म. टा. प्रतिनिधी
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जात नाही, कारवाई करण्यात टाळाटाळ होते, कारवाई करण्यासाठी पैसे मागितले... अशा तक्रारी आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत करता येतील आणि तेही एसएमएसद्वारे! मुंबई पोलिसांनी मुंबईकरांसाठी ७७३८१४४१४४ आणि ७७३८१३३१३३ या दोन मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सहआयुक्त (प्रशासन) एस. पी. यादव यांनी शनिवारी हे क्रमांक जाहीर केले. या क्रमांकांवर केवळ एसएमएस करता येतील, फोन करता येणार नाही. या मोबाइलवर येणाऱ्या सर्व एसएमएसची नोंद एका रजिस्टरमध्ये करण्यात येणार आहे. त्या रजिस्टरचा सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) अभ्यास करतील आणि तो अहवाल मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर आयुक्त कारवाई करतील, असेही यादव यांनी सांगितले.