दिब्रुगड येथे महालयामध्ये आमची निवासाची व्यवस्था होती. सतत पडणारा पाऊस त्यामुळे बाहेर फिरणे जवळपास अशक्य. वाचन खूप करत होतो. या काळात सर्वात मोठी साथ होती माझा मित्र योगेश झोपेनी दिलेल्या मस्त गाण्याच्या कॅसेट्स व माझ्या आईने घेऊन दिलेल्या कॅसेट प्लेयरनी. ग्रेसच्या कविता आणि जगजितसिंगांच्या गझला ह्या माझ्या नित्याच्या साथीदार बनल्या.
माँ सुनाओ मुझे वो कहानी,
जिसमें राजा न हो न हो रानी,
जो हमारी तुम्हारी कथा हो,
जो सभी के ह्रदय की व्यथा हो.
गंध जिसमें भरी हो धरा की,
बात जिसमें न हो अप्सरा की,
हो न परियां जहाँ आसमानी,
माँ सुनाओ मुझे वो कहानी.
दिब्रुगडच्या ब्रह्मपुत्रच्या घाटावरून काही प्रवास जीपने ब्रम्हपुत्रच्या पात्रातून तर काही प्रवास बोटीने( फेरी) करत सकाळी ७ वाजता निघालेलो आपण नक्की कधी शिलापथारला पोहोंचू हे सांगता येणे कठीणच. माझ्या अनुभवानुसार कमीत कमी तीन तास तरी नक्की लागतात. शिलापथारला पोहोंचले की पहिले काम दापोरीजोला जाणाऱ्या बसचे तिकीट आरक्षित करणे. शिलापथार अरुणाचल व आसामच्या सीमेवरील एक छोटेसे गाव. दापोरीजोला जाणाऱ्या तशा दोन बस. एक अरुणाचल राज्य परिवहन निगमची, त्याला ट्रान्सपोर्टची बस म्हणतात तर दुसरी खाजगी वाहतुकीची आराम बस. ज्याच्यात जागा असेल त्यात बसायचे. सकाळी दापोरीजोहून जी बस असायची त्या बसने जायचे. कधीकधी बस येतच नसे मग शिलापथारच्या एखाद्या लॉज मध्ये राहायचे. त्यावेळी स्वच्छता,आरोग्य ह्या गोष्टी आमच्या विचार कक्षेच्या बाहेर.
दुपारी मस्त DBS (दाल,भात,सब्जी)वर ताव मारायचा, इकडे तिकडे फिरत बसायचे. सायंकाळी ५ वाजता शिलापथारहून बस निघायची. बसमध्ये कोंबड्या,मासे,वेगवेगळे सामान सगळे काही असायचे. बस ८ किलोमीटर पुढे गेली की लिकाबाली चेकपोस्ट. इथून अरुणाचल सुरु होणार. चेकपोस्ट म्हटल्यावर मला पहिल्यांदा थोडं आश्चर्य वाटले. एखादा पोलीस मग बसमध्ये चढून आतील अरुणाचली बंधू सोडून इतरांचे इनरलाइन परमिट तपासणार. अरुणाचलमध्ये जाण्यासाठी आपल्याला रीतसर अरुणाचल शासनाची परवानगी घ्यावी लागते. ईशान्य भारतातील नागालँड,मिझोरम व अरुणाचल या तीन राज्यात प्रवेश करण्यासाठी (ILP) ही परवानगी लागते.इंग्रजांनी हा सुरु केलेला कायदा आपण पुढे चालूच ठेवला. या बद्दल बरेच वादविवाद आहेत.
एकदा इनरलाइन परमिट तपासणी झाली की बस अरुणाचलच्या डोंगररांगातून जाऊ लागते नागमोडी वळणाने. सरळ रस्ता क्वचितच. डोंगरातून खूप परिश्रमाने निर्माण केलेले हे रस्ते म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे देशासाठी एक खूप मोठे योगदान आहे. पावसाळ्यात मात्र हाल होतात. डोंगरच्या डोंगर कोसळतात. रस्ते पूर्ण बंद. वायुमार्गाने फक्त रसद पुरवठा आणि बऱ्याच वेळा तो पण बंद असे. एका पावसाळ्यात जवळपास एक महिना रस्ते बंद होते. फक्त भात कधी तर कधी फक्त बटाटे हे आमचे जेवण असे.
निसर्गाचा एक वेगळाच सुगंध आपल्याला इथे अनुभवता येतो. खोल दऱ्या, उंच पर्वत आपली साथ कधीच सोडत नाहीत. अरुणाचलमधील लिकाबाली हे पहिले गाव. मालिनीथान (Malinithan) मंदिर इथून एक किलोमीटर वर. इथे काही पुरातनकालीन (महाभारत) अवशेष पहावयास मिळतात. अशी आख्यायिका आहे की मालिनीथान येथे भीष्मकनगरहून द्वारकेला जाताना नवीन लग्न झालेल्या श्रीकृष्ण व रुक्मिणीने पार्वती मातेची प्रार्थना केली. पार्वती मातेनी त्यांनी एक हार दिला. तो श्रीकृष्णाला खूप आवडला. श्रीकृष्णाने पार्वती मातेची सुचारू मालिनी (Sucharu Malini", or a lady who strings garlands beautifully ) म्हणून स्तुती केली. त्यावेळी पासून या स्थानाचे नाव मालिनीथान असे पडले.
लिकाबालीनंतर पुढचा थांबा येतो व सगळे लोक बस मधून खाली उतरतात. मी पहिल्यांदा गेलो त्यावेळी वाटले एखादा धाबा असेल पण खाली उतरून पाहतो तो समोर एक शिवमंदिर होते. अरुणाचलमध्ये असे अनेक स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर आहेत. दापोरीजो जवळचे मंगामंदिर तर खुपच अप्रतिम आहे. हिमालयात निवास असणाऱ्या भोलेनाथाचा आशिर्वाद घेऊन.पुढची अवघड यात्रा सुरक्षित व्हावी म्हणून सर्वांनी प्रार्थना केली व आमचा प्रवास पुढे सुरु झाला.
असे खुपदा अनुभवायास मिळते की उत्तरेकडून दक्षिण टोकापर्यंतचा भारत रामाने जोडला. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा भारत कृष्णाने जोडला तर समुद्रसपाटी पासून ते उंच हिमालयाच्या पर्वतशिखरांपर्यंतचा भारत शिवशंकराने जोडला.
अरुणाचलच्या या पर्वतीय रस्त्यावरून बस चालवणे खुपच जिकीरीचे काम. खुपच सतर्क रहावे लागते. वळणावर समोरून येणाऱ्या गाडीचा वेध तिच्या प्रकाशाने घ्यावा लागतो. अरुणाचलचे क्षेत्रफळ ८४ हजार वर्ग किलोमीटर व लोकसंख्या १४ लाखाच्या आसपास. मनुष्यवस्ती खुपच तुरळक व खूप अंतरावर. त्यामुळे दहा तासाच्या प्रवासात काहीच गाव दिसतात. बसार हे त्यातल्या त्यात मोठे गाव. सकाळी सहाच्या आसपास आपण दापोरीजोमध्ये पोहोचतो. मारो हे छोटेसे गाव सोडल्यानंतर काही अंतरापासून आपला प्रवास सुबांशिरीन सोबत सुरु होतो. अरुणाचलच्या बहुतेक जिल्ह्यांची नावे त्या भूभागातून नद्यांच्या नावावरून दिले आहेत. त्याच प्रमाणे इथल्या गावाची नावे म्हणजे इथल्या बंधूंची आडनावे. मारो बस्ती मध्ये राहणाऱ्या सर्व बांधवांची आडनावे मारो. मुलांची व पुरुषांची नावे मुख्यतः त पासून किवा म पासून सुरु होतात उदा. ताके,तामो,तानिया,तागे, मार्को,मालार इत्यादी तर मुलींची व महिलांची नावे मुख्यतः य पासून. याबी, यांनी, याकब, यादे इत्यादी. वडिलांचे नाव लावण्याची पद्धत इथे नाही.
गावातील मुलं मुली एकमेकांची बहिण भाऊ व गावातील प्रत्येक आईच्या (आने) वयाच्या महिलेला मुलं आईच म्हणतात. आबो म्हणजे वडील तर आबोतानी हा त्यांचा आद्य पिता. सर्वं अबोतानीच्या वंशजांचे दोनि (सूर्य ) व पोलो (चंद्र) हे देवता. दोनि आई आहे तर पोलो वडील आहे. निसर्गाच्या सहवासात राहणारे हे बांधव निसर्गाचेच पूजक असणार.
आदित्यांत महा-विष्णु ज्यातिष्मंतांत सूर्य मी । मरीचि मुख्य वायूंत मी नक्षत्रांत चंद्रमा ॥गीत्ताई २१॥
मी एकाक्षर वाणींत महर्षींत असे भृगु । जप मी सर्व यज्ञांत मी स्थिरांत हिमालय ॥ गीत्ताई २५ ॥
भारतवर्षात एकूणच आई व मुलाचे नाते फारच वेगळे. तिच्या शरीराचा आपण एक भाग असतो. भारतात्तील आई मुलांच्या जोड्या पहिल्यातर आपल्याला लक्षात येईल की आईचे स्थान भारतीय अध्यात्मात तर महत्वाचे आहे पण इतिहासात ते खुपच उठून दिसते. गणपती -पार्वती, हनुमान-अंजनी, कृष्ण-यशोदा, शंकराचार्य व त्यांची आई,जिजाऊ-शिवबा, शाम व त्याची आई, विनोबा व त्यांची आई. अशा आई मुलांच्या जोड्यांनी सर्वच क्षेत्रात एक नवीन आदर्श ठेवला. मी काही माझ्या पंजाबी मित्रांना विचारले की खरे कशा मुळे पंजाबातील दहशतवाद संपला? त्यांचे उत्तर होते, “ पंजाबातील आईंमुळे!!!”
मला कधी कधी वाटते आपल्या देशातील आईंमुळे देश एकसंघ राहिला व कुटुंबे एकसंघ राहिली. आई जर दुर्बल झाली तर घर व देश पण दुर्बल होईल.
अरुणाचली आई पण याला कशी अपवाद असेल. अरुणाचली घराचा कणा म्हणजे आई.
गम्मत म्हणजे अरुणाचलात लग्नपद्धती पण खूप वेगळी आहे. पुराणकाळात आपल्याकडे सर्वात श्रेष्ठ गोधन समजले जायचे. अरुणाचलमध्ये श्रीमंती ठरते ती त्यांच्याकडे असण्याऱ्या मिथुनच्या संख्येवर. मिथुनचे अरुणाचली बांधवांच्या आयुष्यातील स्थान खूप महत्वाचे. एका मिथुनची किंमत काही दश सहस्त्रात. एखाद्या मुलीशी आपल्या मुलाचे किवा मुलीचे लग्न लाऊन द्यायचे असेल तर त्या मुलीचे वडील मागतील तेवढे मिथुन लग्नात त्यांना द्यावे लागतात ही अरुणाचली रीत.
एक गंमतीदार किस्सा ऐकिवात आहे. पंडित नेहरू व इंदिराजी अरुणाचल मधील झिरो या गावी गेले होते. त्यांचे तिथे खूप जोरदार स्वागत झाले. झिरो गावच्या गावप्रमुखाला इंदिराजी खूप आवडल्या. गावप्रमुखाचे वय साठीच्या आसपास असेल. त्यांनी पंडितजींना विचारले,
“इंदिराजींचे लग्न माझ्याशी लाऊन द्याल का?”
त्याबदल्यात गाव प्रमुख पंडितजींना शंभर मिथुन देण्यासाठी तयार होते.
मी दापोरीजो मध्ये रहात असताना खूप जवळून अनुभव घेता आला या सर्व लोकांचा. एकदा काही बांधवांना आमचे कार्यकर्ते बंगाल मध्ये घेऊन गेले. कोलकत्याच्या रेल्वेस्टेशन वर एका बांधवाची बॅग चोरीला गेली.
“कुठे ठेवली होती?” असे विचारल्यावर त्याने सांगितले,
“वहाँ कोने मे रखी थी”
“आपका ध्यान नही था क्या?”
“हमने यह सोचा भी नही था न, की कोई बॅग उठायेगा.”
अगदी निरागसपणे त्याने उत्तर दिले. त्याच्या बस्ती मध्ये कुठल्याच घरांना कुलूप नसतात. चोरी हा प्रकार बस्तीतल्या लोकांना माहित पण नव्हता.
कुपोरीजो मधील विवेकानंद केंद्राच्या प्राथमिक शाळेतील मुले खुपच गोड दिसायची. त्यांचे हिंदी बोलणे पण फार भारी. तशी फार इरसाल ही पोरं. साप, पक्षी, विंचू हे सहज पकडायची. जंगलाचे ते राजेच होते. साठच्या दशकात रामकृष्ण मिशनच्या शाळांमध्ये अरुणाचलच्या विविध व खूप अंतर्गत भागातून मुलांना सरळ हेलीकॉप्टरने आणले जायचे. त्यातील काही मुले पुढे अरुणाचलचे मंत्री, मुख्यमंत्री व खासदार झाली. असेच अप्पर सुभांशिरीनच्या अतिअंतर्गत भागातून मुलांना शिकण्यासाठी कुपोरीजोच्या शाळेत आणले जायचे.
मारो ही एक अशीच दुरस्थ बस्ती. जवळपास ३० किलोमीटर दूर.तिथला तागे हा शिकण्यासाठी कुपोरीजो मध्ये होता. तागेचे वडील तो काही महिन्याचा असतानाच देवाघरी गेले होते. त्याच्या आनेची (आईची) इच्छा होती तागेनी खूप मोठे व्हावे. दिसायला तागे अगदी बाल हनुमानाचे रूप. खुपच मस्त दिसायचा.
तागे आणि त्याच्या आईची गोष्ट वाचणार का ?
माझ्या ब्लॉगवर सविस्तर आहे...नक्की वाचा.
@ वरील लेख छायाचित्रांबरोबर वाचला तर अधिक समजेल त्यासाठी जर आपल्या कडे वेळ असेल तर नक्की माझ्या ब्लॉगवर आपल्याला ते समजून घेता येईल...http://prasadchikshe.blogspot.in/2012/04/blog-post_27.html