अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३६. जशी तुमची इच्छा |
![]() |
|
![]() |
![]() |
शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२ मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली. मी आता दृढनिश्चयी आणि संशयरहित
झालो आहे. आता जशी तुमची आज्ञा असेल, जशी तुमची इच्छा असेल तेच करीन! या
श्लोकात भगवंताच्या इच्छेनुरूप जगण्यात काय काय आड येतं, हे अर्जुनानं
सांगितलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे विस्मृती असते. माझा जन्म कशासाठी आहे,
याचं स्मरण नसतं. दुसरी गोष्ट मोह. अशाश्वत अशा भौतिकाचा तीव्र मोह शाश्वत
भगवंताच्या आड येत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी न होणे
अर्थात धरसोडपणा. भगवंताच्या मार्गाविषयी मला मधेच तीव्र जाणीव होते पण
निश्चय नसल्यामुळे त्या मार्गावर चालण्यासाठी सातत्य आणि चिकाटी नसते आणि
सर्वात शेवटची आणि महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे संशय. मी भगवंताचं म्हणून
काहीबाही करतोही पण त्यात खात्रीचा अभाव असतो. खात्री नसल्यामुळे जे करतो
त्यात मन पूर्णपणे ओतलं जात नाही, समरस होत नाही. या वरकरणी पाहता चार
स्वतंत्र गोष्टी भासल्या तरी त्या एकच आहेत. किंवा त्यातली एकजरी सुटली तरी
उरलेल्या आपोआप ओसरतील. त्यात सर्वात मुख्य किंवा या अडचणींचा उगमबिंदू
आहे तो मोह. अशाश्वताचा मोह आहे म्हणूनच अशाश्वताच्या प्राप्तीनेच सुख
मिळण्याची आशा आहे. त्यासाठी अशाश्वताच्या प्राप्तीचीच धडपड आहे.
अशाश्वतावरच विश्वास आहे. या मोहामुळेच शाश्वत भगवंताविषयी ठामपणा नाही.
गरिब असलो तरी चालेल पण भगवंत हवाच, असा भाव नसतो. माझी परिस्थिती
सुधारण्यासाठी मला भगवंत हवा असतो. वृत्तपत्रात एक बातमी वाचली. पालातल्या
गणेशोत्सवाची. रस्त्यावर राहाणाऱ्या भटक्या जमातीतल्या एका कार्यकर्त्यांनं
सांगितलं की, देवानं आम्हाला माणसाचा जन्म दिला हेच खूप केलं. त्याच्याकडे
आणखी काय मागायचं? हे वाक्य दिवसभर मनात रूंजी घालत होतं. एखाद्या
योग्याच्याच तोडीचं उत्तर आहे हे. तेव्हा मोहामुळे भौतिकाची ओढ असते आणि जे
अतुलनीय मानवी शरीर मला भगवंतानं दिलं आहे त्याच्या मुख्य हेतूचं विस्मरण
असतं. हा मोहसुद्धा नष्ट होतो केवळ त्याच्याच कृपेनं आणि तो कृपा तेव्हाच
करतो जेव्हा मी या मार्गावर चालू शकत नाही, मी असहाय्य आहे, याचं दुखं मला
तीव्रपणे होऊ लागतं! |