ऑफिसमध्ये पुरुषांना काहीच काम नसतं, असं बहुतांश बायकांचं मत असतं. कामावरून घरीच परतलं, बॅग वगैरे ठेवली, फ्रेश होऊन थोडं निवांत बसत एखादं आवडीचं पुस्तक वा मासिक चाळायचं वा वाचायचं म्हणून उघडलं की ही हमखास म्हणणार, ‘‘थोडा मुलीचा अभ्यास घ्यायला काय हरकत आहे?’’
तो दिवसही असाच.‘ही’ म्हणाली, आणि मी शांतताप्रिय पती असल्याने हिची हरकत मान हलवून मान्य करीत होकार (नाइलाजास्तव) भरला. मुलीला घेऊन तिचा अभ्यास घ्यायचा म्हणून ‘गणित’ विषयाचं पाठय़पुस्तक उघडलं.
खालील उदाहरणे सोडवा.
१) महानगरपालिकेतील एका जकात कारकुनाकडे ३५ तोळे सोने, पाऊण किलो चांदी, एकशे सोळा डॉलर्स, सत्तर युरो, हजार रुपयांच्या एकशे पाच आणि पाचशे रुपयांच्या तिनशे नऊ नोटा सापडल्या तर त्या कारकुनाकडे एकूण किती अवैध संपत्ती सापडली?
२) एका मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रति रु. १०० प्रमाणे ६४५९ भक्तांनी, प्रति रु. ३०० प्रमाणे ६९४ भक्तांनी काकडआरतीसाठी एका दिवसासाठी बुकिंग केले तर त्या दिवसाचे त्या मंदिराला मिळणारे उत्पन्न किती?
आम्ही शाळेत असताना आम्हाला अशी उदाहरणं नव्हती. गणपतला एक पूर्ण हौद भरायला ४ तास २० मिनिटे इतका वेळ लागतो तर अनुक्रमे एकतृतीयांश व एकचतुर्थाश हौद भरायला त्याला किती वेळ लागेल?
आमच्या वेळेची शाळेतली उदाहरणं अशी!
आमच्या वेळी आमचा अभ्यास घेणारं कुणी नव्हतं. आम्ही आमचा-आमचाच अभ्यास करायचो. आता तर ‘क्लास’ लावला नाही तर सगळं खल्लास्!
खरे तर वास्तवतेचा आधार घेऊन गणिताच्या पाठय़पुस्तकातली उदाहरणं पाहून, वाचून मला शिक्षणमंत्र्यांचं अभिनंदन करावंसं वाटलं.
मी मराठीचं पुस्तक उघडलं.
खालीलपैकी एका विषयावर निबंध (१५० शब्दमर्यादा) लिहा.
१) वीज खंडित झालीच नाही तर..
२) अपघात न झालेल्या रस्त्याचे आत्मवृत्त.
३) टेलिव्हिजन-एक कुटुंबसदस्य.
मला आमच्या वेळचे निबंधांचे विषय आठवले.
अ) ग्रंथ हेच गुरू
ब) सूर्य उगवलाच नाही तर..
क) पुस्तकाचे आत्मवृत्त
ड) मी पंतप्रधान झालो तर.. (या विषयावर आमच्या वर्गातल्या ‘शरद’ नावाच्या फक्त एकाच विद्यार्थ्यांने निबंध लिहिला होता.)
या विषयांना जराही वास्तवतेचा वास नाही.
सगळाच अभ्यासक्रम कसा वास्तववादी, बदलत गेलाय हे ध्यानात येत होतं. विज्ञानाचं काय? म्हणून पुस्तक उघडलं. प्रश्न असे- आय.सी.यू. आणि जनरल वॉर्ड यातला फरक स्पष्ट करा, मेडिक्लेमचे फायदे आणि तोटे याबाबत थोडक्यात माहिती लिहा. नार्को चाचणीत माणूस खरेच खरे बोलतो का?
टिपा द्या - आदिवासींची डी.एन.ए. चाचणी. सगळंच नवं. आमच्या वेळची शास्त्रीय कारणे वेगळी असायची, रात्री झाडाखाली झोपू नये वगैरे अशी. असं मी मुलीला म्हणालो तर ती म्हणाली, ‘‘पप्पा.. तुम्ही पण ना!.. हल्ली झाडं तरी शिल्लक राहिलीत का झोपण्यालायक?’’
मला तर सगळंच ‘नवनीत’!
म्हटलं, इतिहास-नागरिक शास्त्र तरी बदललेलं नसावं म्हणून नागरिकशास्त्राच्या पुस्तकातली पानं उलटली तर त्यातही ‘तंटामुक्त गाव शोधून त्या गावच्या पोलीस पाटलाची समक्ष मुलाखत घ्या’ हा प्रश्न!
तेवढय़ात ‘हि’चा स्वयंपाकघरातून आदेश आला, ‘‘चला.. वाढलंय..’’ आणि मी सुटऽलो असा सुस्कारा टाकणार तेवढय़ात वाक्य पूर्ण करीत ही म्हणाली, ‘‘जेवणं झाली की, मुलीला पुन्हा घेऊन बसा तासभर पुढच्या खोलीत.. मला ‘जीना इसी का नाम है..’ बघायचीय..’’
Rgards,
Bhushan Kshirsagar
982308747709890058283