विक्रमगडमधील आदिवासी तरुण मॅरेथॉनमध्ये अव्वल
तलवाडा : ऑगस्ट क्रांती वर्षा मॅरेथॉन २0१३ मध्ये विक्रमगड तालुक्यातील खांड या गावातील आदिवासी तरुणांनी अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पध्रेमध्ये ५ कि.मी., ३ कि.मी. व १0 कि.मी., २१ कि.मी. मॅरेथॉन सुयशाबद्दल मानाचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. या ऑगस्ट क्रांती मॅरेथॉन २0१३ स्पध्रेत ठाणे जिल्ह्यातील असंख्य स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात विक्रमगड खांड या ग्रामीण भागातील ११ खेळाडूंचा सहभाग होता.
यामध्ये ५ कि.मी. मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक योगेश विठ्ठल माळी, लहान गट ५ कि.मी. मॅरेथॉनमध्ये रोहिदास विठ्ठल मोरघा, द्वितीय क्रमांक ३ कि.मी. मॅरेथॉन संतोष पांडुरंग माडी, १0 कि.मी प्रथम क्रमांक अमित भगवान माळी, ११ कि.मी. ज्ञानेश्वर विठ्ठल मोरघा एक तास ७ मिनिटे व अन्य स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली कला व कौशल्य सादर केले. यामध्ये विक्रमगड तालुक्यातील खांड या ग्रामीण भागातील स्पर्धकांनी अव्वल स्थान पटकावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे स्पर्धक ग्रामीण भागातील व आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्यांनी अव्वल स्थान पटकावले. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या स्पध्रेमध्ये यापेक्षा उत्तरोत्तर चांगली कामगिरी करायची इच्छा व प्रयत्न चालले आहेत, परंतु आमची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यासाठी लागणारे साहित्य, बुट, कपडे व अन्य साहित्य व योग्य मार्गदर्शनाची आम्हास आवश्यकता आहे. आम्ही नक्कीच राज्य व देश पातळीवर आमची चमक दाखवू, असा विश्वास यावेळी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
यावेळी आदिवासी युवकांना मार्गदर्शन व साहित्य देण्याकरिता लायन्स क्लब ऑफ विक्रमगडचे प्रेसिडंट घनश्याम आळशी यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले, तर या आदिवासी स्पर्धकांना शासनाकडून मदतीकरिता राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्याकडे घनश्याम आळशी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. या दरम्यान घनश्याम आळशी यांच्या समवेत, महेश आळशी, डॉ. अरुण मनोरे तसेच धवल जयवंत पटेल यांचीही उपस्थिती होती. स्पर्धकांसह विद्यार्थ्यांचे शिक्षक.