मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२ भज गोविंदम् या आदि
शंकराचार्य यांच्या स्तोत्राच्या अनुषंगाने आपण जो मागोवा घेतला त्याचा
समारोप करताना ‘भज गोविंदम्’ या दोन शब्दांचा अधिक विचार केला पाहिजे. यात
गोविंदाचं भजन करायला सांगितलं आहे. या ‘गोविंद’चा अर्थ काय? गोविंदचा
पहिला सरळ अर्थ आहे परमात्मा आणि दुसरा अर्थ दुनियेत गोवलेल्या माझ्या
मनाला त्या गुंत्यातून सोडविणारा सद्गुरू.
श्रीज्ञानदेवांच्या ‘हरिपाठा’चा मागोवा घेताना आपण पाहिलं होतं की ‘हरि’
म्हणजे परमात्मा आणि ‘हरि’ म्हणजे भवरोगाचं समूळ हरण करणारा सद्गुरू.त्या
सद्गुरूच्या बोधानुरूप आचरणाचा पाठ म्हणजे हरिपाठ! तर इथेही गोविंदचा दुसरा
अर्थ आहे सद्गुरू आणि भज गोविंदम् म्हणजे त्यांच्या स्मरणात जगणं.
श्रीशंकराचार्याच्या जीवनातही हा ‘गोविंद’ प्रकटलाच. नदीत मगरीनं बाल
शंकराचा पाय धरला आणि त्यांची आई धावत नदीकाठी आली. शंकरही आईला म्हणाला,
‘‘आई आता मी वाचत नाही. निदान आता तरी संन्यासाची परवानगी दे. त्यामुळे मी
मेलो तर मला निदान मुक्ती तरी मिळेल.’’ मातेनं जड मनानं परवानगी दिली आणि
शंकरानं मनातूनच संन्यास घेतला. तो संन्यास घेताच मगरीनं त्याचा पाय सोडला.
भवनदीच्या मध्यावर दुनियारूपी मगर तुम्हाला गिळू पाहाते पण त्या दुनियेत न
गुंतता मनातून संन्यस्त झालात तर तीच दुनियारूपी मगर तुम्हाला सोडून देते!
मगरीनं सोडल्यावर आईची समजूत घालून बालशंकर गुरूच्या शोधासाठी निघाले.
तुझा गुरू नर्मदातीरी ओंकारेश्वर येथे वाट पाहात आहे, असं साक्षात
श्रीकृष्णांनी स्वप्नात येऊन सांगितलं. त्याने आनंदून बाल शंकराने
अच्युताष्टकं हे स्तोत्र रचलं. ‘अच्युतं केशवं रामनारायणं’ हा आरतीच्या
शेवटी आपण म्हणतो तो श्लोक याच स्तोत्रातला. मग केरळातून हा मुलगा पायपीट
करीत ओंकारेश्वरी आला आणि ध्यानमग्न गोविंदपाद यांची समाधी उतरली. त्यांनी
प्रेमानं विचारलं, मुला तू कोण आहेस? बाल शंकरांच्या तोंडून शब्द बाहेर
पडले, चिदानंदरूपं शिवोऽहं शिवोऽहं! या बाल शंकराला गुरू गोविंद पाद यांनी
लोकशंकर केलं. सद्गुरूंच्याच चरणी बाल शंकराचे शंकराचार्य झाले. धर्मातील
अव्यवस्था दूर करणारे, वेद-उपनिषदादि समस्त ग्रंथातील अशुद्धी दूर करणारे,
देशभर धर्मचेतनेची केंद्रे स्थापन करणारे आणि इतके भव्य कार्य करूनही स्वत:
संन्यस्त विरक्त योगी म्हणून वावरणारे आद्य शंकराचार्य! उदंड ज्ञान
त्यांनी दिलं आणि शेकडो रचनांद्वारे पुढील पिढय़ांसाठीही ठेवलं. पण करायचं
असेल तर ‘भज गोविंदम्’च करा. साधायचं असेल तर हेच साधा कारण आयुष्य थोडं
आहे, ज्ञान अनंत आहे, त्याच्या चर्चेत वेळ घालवू नका, हेच ‘भज गोविंदम्’चं
सार आहे. आता उद्यापासून नव्या सत्यमार्गदर्शकाकडे आपण वळत आहोत. त्यासाठी
चौदाव्य शतकात जावं लागेल. धर्ममरतडांनी गजबजलेल्या काशीजवळच्या गल्लीतल्या
मस्तमौला विणकराकडे.. त्यांचं नाव आहे कबीर! चैतन्य प्रेम |