आदिवासी विद्यार्थ्यांचे राज्यव्यापी उपोषण
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
अतिशय दयनीय अवस्थेतील आदिवासी विद्यार्थ्यांची निवासी वसतिगृहे, मुलभूत
शैक्षणिक सुविधांची वानवा, निकृष्ट दर्जाचा आहार या विद्यार्थ्यांच्या
मागण्यांवर चर्चा करण्याची जबाबदारी एकाही आधिकाऱ्याने न घेतल्याच्या
निषेधार्थ राज्यभरातील सर्व निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण
सुरू केले आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी
१० डिसेंबर अप्पर आयुक्त सुधीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना पाचारण केले
होते. त्यानुसार ७०-८० विद्यार्थी चर्चेसाठी आले होते. पण पाटील हे हिवाळी
अधिवेशनासाठी नागपूर गेले आहेत. विद्यार्थ्यांची कुणीही दखल घेत नसल्याने
घोषणाबाजीला सुरुवात केली. अप्पर आयुक्त किंवा नाशिकचे उपायुक्त संजीवकुमार
यांच्याशीच कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी चर्चा करण्याचा आग्रह
विद्यार्थ्यांनी धरला. मात्र, तसा संपर्क करून देण्यास उपस्थित
कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला.
रात्री साडेसात वाजता पोलिसांच्या मदतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
झाल्यानंतर राज्यभरातले विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
विद्यार्थ्यांना धमक्या
मंगळवारी रात्रीपासून वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी होऊ
नका अशा धमक्या देण्यात आल्या. त्रास देणाऱ्या गृहपालांच्या बदल्यांचे
आश्वासन काही अधिकाऱ्यांनी देऊ केले, पण अशा कितीजणांच्या बदल्या तुम्ही
करणार आहात असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला.