दुर्ग दुर्गट भारी
माझ्या ट्रेकर दोस्ता
“दुर्ग दुर्गट भारी” हा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची माहिती देणार्या पुस्तिकांच्या प्रसिद्धीचा संकल्प आम्ही केला तेव्हा थोडी धाकधूक होती. या पुस्तिका कोण वाचेल? आपल्या दरी खोर्यात भटकणार्या मावळ्यांना नेटवर बसायला वेळ असतो का ? आपण जे काही प्रसिद्ध करू त्याची किंमत कोण जाणेल? वाचणार्यांना आवडेल का ? एक ना अनेक.
पण ठरवलं. अगदी एका ट्रेकर ला जरी हे महत्त्वाचं वाटलं तरी पुढे हे नेटाने न्यायचंच आणि महाराष्ट्रातल्या सुमारे दोनशे किल्ल्यांच्या वैभवाची ही एक भव्य गाथा उभी करायची असं ठरवलं. एकेक पुस्तिका अगदी पन्नास पानांची म्हटली तरी किमान दशसहस्त्र पानांचा हा ऐवज असणार आहे. आणि महिन्याला दोन किल्ले म्हटलं तरी आठेक वर्षांचा हा प्रवास असणार आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नोहे. आणि जर श्रींची इच्छा असेल तर रसद मिळेलच. सगळे गड फ़त्ते करू आणि मगच महाराजांचं नांव घेऊ, अशा शपथेने कामाला सुरूवात केली.
आणि भावा (आणि ताई सुद्धा, हो! पहिली मेल एका मुलीची होती. मंजिरी दाभोळकर, एकरकमी चाळीस किल्ल्यांची माहिती देणारी.), पहिल्या महिन्यातच तुझी मेल मिळाली. तुझ्या मदतीची भावना पोचली. उमेद वाढली. अक्षरशः शेकडो मेल्सचा पाऊस पडला. हे इतकं अनपेक्षित होतं की या मेल्सना रिप्लाय देण्याचं भान राहिलं नाही. वेळही नव्हता. पण खरंच सांगतो, या प्रत्येक मेलने आमचा संकल्प अधिकाधिक दृढ होत गेला. म्हणून आज हा पत्रप्रपंच .
अशा या भक्कम रसदीच्या जोरावर आम्ही पुढील नऊ रत्नांचा संकल्प जाहीर करत आहोत.
१ सिंहगड
२ रायरेश्वर
३ केंजळगड
४ लोहगड
५ राजगड
६ पुरंदर
७ कर्नाळा
८ माहुली
९ कळसुबाई
पुढील काही दिवसांत या किल्ल्यांवर काम करण्याची इच्छा आहे. पहिली पुस्तिका असेल सिंहगड. साधारण २० ऑगस्ट पर्यंत ही तयार होईल.
तर मित्रा. आता तुझी बारी. या नऊ स्थानांपैकी कोणत्याही एका किंवा अनेक स्थानांची माहिती तुझ्याकडे असेल तर कृपया त्वरित आमच्याकडे पाठव. सिंहगडाची तर त्वरित.
ही माहिती खालील पैकी कोणतीही असू द्या. यातल्या एक किंवा अनेक मुद्द्यांवर आपण लिहू शकता.
किल्ल्याचे नांव, नांवे, मूळ नांव, नांवामागचा इतिहास इत्यादी
या किल्ल्याचा इतिहास. ऐतिहासिक महत्त्व. आजच्या काळातले महत्त्व.
किल्याच्या भॆटीचं रंजक लिखाण, प्रवासवर्णानात्मक, मजेशीर, आकर्षक, उत्सुकता वाढवणारं, जे वाचून वाचकाला त्या किल्ल्याला भेट द्यायची इच्छा वाढीला लागेल. आणि भेट दिलेल्यांना पुन्हा एकदा जाऊन यावंस वाटेल. आणि हो. असेही काही वाचक आहेत जे वयामुळे म्हणा किंवा परदेशात वास्तव्याला असल्यामुळे म्हणा, अशी रपेट करू शकत नाहीत. त्यांना घरबसल्या फ़ेरफ़टक्याचं थोडं समाधानही लाभेल. तसंही महाराष्ट्रातले सगळे किल्ले भेटणं महाराज आणि बाबासाहेबांच्या सारख्यांनाच जमावं.
किल्ल्याचा नेमका पत्ता, जवळचे गांव,
वाटा, निरनिराळ्या शहरांपासून अंतर
जाण्यायेण्याचा वेळ, खर्च, किल्ल्यात अंदाजे किती वेळ लागतो
रहाण्याची जागा. बुकिंगचा नंबर.
धोके, धोक्याच्या जागा, प्राणी, अपघाती जागा, मधाचे पोळे , खाजखुजली वगैरे .
प्रेक्षणीय गोष्टी, जागा, वस्तू, वास्तू, खुणा.
वर्षातला किंवा महिन्यातला खास एखादा दिवस विशेष , ज्या दिवशी किल्ल्यावर एखादा उत्सव वगैरे असतो. किंवा किल्ल्याच्या इतिहासाशी निगडीत दिवस.
फ़ोटोजेनिक स्थळं. निसर्ग सौंदर्य
खाण्या पिण्याची सोय. (खाण्याचीच !)
त्या परिसरातला एकादा विशेष खाद्यपदार्थ (उदरभरण नोहे. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक दहा मैलांवर चवही बदलते. तेव्हा एखाद्या भागात जाऊन आल्यावर एखादा वैशिष्ट्य असलेला खास पदार्थ चाखायलाच हवा)
जवळचा पोलीस स्टॆशन नंबर, इस्पितळ, डॉक्टर यांची माहिती.
या किल्ल्यासंबंधीच्या वेब साईट्स आणि ब्लॉग्स ची यादी.
जवळच्या दुकानांची माहिती
तुमच्याकडे असलेले या स्थळाचे फ़ोटॊ
किल्ल्याचा नकाशा
एरियल फ़ोटो, गुगल मॅप
विशेष प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती
जवळचे, वाटेतले इतर किल्ले . एखादं आवर्जून भेट देण्याजोगं ठिकाण.
इतर काही विशेष महत्त्वाची माहिती.
वर दिलेल्या किल्ल्यांव्यतिरिक्त इतर एखाद्या किल्ल्याची माहिती आपल्याकडे असल्यास तसे कळवावे, म्हणजे त्या किल्ल्याच्या वेळी संपर्क साधता येईल.
ही माहिती देताना
स्वतःचं नांव आणि माहिती द्यावी.
या माहितीचा सोअर्स द्यावा.
शक्य असल्यास स्वतःची ई मेल आणि फ़ोन नंबर द्यावा. म्हणजे भेट देऊ इच्छिणारा आपल्याला काही शंका डायरेक्ट विचारू शकतील.
काय दोस्ता ! जमेल ना एवढं ?
धन्यवाद मानत नाही. आप्ल्यांचे आभार काय मानायचे ?
नचिकेत जोशी
संपादक , दुर्ग दुर्गट भारी
सुनिल सामंत
ई साहित्य प्रतिष्ठान