योगेश्‍वरी विज्ञान केंद्रासाठी मुख्यमंत्री निधीतून 25 लाख

0 views
Skip to first unread message

shardul deshmukh

unread,
Aug 11, 2010, 9:53:40 AM8/11/10
to AMBAJOG...@googlegroups.com, shardul deshmukh
योगेश्‍वरी विज्ञान केंद्रासाठी मुख्यमंत्री निधीतून 25 लाख
सकाळ वृत्तसेवा
Saturday, August 07, 2010 AT 12:00 AM (IST)

अंबाजोगाई - मराठवाड्यात व मराठवाड्याबाहेर शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या योगेश्‍वरी शिक्षणसंस्था संचालित योगेश्‍वरी नूतन विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उभारण्यात येणाऱ्या "योगेश्‍वरी विज्ञान केंद्राच्या' भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उच्चशिक्षण तथा तंत्रज्ञानमंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर माजीमंत्री डॉ. विमल मुंदडा, अशोक पाटील, अमर राजूरकर, जिल्हाधिकारी भारत सासणे, नगराध्यक्ष पृथ्वीराज साठे, योगेश्‍वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले, सचिव ऍड. व्ही. के. चौसाळकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, की अलीकडे विज्ञान विषयाकडे दुर्लक्ष होत असून, अन्य विषयांची व्याप्ती वाढत आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले गेले पाहिजेत, हा उदात्त हेतू ठेवून योगेश्‍वरी विज्ञान केंद्राची संकल्पना पुढे आली. तिचा प्रारंभही लवकरच होईल. निजामी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केलेल्या या संस्थेशी आपले भावनिक नाते आहे. या संस्थेने पूर्वपरंपरेने शिक्षणाची ज्योत ध्येयनिष्ठपणे प्रज्वलित ठेवण्याचे काम केले व ते आजही चालू आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रांत नेतृत्व केले. सकारात्मक दृष्टिकोनातून शैक्षणिक दर्जा योग्य राखण्यासाठी चालू असलेले संस्थेचे प्रयत्न म्हणजे भूषणावह गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले; तसेच योगेश्‍वरी विज्ञान केंद्रासाठी मुख्यमंत्री निधीमधून 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

श्री. टोपे म्हणाले, की योगेश्‍वरी शिक्षण संस्थेने हाती घेतलेला योगेश्‍वरी विज्ञान केंद्राचा उपक्रम स्तूत्य असून, विज्ञाननिष्ठ कार्यकर्त्यांना दिशादर्शक आहे. सध्याच्या बाजारीकरणाच्या युगातही योगेश्‍वरी शिक्षण संस्थेने आपले मूल्य जोपासून शैक्षणिक दर्जा जोपासल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. क्षीरसागर म्हणाले, की स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेने शिक्षणक्षेत्रात भरीव, असे योगदान दिले; तसेच विज्ञाननिष्ठा कायम ठेवीत विज्ञानाचे ज्ञान आवश्‍यक असल्याचे सांगितले. या संस्थेचे अनेक विद्यार्थी नावारुपास आले आहेत. योगेश्‍वरी शिक्षण संस्थेने भविष्यातही चांगले उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी उपस्थित मंत्री महोदयांचा सत्कार योगेश्‍वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी ऍड. व्ही. के. चौसाळकर, ऍड. शिवाजीराव कराड, डॉ. मंदाताई वैद्य, पी. वाय. दीक्षित, डॉ. पी. एस. पवार, प्रा. ए. बी. राखे, प्रा. एस. डी. मोहरीर, ऍड. यु. बी. कामखेडकर, प्रा. फुंदे, कमलाकर चौसाळाकर, प्रा. पी. एस. जोशी यांनी केला.

राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी योगेश्‍वरी शिक्षण संस्था परिसरात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. डॉ. सुरेश खुरसाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गणेश पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. हरीश देशपांडे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक डी. बी. लोहारे (अहमदपूर), डॉ. पतंगे (गुंजोटी), सेलूच्या नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, डॉ. प्राचार्य शरद कुलकर्णी, डॉ. द्वारकादास लोहिया, शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सेनगावकर, स. भि. बर्वे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसीलदार भागवत देशमुख, अक्षय मुंदडा, नगरसेवक बबन लोमटे, राजाभाऊ औताडे, दिनेश परदेशी, प्राचार्य डॉ. पी. एस. प्रयाग, डॉ. बी. व्ही. लोणीकर, मुख्याध्यापक डी. एन. कांबळे, श्रीमती सविता महामुनी, श्रीमती सी. बी. जाधव, संस्थेच्या विविध विभागातील कर्मचारी, परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages