



पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
पुराणातील श्लोकाप्रमाणे
वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||
अर्थ-
वि- विधाता- ब्रम्हदेव
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
ल- लक्ष्मीकांत- विष्णू
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.
|| श्रीविठ्ठल मुर्तीवर्णन ||
दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे.
श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेवून समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.
द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वत: श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.
श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येवून दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.
पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.
पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात
|| पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा ||
|| पंढरपुर महात्म्य ||
* पंढरीचा पौराणिक महिमा *
वारकर्यांचेच नव्हे, तर अनेक वैष्णवसंप्रदायांचे, केवळ महाराष्ट्रीयांचेच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशादि अनेक प्रांतातील अनेक लोकांचे, मराठी भाषिकांचेच नव्हे तर अनेकविध भाषिकांचे परमात्मा पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहे. अनेक संतानी या देवाचे माहात्म्य गाइलेले आहे. या दैवताची प्राचीनता यांस उपनिषदातील कथासंदर्भाशी जोडणारी आहे. छांदोग्य-उपनिषदाच्या चवथ्या अध्यायात आरंभीच ‘जानश्रुती’ नावाच्या राजाची कथा आली आहे.त्या राजास तो चांदण्याचा आनंद घेत बसला असता, काही हंसांचा संवाद कानावर आला, आकाशमार्गाने जाणारे हे हंस सामान्य कोणी नसून ऋषी होते. त्यांनी आपसात चर्चा चालविली होती. एकाने चंद्रांच्या पडलेल्या टपूर चांदण्याचे वर्णन केले. तेव्हा दुस-याने या चांदण्याहून सौख्यदायी जानश्रुती राजाचे कर्तृत्व असल्याचे सांगितले. तेव्हा अजून एक पक्षी बोलला की, ‘जानश्रुती’ राजाहूनही एक विलक्षण तेजस्वी व्यक्ती जगात आहे,तिचे नांव ‘रैक्व’. हा एक गाडीवान् आहे. पण ब्रम्हज्ञ आहे. जानश्रुतीच्या कानावर हे शब्द पडताच, त्याने या रैक्वाचा अनेक स्थानात शोध चालविला. शेवटी काश्मीरमध्ये हा रैक्व त्याला भेटला. त्या रैक्वाच्या संशोधनप्रसंगी जानश्रुती पंढरीत आल्याचा उल्लेख आहे-
'ततो निवृत्त आयात: पश्यन्भीमरथीतटे |
द्विभुजं विठ्ठलं विष्णुं भुक्तिमुक्तिप्रदायकम् |
यत्र भीमरथीतीरे बिन्दुमाधव संज्ञित:|
हरि: स वर्ततेSद्यापि भुक्तिमुक्तिप्रदो नृणाम् ||’
पद्यपु.|उत्तरखंड|गीता 6वा अध्याय- माहात्म्य | ५६,५७,५८ श्लोक,
अर्थ - फिरत फिरत तो तेथून निघून भीमरथीच्या तीरावर रैक्वास शोधत निघाला. भीमातीरांवर दोन हातांचा, भोग व मोक्ष देणारा ‘विठ्ठल’ नामक विष्णु जिथे आहे, तिथे तो आला. जिथे बिंदुनामक तीर्थात बिंदुमाधव या नावाने तो परमात्मा भीमातिरी आहे, तेथे तो राजा आला. तिथे माणसांना भोग व मोक्ष देणारा तो देव अद्याप आहे, असा तो उल्लेख आहे.
या पांडुरंगाचे महात्म्य सांगणारे पौराणिक म्हणवले जाणारे तीन ग्रंथ आहेत.
1) पद्यपुराण
2) स्कंद पुराण
3) विष्णुपुराण
एक पद्यपुराणान्तर्गत वाराहसंहितेल पांडुरंगमाहात्म्य आहे. याची अध्यायसंख्या ३२ व एकूण श्लोकसंख्या साधारणत: १२८९ आहे. सूतऋषी सर्व ऋषींना हे 'पांडुरंगमाहात्म्य' सांगतात. त्यात ते नारदांनी हे पूर्वी शेषास सांगितले आहे, व त्याही अगोदर पूर्वी शंकरांनी ते पार्वतीस सांगितले आहे, असा उल्लेख केला आहे. यात पंढरीत पांडुरंग कसे आले? त्याचे माहात्म्य काय? भीमेची उत्पत्ती कशी झाली? पांडुरंगाच्या पायाखालच्या विटेचा इतिहास काय? चंद्रभागा म्हणजे काय? क्षेत्रातल्या इतर देवता व प्रमुख तीर्थे कोणती? याविषयी बरीच माहिती दिली आहे. पंढरी ही एक यंत्रात्मक नगरी असून या यंत्राच्या मध्यस्थानी पंढरीनाथ विराजमान आहेत व तेथून त्रिकोण-अष्टकोणादी आवरणस्थानात इतर देव आहेत, असे सविस्तर सांगितले आहे. पंढरी म्हणजे काशी, नीरानरसिंहपूर हे प्रयाग व कोर्टी किंवा विष्णुपद हे गयाक्षेत्र आहे, अशी त्रिस्थळीयात्रा पंढरीसंबंधाने वर्णिली आहे. पंढरीतील काशीयात्रेचा विधीही सांगितला आहे. पंढरीत गयाश्राद्ध कसे करावे, याची माहिती दिली आहे.
दुसरे 'पांडुरंगमाहात्म्य' स्कंदपुराणाच्या उत्तरसंहितेतले असून त्याचे १२ अध्याय आहेत. एकूण श्लोक संख्या साधारणत: ८१३ आहे. यातही स्कंदांना ऋषींनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी ऋषींसह कैलासात शंकराकडे जाणे केले. शंकरांना पार्वतीने त्यावेळी तोच प्रश्न विचारला होता. उत्तर द्यायचे चालू होणार, इतक्यात स्कंदांनी ऋषीसंह येऊन तोच प्रश्न विचारल्यावरून शंकरांनी स्कंद, ऋषी व पार्वती सर्वांना पंढरीचा महिमा सांगितला.
'सर्वोत्कृष्ट दैवत, तीर्थ व क्षेत्र कुठे आहे' असा तो प्रश्न होता.
अर्थ- या क्षेत्रात सर्व देवांमध्ये उत्तमोत्तम असणारा, योगीश्वर, महाविष्णु आपल्या नऊ शक्तीसंह अद्याप राहतो. विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, पव्ही, सत्या, ईशाना, अनुग्रहा या त्या नऊ शक्ती आहेत.
तिसरे ‘पांडुरंगमाहात्म्य’ विष्णु पुराणातल्या विष्णुधर्मकथन प्रकरणात आले आहे. याचे सहा अध्याय असून श्लोक संख्या साधारण 186 आहे. वसिष्ठऋषींनी त्रित ऋषीला हे सांगितले आहे. यात पुंडलीकाची कथा सविस्तर आहे. त्याने केलेले पांडुरंगाचे यथार्थ सविस्तर वर्णन आहे. त्याच्यासाठी भगवंताचे येथे येणे झाल्यावर तो परमात्मा जशा रूपाने प्रकट झाला, तसाच त्याचा श्रीविग्रह ब्रम्हदेवाने तयार करून पुंडलिकास दिला, असे वर्णन आहे.
क्षेत्रेषु तीर्थेष्वथ दैवतेषु भक्तेषु सर्वेष्विह वै वरिष्ठम्|
श्रीपौण्डरींक किल चन्द्रभागा श्री विठ्ठलोयं मुनिपुण्डरीक:||
अर्थ- सर्व क्षेत्रात वरिष्ठ क्षेत्र श्रीपंढरी, सर्व तीर्थात वरिष्ठ तीर्थ चंद्रभागा, सर्व देवात श्रेष्ठ देव श्रीविठ्ठल व सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त श्रीपुंडलिंक हा आहे. या श्लोकाचा बरोबर अनुवाद श्रीतुकाराम महाराज एका अभंगात करतात-
अवघीच तीर्थे घडली एक वेळा | चंद्रभागा डोळा देखिलिया ||
अवघीच पापे गेली दिंगंतरी | वैकुंठ पंढरी देखिलिया ||
अवघिया संता एक वेळा भेटी | पुंडलिक दृष्टी देखिलिया ||
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक | विठ्ठलचि एक देखिलिया ||
असा हा पंढरीचा पुराणवर्णित महिमा आहे
||वारी||
वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.
अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात.
वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.
मुख्य चार यात्रा(वार्या)
१) चैत्री यात्रा
चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात.
२) आषाढी यात्रा
;
आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ " आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.
;
"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाडयातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातुन प्रदक्षिणा मार्गाने मिरवणुक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपुर येथे सार्या दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सार्यांना गोपालकाला वाटला जातो.
३) कार्तिकी यात्रा
;
कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.
४) माघी यात्रा
;
माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात.
