपरागत श्रध्दारूढी यांवर डॉ. बाबासाहेबांनी तुफान हल्ले चढविले.

* वर्णव्यवस्थेतून जाती आणि जातिव्यवस्थेतून अस्पृश्यता निर्माण झाली. म्हणून जातिनिर्मूलन झाले पाहिजे, हिंदू समाजाने एकवर्णीय होणे आणि सजातीय विवाहपध्दतीचा त्याग करणे आवश्यक आहे, त्याशिवाय जातीयता संपणार नाही आणि अस्पृश्यतादेखील संपणार नाही.

* डॉ. बाबासाहेबांचा हा लढा सामाजिक आणि राजकीय होता. अस्पृश्य अल्पसंख्य असून अल्पसंख्य म्हणून त्यांना घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे. अस्पृश्याने शिकले पाहिजे आणि प्रशासनातील मोक्याच्या जागा मिळविल्या पाहिजेत, सत्तेच्या राजकारणात उतरून राजसत्ता मिळविली पाहिजे. ‘राज्यकर्ती जमात बना’ हा त्यांचा संदेश आणि आदेश होता.

सामाजिक मानसिकता

डॉ. बाबासाहेब यांच्या कामामुळे अस्पृश्य वर्गात लोकविलक्षण जागृती झाली. त्यांच्या मनातील हीनभाव संपला. आपणही मोठे होऊ शकतो हे आत्मभान त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे ते जीवनाच्या सर्व क्षेत्रात आज प्रगतिपथावर घोडदौड करताना दिसतात. परंतु डॉ. बाबासाहेबांच्या कार्यामुळे सवर्णांच्या मनातील अस्पृश्यता संपली आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागते. लोक फार चलाख असतात. सरकारने अस्पृश्यताविरुध्द कायदे केले. जातिवाचक शिवी देता कामा नये किंवा जातीवरून दुसऱ्याला हीन लेखता कामा नये, तसे करणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामुळे लोक जातिवाचक शब्द बोलत नाहीत. याचा अर्थ त्यांच्या मनातून अस्पृश्यता गेली असा नसतो. पूर्वी अस्पृश्यांच्या वस्त्यांना महारवाडा म्हणत असत. महाराष्ट्रात आता त्याला राजवाडा म्हणतात. ”राजवाडयावरून आलो आहे” याचा अर्थ कोणता, हे बोलणाऱ्यालाही समजते आणि ऐकणाऱ्यालाही समजते. अमुक अमुक मनुष्य अस्पृश्य जातीचा आहे असे लोक म्हणत नाहीत. ते म्हणतात की तो दलित आहे किंवा सरकारचा जावई आहे. लग्नाची पत्रिका छापायला एक प्राध्यापक गेले होते. दुकानदाराला त्यांनी पत्रिकेचा मजकूर सांगितला. दुकानदार त्यांना म्हणाला, ”अच्छा! अच्छा!! तुम्हाला जयभीम पत्रिका पाहिजे.” अशी पानभर उदाहरणे देता येतील. पण विस्तारभयास्तव येथे थांबतो.

या पार्श्वभूमीवर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांच्या संघात अस्पृश्यता दिसते का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, अजिबात दिसत नाही. अस्पृश्यता का निर्माण झाली? अस्पृश्यतेमागे धर्म तत्त्वज्ञान कसे उभे आहे? अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था यांचा संबंध काय? या प्रश्नांची डॉ. हेडगेवारांनी मीमांसा केली नाही. ग्रंथही लिहिले नाहीत. एकही भाषण दिलेले नाही. अस्पृश्यता किती वाईट आहे आणि ती घालविणे का आवश्यक आहे, याचा शब्दोच्चारदेखील केलेला नाही. असे काहीही न करता त्यांनी संघातून अस्पृश्यता हद्दपार केली. हे त्यांना कसे शक्य झाले?

संघाची स्थापना

डॉ. हेडगेवारांनी आपल्या डोळयांपुढे एक ध्येय ठेवले. ध्येय होते हिंदू समाज संघटनेचे! हिंदू समाज संघटित का करायचा तर हिंदू असंघटित आहेत म्हणून! हिंदू असंघटित कशामुळे आहेत? हिंदू असंख्य जातीत विभागले आहेत. अनेक भाषांत विभागलेले आहेत. अनेक पंथात विभागलेले आहेत. विभागणी झाली की माणूस संकुचित होतो. त्याचे विचार संकुचित होतात. विचार संकुचित झाले की तो स्वार्थी होतो. तो स्वतःच्या हिताचा विचार करतो, स्वतःच्या जातीचा जास्तीत जास्त विचार करतो. 1920 साली महात्मा गांधींचा भारतीय राजकारणात एकाधिकार निर्माण झाला. 1924पासून डॉ. आंबेडकर भारतीय समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय झाले. 1925 साली डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून ते समाजसंघटनेच्या कामात सक्रिय झाले.

संघाची उद्दिष्टे

ज्याला संघटन करावयाचे आहे, त्याला विषमतेच्या आधारावर संघटन करता येत नाही. जाती, पंथ, भाषा, अस्पृश्यता असे सारे भेद कायम ठेवून मी समाजाचे संघटन करीन, असा विचार डॉक्टरांनी केला नाही. समाजात हे भेद आहेत. परंतु भेदाच्या पलीकडेही समाजाला जोडणाऱ्या भावना आहेत. सांस्कृतिक मूल्ये आहेत, श्रेष्ठ इतिहास आहे, महान आदर्श आहेत. डॉ. हेडगेवारांनी भेदांचे सर्व विषय बाजूला ठेवले आणि समाजाला जोडणाऱ्या घटकांवर भर दिला. त्यांनी प्रामुख्याने पुढील भावना निर्माण करण्यावर भर दिला -

* आम्ही सर्व हिंदू आहोत, हिंदू हीच आमची ओळख, हिंदू हीच आमची जात, हिंदू हाच आमचा धर्म.

* आमचे एक सनातन राष्ट्र आहे आणि ते हिंदू राष्ट्र आहे.

* आम्ही असंघटित झाल्यामुळे आमचे राष्ट्र दुर्बळ झाले आहे. आम्ही संघटित झालो, तर राष्ट्र सबळ होईल.

* भारत ही आमची मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे, पुण्यभूमी आहे.

* भारताच्या उत्थानात माझे उत्थान आहे, भारताच्या पतनात माझे पतन आहे.

* समग्र हिंदू समाज त्याच्या सर्व गुणदोषांसहित माझा आत्मीय समाज आहे. तो आज दुर्बळ आहे, विकलांग आहे. त्याला सबळ करणे हे माझे परमकर्तव्य आहे आणि हाच सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे.

सर्व हिंदूंमध्ये हा भाव निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सभा, भाषणे, सत्याग्रह, आंदोलन यांपैकी कोठलाही मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी संघाची शाखा सुरू केली. प्रत्येकाला जे चोवीस तास मिळतात, त्यातील एक तास देशासाठी द्या, शाखेत या असे आवाहन त्यांनी केले. संघाची कार्यपध्दती त्यांनी बसविली. 1925 साली त्यांनी संघाच्या शाखा सुरू केल्या आणि 1940पर्यंत त्याचा सर्व देशभरात विस्तार केला. या शाखेत त्यांनी काय केले? पहिली गोष्ट त्यांनी हिंदू समाजातील स्पर्शबंदी मोडीत काढली. शाखेत येणारे तरुण, मुले एकत्र खेळतात आणि एकमेकांना स्पर्श केल्याशिवाय खेळता येत नाही. त्यांनी स्पर्शबंदी मोडली. शाखेत त्यांनी भेटीबंदी मोडली. कोणतीही शाखा एकजातीय शाखा होणार नाही, याची काळजी त्यांनी प्रारंभापासून घेतली. अठरापगड जातीची मुले शाखेत येऊ लागली, खेळू लागली, एकत्र कार्यक्रम करू लागली. परजातीला भेटण्याची बंदी शाखेने मोडली. शाखेचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम होऊ लागले. अशा कार्यक्रमात घरून आणलेल्या अन्नाची अदलाबदल होऊ लागली. दुसऱ्याच्या घरचे आणि हातचे अन्न निषिध्द मानण्याची प्रथा मोडीत काढली. शाखेने भोजनबंदी मोडली. संघकामाच्या विस्तारासाठी स्वयंसेवक वेगवेगळया प्रांतात गेले. अनोळखी ठिकाणी राहिले. आणि 1960नंतर ते विदेशातही गेले. त्यांनी सिंधुबंदी मोडली. जसजसा संघकार्याचा विस्तार होत गेला, तसतसा व्यापक समाजघटकाशी संबंध निर्माण होत गेला आणि त्यातून स्वाभाविक अनुरूप तरुण-तरुणीचे विवाह होऊ लागले. पुरोगामी भाषेत ज्याला आंतरजातीय विवाह म्हणतात, ते संघात सहजपणे होऊ लागले. प्रस्तुत लेखकाच्या तीन बहिणींची आणि तीन मुलींची लग्ने जातीपातींचा विचार न करता हिंदू तरुणांशी झाली.

कार्यपध्दती

डॉ. हेडगेवारांनी अस्पृश्यतेची शाब्दिक मीमांसा जरी केलेली नसली, तरी त्यांनी केलेल्या कृतीतून त्यांनी कशी मीमांसा केली असेल, याचा अर्थबोध होतो. अस्पृश्यता ही सवर्णांची लहर आहे, अस्पृश्यता ही सवर्णांच्या मनात असते, ती मनात परंपरेने आणि रूढीने बसलेली असते. परंपरा आणि रूढी सहजपणे सोडायला कुणी तयार नसतात. जी वहिवाट पडली ती तशीच चालवायची, ही सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती असते. वेगळया वाटेवरून चालायला तो तयार नसतो. मी तुला वेगळया वाटेवरून घेऊन जात आहे असे डॉ. हेडगेवार कधी म्हणाले नाहीत.

डॉ. हेडगेवारांची भाषा कशी असे? ते म्हणत, ”आपले काम ईश्वरीय कार्य आहे.’ या एकाच वाक्यात ‘गागर में सागर’ असा अर्थ भरलेला आहे. ईश्वराचे कार्य म्हणजे सत्याचे कार्य, न्यायाचे कार्य आणि सर्व भूतमात्रांच्या कल्याणाचे कार्य होय. ईश्वराचे कार्य म्हणजे समतेचे कार्य. सर्व भूतांप्रती समत्व पाळणे हे ईश्वरी कार्य आहे. कारण आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ‘एकच ईश्वर सर्वव्याप्त आहे. तो चराचरांत आहे. अणुरेणूत आहे. त्याला लिंगभेद नाही, त्याला वंशभेद नाही, त्याला जातिभेद नाही. दुसऱ्या माणसाला जवळ करणे म्हणजे त्याच्यातील ईश्वराच्या समीप जाणे होय. पू. गुरुजींनी आपल्या कार्यकाळात डॉक्टरांनी सांगितलेला हा ईश्वरी अनेक बौध्दिकांतून उलगडून दाखविलेला आहे.

डॉ. म्हणत की आपले कार्य सनातन आहे. मी काही नवीन सांगत नाही. परंपरेने चालत आलेला विषयच मी मांडतोय. आपण तो विसरलो. मी फक्त त्याची आठवण करून देण्याचे काम करीत आहे. डॉ. हेडगेवारांनी अत्यंत संकुचित आणि स्वार्थी झालेल्या हिंदू माणसाचे मन थोडे विशाल केले. त्याला व्यापक विचार करायला शिकविले. संकुचिततेच्या डबक्यात पोहणाऱ्याला विशाल सागरात नेऊन सोडले. आणि हिंदू माणसास जेव्हा भव्यतेचे दर्शन होऊ लागले, तेव्हा आपोआपच त्याला आपल्या संकुचितपणाची, कोत्या विचारांची लाज वाटू लागली आणि हे सर्व भाव आपोआपच गळून पडले. डॉक्टरांना त्यासाठी झाडू फिरवावा लागला नाही. मानसिक स्तरावर त्यांनी हे काम एखाद्या कुशल शल्यविशारदाला लाजवील इतक्या कौशल्याने केले. संघस्वयंसेवकाच्या मनातून त्याची जात काढून टाकली, त्याच्या मनातून जातीय श्रेष्ठत्वाचा अहंगंड काढून टाकला, अस्पृश्यतेचा भाव मिटवून टाकला.

भावजागृती

डॉक्टरांनी हिंदूंच्या मनात वैश्विक भाव निर्माण केला. मी हिंदू आहे म्हणून मला आदर्श मानव बनले पाहिजे, कारण मानवजातीला मानव्याचे दर्शन घडविण्याचे दायित्व माझ्यावर आहे. सगळी मानवजात सुसंस्कारित करणे आणि आपण सर्व मनुष्य या नात्याने सर्वांशी बांधलेलो आहोत, हा विश्वबोध निर्माण करणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी डॉक्टरांच्या पूर्वी हे कार्य सुरू केले होते. स्वामी विवेकानंद यांचे एक वाक्य प्रसिध्द आहे – विस्तार हेच जीवन आहे आणि संकुचितता हे मरण आहे. आपण ज्या वेळी संकुचित झालो, त्या वेळी आपला मृत्यू ओढविला आणि जेव्हा ‘आपण सर्व विश्वाला आर्य करू’ या भावनेने उभे होतो, तेव्हा सर्व जग पादाक्रांत करण्याची शक्ती आपल्यात आली. डॉक्टरांनी हाच वैश्विक भाव, एक अतिभव्य कल्पना सर्वांपुढे ठेवली. नुसती कल्पनाच पुढे ठेवून ते थांबले नाहीत, तर आपले संपूर्ण आयुष्य या ध्येयासाठी समर्पित करून टाकले. डॉ. हेडगेवार म्हणजे ध्येयाची साक्षात मूर्तीच होते. ‘ध्येय आया देह लेकर!’ ही उक्ती त्यांना तंतोतंत लागू पडणारी आहे.

डॉ. हेडगेवार संघस्वयंसेवकांच्या मनातून अस्पृश्यतेचा भाव दूर करू शकले, याचे कारण असे की त्यांनी अस्पृश्यांना अस्पृश्यतेची आठवण करून दिली नाही, त्यांच्यासाठी कोणताही वेगळा शब्दप्रयोग केला नाही आणि सवर्णांवर कधी आघात केले नाही. सवर्णांना त्यांच्या सवर्णत्वाची जाणीव करून दिली नाही. परंतु सवर्णांना आणि अस्पृश्यांना त्यांनी ते विसरलेली ओळख मात्र करून दिली. ती ओळख होती स्वतःच्या हिंदूपणाची! मी कोण आहे? तर मी हिंदू आहे. हिंदू हीच माझी ओळख! म्हणून संघात एक गीत आपोआप निर्माण झाले – ‘आम्ही हिंदू ही तर आमची स्वाभाविक ललकारी रे!’

महात्मा गांधी यांनी वर्ध्याच्या शिबिराला भेट दिली असता त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की, ”या शिबिरात अस्पृश्य किती आहेत?” अधिकारी म्हणाले, ”अस्पृश्य कोणीच नाहीत, सर्व हिंदू आहेत!” या उत्तराने समाधान न झाल्यामुळे महात्माजींनी स्वयंसेवकांना त्यांच्या जाती विचारल्या, नावे विचारली आणि त्यांच्या लक्षात आले की संघात अठरापगड जातीची माणसे आहेत. 1939 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुणे येथे चालू असलेल्या संघ शिक्षा वर्गास भेट देण्यास आले होते. त्यांनीही स्वयंसेवकांना असाच प्रश्न विचारला. तेव्हा त्यांच्याही लक्षात आले की, हिंदू या एका छत्राखाली अठरापगड जातीचे तरुण एकत्र राहतात, खातात, पितात.

शेवटी, आणखी एका मुद्दयाचे स्पष्टीकरण करून हा लेख संपवितो. अस्पृश्यता हा जर्जर रोग आहे. मानसशास्त्रीय स्तरावरील त्याचा इलाज डॉ. हेडगेवारांनी शोधून काढला. अस्पृश्य वर्गाच्या सबलीकरणाचा मार्ग डॉ. बाबासाहेबांनी शोधला आणि महात्मा गांधीजींनी अस्पृश्यांविषयीच्या सवर्णांच्या कर्तव्यबोधाचा मार्ग धरला. हे तिन्ही मार्ग एकमेकांना पूरक बनवूनच कार्यरत राहायला हवे! आपल्याच मार्गाने अस्पृश्यता संपेल या भ्रमात कुणी राहू नये. जटिल सामाजिक प्रश्नांना एकच एक उत्तर असू शकत नाही. म्हणून कोणताही अभिनिवेश न बाळगता परस्परांच्या कार्याचे योग्य मूल्यांकन करून एकमेकांना पूरक बनून काम करण्याची सवय लावून घेण्याची आवश्यकता आहे.

vive...@gmail.com


Reply all
Reply to author
Forward
0 new messages