नॉन ग्लॅमरस हीरो - मकरंद अनासपुरे

1 view
Skip to first unread message

Sharad Puranik

unread,
Oct 23, 2008, 4:32:54 AM10/23/08
to Sharad Puranik
नॉन ग्लॅमरस हीरो - मकरंद अनासपुरे

(वैशाली सोनावणे)
कलाकारांच्या ग्लॅमरमुळे त्यांचं "स्टार स्टेटस' पाहणाऱ्याच्या नजरेत भरतं; पण पडद्यावर झळकण्यासाठी पडद्यामागं त्याला करावी लागलेली धावपळ, दगदग क्वचितच सर्वसामान्य प्रेक्षकासमोर येते. मात्र एवढं प्रचंड "टेन्शन' असूनही अनेक कलाकार अगदी सहजपणे शूटिंगला सामोरे जातात. एकीकडे शूटिंग सुरू असतानाही मोकळ्या मिळणाऱ्या मधल्या वेळेत त्यांची इतर कामं सुरूच असतात. या कॉलमद्वारे आमचे रिपोर्टर प्रथितयश कलावंतांच्या आयुष्यात एका दिवसासाठी डोकावणार आहेत. प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरेचं एका दिवसाचं आयुष्य टिपलंय ते वैशाली सोनावणे यांनी. .......
हल्ली मुंबईत पावसानं थोडा जरी जोर पकडला तरी कलाकारांच्या मनात धडकी भरते. २६ जुलैचा अनुभव कोणीही अजून विसरू शकलेलं नाही. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. सहसा सकाळच्या शिफ्टमध्ये खूप कमी वेळा शूटिंग होतं; पण पावसाचा जोर कायम असूनही मकरंद अनासपुरेची "क्वॉलिस' पावणेसातला त्याच्या गोरेगावच्या निवासस्थानाहून अंधेरीला "लताकुंज' बंगल्याच्या दिशेनं निघाली. तिथं निर्माते महेश मांजरेकर यांच्या "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या सिनेमाचं शूटिंग होतं. सकाळची वेळ आणि बाहेर जोरदार पाऊस पडत असल्यानं मकरंद लोकेशनवर पोचताच त्याच्यासमोर चहाचा कप आला. चहापानाचा कार्यक्रम आटोपल्यावर मेकअप सुरू झाला. गेल्या दोन वर्षांपासून महादेव दळवी हे मकरंदसाठी "पर्सनल मेकअपमन' म्हणून काम करतायत.

सुमारे पावणेनऊच्या दरम्यान सिद्धार्थ जाधव व्हॅनिटीवर आला. उत्स्फूर्तपणे त्याने मकरंदची गळाभेट घेतली. खरं तर तो शूटिंगसाठीच आला होता; पण या वेळी या दोघांमध्ये जो "डॉयलॉग' झाला, त्यावरून ते दोघे या सेटवर एकत्र शूटिंग करतायत हे इथे आल्यावरच कळल्याचं जाणवलं. "दे धक्का'च्या तुफान यशानंतर आणखी काही प्रोजेक्‍टस्‌साठी हे दोघे एकत्र आलेत. सिद्धूला फोन करणाऱ्या अनेकांनी त्याच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर मकरंदबद्दलही विचारणा केली होती. याचा खुलासा या वेळी मकरंदकडून ऐकायला मिळाला. गेले काही दिवस मकरंद कामानिमित्ताने सिडनीला गेला होता आणि दुसरं म्हणजे त्याची दोन वर्षांची लाडकी लेक- "इंद्रायणी'कडून त्याचा मोबाईल पाण्यात पडल्यामुळेही हा प्रॉब्लेम उद्‌भवला होता. सिद्धूच्या बोलण्यातून मकरंदविषयीचा आदर सहज लक्षात येत होता. खूप मोकळेपणाने त्याने त्याच्या पुढील प्रोजेक्‍ट्‌सविषयी मकरंदला सांगितलं आणि तितक्‍याच अधिकाराने मकरंदने त्याला त्याविषयी दोन "हिताच्या गोष्टी'ही सांगितल्या. या वेळी मकरंद "मेकअप' करून तयार होताच. ड्रेस चढवत असतानाच बाहेर पावसाची एक मोठी सर आली. लागलीच "असिस्टंट'नं येऊन पावसामुळे "शॉट' थोडा वेळ पुढे ढकलला गेल्याचं सांगितलं. तेव्हा मकरंदनं "कॉश्‍च्युम' उतरवून तो पुन्हा रिलॅक्‍स झाला. मकरंदचा मोकळा स्वभाव आणि बोलण्याने सारा औपचारिकपणा नाहीसा केला होता. अधून मधून त्याचे फोन चालू होते आणि आमच्यासोबत गप्पाही...

गाणी ऐकणं आणि चांगले चित्रपट पाहणं हे छंद असले तरीही शूटिंगमधल्या मोकळ्या वेळेत गप्पा मारणं आणि वाचन हे त्याचे आवडते उद्योग आहेत. संवाद साधण्याचा त्याचा छंद तर लगेचच प्रत्ययालाही आला. आजचा मीडिया, शैक्षणिक व्यवस्था अशा अवांतर विषयांवर बोलता बोलता, आज जगणं सर्वार्थानंच फार महाग झालंय, इथपर्यंत त्याची गाडी येऊन पोहोचली. शिक्षणासंदर्भात बोलताना स्वतःची शैक्षणिक पार्श्‍वभूमी आणि या क्षेत्रातील प्रवेशाविषयीचं बोलणं तो टाळू शकला नाही. दहावीला ८० आणि बारावीला ६८ टक्के मिळवणारा, मध्यमवर्गीय घरातून आलेला मकरंद डॉक्‍टर होणार असाच सगळ्यांचा अंदाज होता; पण खासगी कॉलेजमधील भरमसाट फीसाठी घरच्यांचे पैसे मोजणं त्याला योग्य वाटलं नाही. दरम्यान "नॅशनल यूथ फेस्टिवल'मध्ये त्याने कॉलेजला गोल्ड मेडल मिळवून दिलं आणि अपघातानेच तो या क्षेत्रात आला. "यशापेक्षाही फायटिंग स्पीरिट महत्त्वाचं असतं,' हे या अनुभवातून शिकला. स्वतःचा उल्लेख तो या क्षेत्रात "चुकलेला वाटसरू' असा करतो. मकरंदच्या मते, "प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ असते, संधी म्हणून तिचा उपयोग करून घेणं महत्त्वाचं असतं. माझ्या आयुष्यातील "ती वेळ' आता मी जगतोय. म्हणूनच आज प्रचंड काम स्वीकारतोय. नेहमी ठराविक साच्यातील भूमिका करतो, असा ठपका माझ्यावर ठेवला जातो; पण मला मात्र तसं वाटत नाही. प्रेक्षकांना मला ज्या भूमिकेत पाहायला आवडतं त्या करता करता मी वेगवगळे प्रयोगही करून पाहतोय. म्हणूनच "साडे माडे तीन'मध्ये मी भाषा आणि मिशा सोडून काम केलंय.'' इति मकरंद.

मध्येच आलेल्या फोनने आमचा संवाद तोडला. पुढचे काही दिवस पुणे, फलटण इथल्या आणि "झी मराठी'वरील "हास्यसम्राट'च्या शूटिंगच्या तारखांची यादी संबंधित व्यक्तीला त्याने दिली. स्पॉटबॉयला चहा-बिस्कीट आणायला सांगून मघाचा विषय पुढे नेत, सध्या दिलीप जाधव यांचा "निशाणी डावा अंगठा', आदित्य सरपोतदारांचा "उलाढाल', गजेंद्र अहिरेंचा "चंदा', "नऊ महिने नऊ दिवस', "बाप रे बाप' असे काही वेगळ्या विषयांवरील वेगळ्या भूमिका असणारे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असल्याचं सांगितलं. सुरुवातीच्या काळात "यशवंत', "वजूद', "निदान', "सरकारनामा' यांसारख्या चित्रपटांतून त्याने किमान ३ ते ५ मिनिटांचे रोलही केलेत. "गाढवाचं लग्न', "कायद्याचं बोला', "जाऊ तिथे खाऊ', "साडे माडे तीन', "दे धक्का' यांसारखे सुपरडुपर हिट सिनेमे देणाऱ्या मकरंदने हौशी रंगमंचावर तब्बल १२ वर्षं काम केलंय. अर्थात या सिनेमांचं यश स्वतः मिरवण्याइतका तो उथळ नाही, हे त्याच्याशी संवाद साधताना सतत जाणवत राहतं. चित्रपटासाठी काम करणाऱ्या "लाइटमन' आणि "ड्रेसमन'नेही त्या प्रोजेक्‍टसाठी मेहनत घेतलेली असते. त्यामुळे त्या चित्रपटाचं यश त्यांच्याही चित्रपटाचं यश असतं, असं त्याचं स्पष्ट मत आहे. कोणत्याही क्षेत्रात कामातील सातत्य आणि मेहनत फार महत्त्वाची असते. शॉर्टकट्‌सवर त्याचा विश्‍वास नाही.

पुन्हा आलेल्या फोनवर तो थोडं बाजूला जाऊन बोलला. (बहुधा खासगी असावा) बॉलीवूडइतकं गॉसिपिंग मराठी इंडस्ट्रीत होत नाही. मकरंदला वैयक्तिकदृष्ट्या त्यात रस नसावा असं एकूण त्याच्या व्यक्तिमत्त्वावरून जाणवलं. फार "एक्‍साइट' होणं हा त्याचा स्वभाव नाही; पण इंडस्ट्रीसह सभोवार घडणाऱ्या उत्तम घटनांची नोंद मात्र तो आवर्जून घेत असतो. इतरांच्या कामाचं कौतुक करण्याचं "स्पिरीट' त्याच्यात आहे. अर्थात मघाशी सिद्धार्थसोबतच्या बोलण्यातून ते जाणवलं होतंच. अशा गोष्टींतून निखळ आनंद मिळवतो, असं त्याचं म्हणणं. इथली "क्रिएटिव्हिटी' त्याला आकर्षून घेते त्यामुळे तो चांगलाच रमलाय.

पुढील कामाचं वेळापत्रक फोनवरून ठरवत होता. काही फोनवरून पुढील "प्रोजेक्‍ट्‌स'च्या स्क्रिप्टविषयी चर्चा झाली. पावसामुळे बाहेरचं वातावरण थंड असूनही एसी व्यवस्थित काम करत नसल्याने वॅनिटीमधलं वातावरण काहीसं दमट वाटत होतं. संबंधित व्यक्तीला बोलावून मकरंदनं त्याच्या "अनोख्या' स्टाइलमध्ये ते ठीक करण्यास सांगितलं. साधारण १२ वाजताच्या सुमारास शॉटसाठी बोलावणं आल्यावर "मकरंद राजे' स्पॉटबॉयची वाट न पाहता वॅनिटीमधून स्वतःच छत्री घेऊन निघाले. या चित्रपटात मकरंद पाहुणा कलाकार म्हणून काम करतोय. घटनास्थळी (सेटवर) पोहोचताच मिशांना पीळ देत, खर्ड्या आवाजात आमच्या बसण्याची व्यवस्था होईल का? असं (मिष्कीलपणे) विचारून सगळ्यांची भेट घेतली. अभिजीत केळकर, सचिन खेडेकर यांच्यासह अतुल काळे, सुदेश मांजरेकर यांच्याही मकरंद स्टाइलने भेटी झाल्या. अभिजीत केळकरसोबत केलेल्या "ऊनपाऊस' या "डेली सोप'ची आठवण त्यानिमित्ताने निघाली. मावळ्याच्या वेशातला मकरंद सेटवर पेपर वाचताना, मोबाईलवर बोलताना अगदीच मजेशीर वाटत होता. सेटवरच्या डार्टबोर्डवर मकरंदनं नेमबाजीचं कसब दाखवलं.

एकदा व्यक्तिरेखा आणि सीन समजावून घेतल्यावर फार काही तयारी करावी लागत नाही. मुळातच "ह्युमन सायकॉलॉजी इज युनिव्हर्सल'. या दृष्टिकोनातून सीनचा अंदाज घेतला की बरेचदा शूटदरम्यानच सीनचा रिझल्ट कळतो, हे मकरंदचं गणित. लहान शॉट असल्याने पाठांतराचा काही प्रश्‍न आला नाही; अन्यथा डायलॉग पाठांतराशिवाय फारशी तयारी तो करत नाही. फारसं फुटेज न घेता "वन टेक'मध्ये शॉट पूर्ण करण्याचा कल त्याच्या कामातूनही दिसला. यासंबंधातली एक आठवण त्याने सांगितली. "प्राण जाए पर शान न जाए'च्या सेटवर भरत जाधवसोबत चौदा मिनिटांचा शॉट त्यांनी "वनटेक' दिला होता.

शॉट देता-देता साधारण तीन वाजण्याच्या सुमारास जेवणाची वेळ झाली. सेटवर सर्वांसाठी आलेल्या थाळीचा त्यानंही आस्वाद घेतला. जेवता-जेवता त्याच्या आवडत्या पदार्थांचा विषय निघाल्यानंतर वांग्याचं भरीत, भाकरी, शेंगदाण्याची चटणी, ठेचा, रसगुल्ला आणि आईनं केलेल्या नारळाच्या वड्या हे त्याचे विशेष आवडते पदार्थ असल्याचं कळलं. जेवण झाल्यावर मकरंद पुन्हा वॅनिटीत येऊन बसला. पुढल्या शॉटची वाट पाहत असताना मकरंदचा एक जुना मित्र आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक-निर्माता तो करत असलेल्या मराठी पिक्‍चर्ससंदर्भातील बोलणी करण्यासाठी आला. "नॅरेशन' ऐकून मकरंदनं तो चित्रपट स्वीकारला. तारखांसंदर्भातील बोलण्यातून येत्या मार्च महिन्यापर्यंत तो प्रचंड बिझी असल्याचं लक्षात आलं. तो गेल्यावर दुसऱ्या दिवशीच्या डबिंगची फोनवरून वेळ निश्‍चिती झाली.

चौदा वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झालेला मकरंद आज खऱ्या अर्थानं मुंबईकर झालाय. खेड्यात हळूहळू सरणाऱ्या दिवसाच्या आणि मुंबईतील गतीचा वेग त्यानंही चांगलाच पकडलाय. शूटिंगनिमित्ताने मुंबईबाहेरील महाराष्ट्रात फिरताना जगण्याच्या वेगातला फरक त्याला अस्वस्थ करतो. कामाच्या व्यग्रतेमुळे मकरंद कुटुंबीयांसाठी फार वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या वर्षांपासून फोन बंद करून त्यांच्यासोबत किमान दहा दिवस बाहेर फिरायला जाण्याचा पर्याय त्यानं शोधलाय.

सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या शूटिंगचं रात्री साडेआठच्या दरम्यान "पॅकअप' झालं. दिवसभर अखंडपणे बरसणाऱ्या पावसाने आता तर चांगलाच जोर धरला होता. मकरंदचा उद्याचा दिवसही चांगलाच धावपळीचा होता. नऊ वाजता डबिंग असल्याने त्याचा दिवस सकाळी साडेसात वाजता सुरू व्हायचा होता. त्यातल्या त्यात शूटिंग वेळेत संपल्याच्या आनंदात आजचा दिवस संपवत अभिनेत्याचा गेटअप उतरवून हा "नॉन ग्लॅमरस हिरो' घरच्या दिशेने निघाला...

- वैशाली सोनावणे

Reply all
Reply to author
Forward
0 new messages