वाजले की बारा!
आज आपल्या महान देशाचा ६१वा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे देशभक्ती, तिरंग्याविषयी आणि देशाच्या सार्वभौम घटनेविषयी अभिमान व्यक्त करण्याचा दिवस असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात चित्र भलतेच दिसते. लाल किल्ल्यापासून गल्लोगल्ली होणारे झेंडावंदनाचे कार्यक्रम, दिल्लीत चालणारे तिन्ही सेनादल पथकांचे संचलन, राज्यांचे प्रतिनिधित्व करणार्या चित्ररथांची शोभायात्रा, जाहीर होणारी शौर्यपदके, मंत्र्यांच्या मानवंदना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक हक्काची सार्वजनिक सुट्टी, मौजमजा करण्याचा आणखी एक राष्ट्रीय दिवस. यापलीकडे या दिवसाचे महत्त्व नेत्यांच्या आणि जनतेच्या दृष्टीने राहिले आहे असे सध्याच्या परिस्थितीवरून अजिबात वाटत नाही. देशाभिमान ही चीज फक्त तोंडी लावण्यापुरतीच उरली आहे. मग तो स्वातंत्र्यदिन असो, प्रजासत्ताक दिन असो वा मतदानाचा हक्क बजावण्याचा दिवस असो. तुमच्या या लोकशाहीतील जवळजवळ निम्म्याहून अधिक जनता हा दिवस म्हणजे सुट्टीचा, सहलीचा, मौजमजेचा दिवस म्हणून समजते. नादान राज्यकर्त्यांनी या देशातील जनतेत राष्ट्रभक्तीची सच्ची भावना रुजविण्याचा प्रयत्नच कधी केला नाही. देश प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमके काय झाले हेसुद्धा अनेक जणांना माहीत नसेल. २६ जानेवारी १९५० या दिवशी या देशाची सार्वभौम घटना तयार झाली, तेव्हापासून हिंदुस्थान एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून गणला जाऊ लागला हे फक्त पाठ्यपुस्तकात शिकण्यापुरतेच मर्यादित राहिले. गेली साठ वर्षे जी कॉंग्रेजी मंडळी देशावर राज्य करीत आहे त्यांनी प्रजासत्ताकमधील
फक्त ‘सत्ता’ हाच शब्द लक्षात
ठेवला आणि कारभार केला. ना घटनेचा मान ठेवला ना प्रजासत्ताकाची शान राखली. त्यामुळेच ना देशद्रोही अफझल गुरूच्या फाशीची अंमलबजावणी होत आहे, ना मुंबईवर हल्ला करून आमच्या पोलीस आणि लष्करी अधिकार्यांचे, जवानांचे, निष्पाप नागरिकांचे बळी घेऊन रक्ताचे पाट वाहणार्या कसाई कसाबचे काही वाकडे होत आहे. जगाच्या पाठीवर दुसर्या कोणत्याही प्रजासत्ताक देशात इतकी बजबजपुरी माजली नसेल. सामान्य माणसाला न्याय मागण्यासाठी न्यायालयात सतत हेलपाटे घालावे लागतात. धनदांडग्यांची, व्यसनी पोरेटोरे बेधडक गाड्या उडवून पादचार्यांना चिरडून सहीसलामत सुटतात आणि सामान्य माणूस ‘कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये’ या म्हणीचा प्रत्यय घेत अन्याय मुकाटपणे गिळून खालमानेने वावरतो. हेच आपल्या प्रजासत्ताकाचे आणि सार्वभौम राष्ट्राचे फलित आहे काय? हा देश जगात ताठ मानेने वावरावा असे प्रयत्न या कॉंग्रेजी राज्यकर्त्यांनी कधीच केले नाहीत. इस्रायलसारखे छोटे राष्ट्र आपल्यानंतर उदयाला येऊन आज इतके स्वयंपूर्ण बनले आहे की कोणत्याही देशाची या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नाही. त्या पाकिस्तानला आपण दोन वेळा युद्धात चोपून काढले आणि त्या महापराक्रमावर आजपर्यंत आपण स्वत:ची पाठ थोपटीत राहिलो, परंतु गेली अनेक वर्षे देश अतिरेक्यांनी पोखरून काढला आहे. कोण कुठले दहशतवादी या देशात घुसून तुमच्या-आमच्या डोळ्यांसमोर खुलेआम घातपात, बॉम्बस्फोट, रक्तपात, हत्याकांड घडवू शकतात, यात कसली आली आहे संरक्षणसिद्धता आणि कसले आले आहे शौर्य? हिरव्यांची एकगठ्ठा मतपेटी शाबूत राखण्यासाठी देशद्रोही कोण आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कोणती विषवल्ली त्यांना पोसते आहे हे माहिती असूनही हिरव्या दाढ्या कुरवाळण्यातच या कॉंग्रेजी राज्यकर्त्यांनी आपली हयात घालवली आणि या देशाला कधी नव्हे एवढे दुबळे करून टाकले. त्यांना या देशात राहून
देशाविरुद्ध कारस्थाने रचणारे लांडगे
दिसत नाहीत, मात्र सच्चा राष्ट्रप्रेमाने ‘भारतमाता की जय’ म्हणणार्या हिंदुत्ववाद्यांमध्ये ‘भगवा’ दहशतवाद दिसतो. इतके ते मुस्लिमप्रेमाने अंध झाले आहेत. आजच्या प्रजासत्ताकदिनी कश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवू पाहणार्या एकता यात्रेच्या कार्यकर्त्यांवर ते देशद्रोही कृत्य करीत असल्याच्या थाटात सरकारी अत्याचार सुरू आहे. आपण हिंदुस्थानात राहात आहोत की पाकिस्तानात वावरत आहोत असे वाटल्यावाचून राहात नाही. कसले आले आहे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक? भ्रष्टाचाराने पोखरलेला देश हीच आपली ‘आदर्श’ प्रतिमा आज जगापुढे उभी आहे. ‘स्पेक्ट्रम घोटाळा’ असो वा आणखी कुठला. खाबूगिरीने वरपासून खालपर्यंत या देशात उच्छाद मांडला आहे. सरकारी यंत्रणेतील कोणतीही कामे लाच दिल्याशिवाय होत नाहीत हे ढळढळीत सत्य सर्वांनाच माहीत आहे. कामे करणार्या सर्वांनाच चिरीमिरीपासून ‘पेटी’ आणि ‘खोक्या’पर्यंत काहीतरी लागतेच. लाचदेखील आता ‘कोटींच्या कोटी उड्डाणे’ घेत असते. मंत्र्यांचे फ्लॅटस्, करोडोंची मालमत्ता, स्वीस बँकेतील पैसे याची माहिती सामान्य माणसाने कितीही डोकेफोड केली तरी त्याला माहितीच्या हक्कानेही समजणार नाही. सगळा कारभारच बेहिशेबी आहे. एकीकडे महागाईचा भस्मासुर वाढत आहे तर दुसरीकडे सामान्य शेतकरी कंगाल झाला आहे. त्याच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडत आहेत. कांदा रडवीत आहे. तरी सामान्य माणसाला कोणी वाली उरलेला नाही. राष्ट्राला उपयोगी पडणारे हिंदुतेज, क्षात्रतेज नष्ट करण्याच्या मागे राज्यकर्ते लागले आहेत. यात ‘आम आदमी’ भरडला जात आहे. या प्रजासत्ताकात त्याला काडीचीही किंमत उरलेली नाही. मात्र तरीही प्रजासत्ताकदिनाचा विजय असो, असे म्हणण्याशिवाय त्याला पर्याय तरी कुठे आहे? राजधानीतील ‘चित्ररथां’मध्ये यंदा महाराष्ट्राचा लावणी नृत्यावर आधारित चित्ररथाचा सहभाग आहे. हा चित्ररथ टीव्हीवर पाहताना सामान्य माणूस मात्र ‘प्रजासत्ताकाचे वाजले की बारा’ हेच गाणे मनात गुणगुणत असेल.