loksatta - arupache rup - chaitanya prem

13 views
Skip to first unread message

suhas joshi

unread,
Dec 3, 2012, 11:21:49 AM12/3/12
to dny-m...@googlegroups.com
Published: Friday, November 23, 2012
जगात परमात्मा भरून आहे, याचा नीट अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. या जगात आपण जगतो ते कशाच्या आधारावर? तर प्राणशक्तीच्या आधारावर. ही शक्ती जगात सर्वत्र भरून आहे. तिच्याच आधारावर या सृष्टीची घडामोड सुरू आहे. माझ्यासकट सर्व जीव प्राणशक्तीच्या आधारे जगत आहेत. ही शक्ती परमात्म्याची आहे आणि म्हणूनच सर्व जग त्याच्याच सत्तेने चालत आहे, असे आपण म्हणतो. आता आपल्या कर्मानुरूपचं प्रारब्ध आपल्या वाटय़ाला येतं आणि त्यात प्रयत्न व पुरुषार्थाची भर घालत आपण आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी आयुष्यभर झगडत राहातो. त्यातून नवं प्रारब्धही तयार होतं आणि पुढील जन्मांची बिजेही रोवली जातात. हा खेळ अविरत सुरू राहातो. तो थांबवायचा असेल तर त्याची सुरुवात 'घूँघट का पट खोल'पासून होते. हा घूँघट म्हणजे 'मी'पणा हे आपण  पाहिलं. घूँघटचा अजूनही व्यापक अर्थ आपण नंतर पाहूच. पण हा पट खोलायची सुरुवात आहे या जगाशी कटु व्यवहार न करण्यात. आता इथे 'कटु' म्हणजे काय? आपण पाहिलं की व्यवहारात कधीकधी कटुता अपरिहार्य असते. पण इथे अभिप्रेत असलेली कटुता काहीतरी वेगळीच आहे. ती हृदयात भिनणाऱ्या वैरासारखी आहे. मन आणि बुद्धीवर कब्जा करणाऱ्या नकारात्मक विचारासारखी आहे. प्रसंगानुरूप, कर्तव्यानुरूप, परिस्थितीनुरूप दुसऱ्याशी भांडावं लागलं तर भांडा, वाद घालावा लागला तर घाला पण हे सारं त्या प्रसंगापुरतं, त्या कर्तव्यापुरतं, त्या परिस्थितीच्या अटळतेपुरतं ठेवा. ते हृदयात जपू नका, मन आणि बुद्धीवर त्याला अंमल चालवू देऊ नका. कारण या अशाश्वत जगाशी कायमचा संबंध मग तो प्रेमाचा असो की वैराचा, ठेवता येतच नाही. मग हे वैर हृदयात रुजवण्यात काय अर्थ आहे? त्यासाठीच कबीरजी म्हणतात, 'घट घट में वहि साईं रमता, कटुक बचन मत बोल रे।' बोलणं आणि व्यवहार आटोपशीर ठेवण्याचा अभ्यास त्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला खरा संवाद आणि खरा व्यवहार त्या एकाशी साधायचा आहे! मग दुनियेत वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? पण याचा अर्थ असाही नव्हे की दुसऱ्याला तुम्ही आढय़, अहंकारी, आत्मकेंद्री वाटावे! सर्वाशी मिळूनमिसळून व्यवहार करावा, प्रेमानं वागावं पण खरं प्रेम, खरं मिलन त्या एका परमात्म्याशी साधायचं ध्येय विसरू नये. खरं पाहता दुनिया माझ्यामागे नसते तर मीच दुनियेमागे फरपटत असतो. त्यात वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा आत्मतृप्तीच्या अभ्यासात का रमू नये? एक माणूस दुसऱ्याच्या आग्रहाखातर पावसला येत होता. स्वामी अशक्तपणामुळे हळू आवाजात बोलतात, हे त्याला कळले होते. स्वामींसमोर येताच तो जरासा मोठय़ानं म्हणाला, 'मला कमी ऐकू येतं जरा जोरात बोला.' स्वामी हसले म्हणाले, तुम्ही बहिरे तर मी मुका! काय बोलणार? तेव्हा दुनिया आपणहून दुरावत असेल तर तिच्यामागे फरपटण्यापेक्षा आत्मतृप्तीच्या अभ्यासात डुंबा, असंच स्वामीही सुचवितात!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages