काय किल्ल्याचे नाव नव वाटते ? मला पण काही दिवसा पर्यंत माहित नव्हते . अचानक पणे किल्ल्याची माहिती मिळाली व किल्ला पाहून पण आलो. त्याचीच ही कहाणी.
त्याचे काय झाले, मध्य प्रदेश ची ट्रिप ठरवली. ओरछा, खजुराहो, पन्नाचे national park, चित्रकूट व अलाहाबाद असा plan ठरला. पन्ना जवळ अजय गड आहे. हा छत्रसाल राजांचा किल्ला. बाजीराव पेशव्यांनी मस्तानीला प्रथम येथेच पाहीले . चित्रकूट ला जाताना गड पाहण्याचे ठरले. ओरछाला व खजुराहोला light and sound show मध्ये किलींजरचा संदर्भ मिळाला. किल्ल्याचा सर्वच इतिहास नवा होता. आमच्या प्लानमध्ये किल्ला बसणार नाही असे वाटले. कारण आम्ही जाणार होतो पन्ना - सतना - चित्रकूट असे highwayने. खजुराहोला कळले अजय गड चढायला दोन तास लागतील नाही म्हटले तरी तासभर नक्की. गड पाहायला तास दोन तास. Highway सोडून ३० किलोमीटर वर अजय गड. बराच वेळ जाणार होता. सूर्या हॉटेलच्या receptionist म्हणाला किलींजर किल्ला जरूर पहा. किल्लाच्या वर पर्यंत गाडी जाते. किल्ला अजय गडच्या उत्तरेला म्हणजे चित्रकूटला जवळ आहे. फक्त Highway ने न जाता छोट्या रस्त्याने जावे लागेल पण संध्याकाळ पर्यंत मुक्कामी पोचू. मग काय अजय गडचा नाद सोडला व किलींजर कडे गाडी वळवली.

किल्ल्याची तटबंदी
किलींजर म्हणजे काळाचे पतन करणारा अर्थात शंकर. हलाहल प्राशन केल्यावर शंकर येथे आले अशी दन्त कथा. चांदेल राजानी त्यांची राजधानी दहाव्या शतकात येथे हलवली. चांदेल वंशाने खजुराहोची पण रचना ९५० ते १०५० मध्ये केली. किल्ला विन्ध्य पर्वत रागा मधील एका अलग डोंगरावर आहे.
पन्नापासून आडवळणाचा रस्ता घेतला. खेरा गावापासून एकदम चौपदरी highway लागला. १५ - २० किलोमिटर गेल्यावर परत एक पदरी खाच खड्याचा रस्ता. किलींजर पर्यटन स्थळ होणार आहे हे गावकरी सांगतात त्याचाच तो भाग असावा. असो.
किल्ल्याचा एक दरवाजा
किल्ल्याची बर्यापैकी डागडुजी केलेली आहे. हा दरवाजापण restore केलेला. औरंगजेबने वेढा घालून तोफा डागल्या. त्याच्या खुणा दरवाज्यावर आहेत. किल्ला पडला. हाच किल्ला चान्देलानी लढवला जेंव्हा महमद गझनी चालून आला (१०२२). विद्याधर राजाने हल्ला परतवला व खजुराहोची मंदिरे वाचली, नाही तर त्यांची तेव्हाच तोडफोड झाली असती. तीन वर्षांनी जेंव्हा महमद परत आला तेव्हा खंडणी देवून परत खजुराहो वाचवले. आत्तापर्यन्त महमदाने किती वेळा सोमनाथ लुटले याचीच चर्चा वाचनात आली. चान्देलानी एकदा तरी महमदला ठोकले हे वाचून बरे वाटले.
शेर शहा सुरी ह्या किल्ल्याच्या वेठ्यात मारला गेला. दारू गोळ्याच्या आगीत मारला गेला. (१५४५) तेव्हा किल्ला बुन्देलानी लढवला. हा शेर शहा कोण तर, हा बाबराचा एक सेनापती. हुमायूनच्या काळात त्याने बंगाल जिंकला, चित्तगाव पासून काबुल पर्यंत grand trunk road पोचवला. पातलीपुत्राचे पाटणा करून तेथून राज्य केले. पण सर्वात महत्वाचे म्हणजे मुघल साम्राज्याच्या सरकारी कारभाराची घडी बसवली. जी पुढे अकबराने पण चालीवली. इति Wikipedia. असो.
अमन सिंग महल
अमन सिंग महल जवळ पाण्याचा एक मोठा तलाव आहे. त्याची चांगली डागडुजी चाललेली दिसली.
तलावाची डागडुजी
किल्ल्यावर राणी महाल आहे. बाहेरून चांगला दिसतो. त्याची repair करण्यात येणार आहे. म्हणून आत जाण्यास बंदी होती.
किल्ल्यावर नीलकंठ मंदिर आहे. गेली १५०० वर्षे एकाच वंशातील पुजारी येथे पूजा करत आले आहेत असे तेथील पुजाऱ्याने सांगितले.
मंदिर एका कड्याच्या तोंडावर आहे. किल्ल्या वरून उतरून जावेलागते. मंदिराचा सभा मंडप पडून गेला आहे. षटकोनी असावा असे खांबाची रचना पाहुन वाटते. शंकरची पिंडी गुहेत आहे.


मंदिरा जवळच्या कातळावर २२-२५ फुटाची नीलकंठाची मूर्ती आहे.
मंदिराच्या आवारात काही चागली शिल्पे आहेत.

दारा जवळचा गणेश

किल्ल्यावर फारसे पर्यटक येत नसावेत. आम्हीच फक्त होतो. पायथ्याच्या गावचे लोक बकऱ्या घेऊन येतात. कायद्याने त्यांना तशी परवानगी नाही. मेंठपाल म्हणाला काय करणार आम्हाला जमीन नाही, बकऱ्या येथे चांगल्या चरतात म्हणून येतो.
आम्ही जेव्हा गाडीने किल्ल्यावर येत होतो तेव्हा पाच सहा तरुणांचा गट दिसला. सर्वच विकलांग होते. सावकाश किल्ला चढत होते. थांबून चौकशी केली. सर्वजण जगत गुरु रामभद्राचार्य Handicapped University चे विद्यार्थी होते. University चित्रकूटला आहे. मुले नवरात्राची सुट्टी म्हणून किल्ला पहायला आली होती. बरोबर कोणताही handicap नसलेला कोणीच नाही.

उमेश चौधरी
मुलांचा प्रयत्न पाहून वाटले की जर ही मुले येव्हढे कष्ट करून किल्ला पाहायला येतात तर बाहेरचे पर्यटक पण माहिती मिळाली तर जरूर वाकडी वाट करून किल्लींजरचा किल्ला पाहायला येतील. तुम्हाला काय वाटते?
रवींद्र आपटे
०३/११/२०१४
ता. क. जर लेख forward करावासा वाटला तर जरूर करावा, माझी ना नाही.