वयक्तिक अनुभव : प्रवास बुलेट ट्रेन चा
[ स्थानिक आदिवासी बोली भाषा ]
फार कंव्हासिं बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन आयकून होतुं, मन एकदा बसून पाहूं. ते दिस एक तास बसून हिंडलु, नंगायचा होता नांगला ना आलुं. त्या नांगताना काय काय डोक्यात आला त्या लिहून पाठवीतूं हाव. गायचेन बुलेट ट्रेन नांगली त बिहवाला दसा वाव दसीं, लांभा नाक, सूयकन भुर्र जाय. मन नांगायचा त सगलाच नांगु, त सुपर फास्ट बुलेट ट्रेन चा एक स्टॉप वऱ्ही गेलू एक तासात ना परत आलु. जाताना फस्ट क्लास ला गेलू ना येताना इकॉनॉमी तसी आलू.
मी खिडकीत बसेल, मेन म्हनजे माना आजूबाजूचा नंगायचा होतां. मस्त इवान दसा, फास्ट क्लासात खाऊ पण दिस खाया. बारकीच टीव्ही त्यावर काही काही दाखवज. सुरु झाली , शहरात हलू हळूच जाय, एकदा सहरातसी बाहेर आली का सूयकन धावाया लागली. मी ओखुंन ओखुंन नांगत होतुं. आयबा भलता भारी, गाव आला तसा डोंगर दिसाया लागलं, सेती दिसाया लागली, बीजी सेतावर काम करीत. बीजेकडे बारक्या बारक्या कंपन्या दिसल्या. कव्हा कव्हा बोगदा कव्हा पूल.
पण एक जाणवला कोरिया चे मानसाहि जमिनीची अजिबात वाट नीही लावेल, त्यांचे गावा वरसी जबरदस्तीन नीही निधेल वाटली. ना आजूबाजूची जागा हो व्याट नीही करेल. नयीचा पानी हो भलता नितल त्यात हो काही नीही टाकीत ती. कंपनीचे जवलची नय ना ओहलि नांगलि ती हो तसीच बेस बरी. कंपनीतसी पानी टाकायचा होवा त पहले सुद्ध करज मंगा नईत सोडज. कंपनी ना कारखान्याला जोढा महत्व तोढाच सेतीला हो महत्व. त्यांना माहित कोढाक हो मसिन लावा कारखाना काढा जेवाया धान जमिनीतसीच येय.
आपले कडची त गायचेन गांडी गुजरात दसीं, डोलं ओडकुन कारखान्याचे मघारिं लागेल आहात. नई व्याट करुन टाकीत, डोंगर खणून टाकलं, सेता व्याट करून टाकली, दारूची दुकानां आणली, जागा विकून खाल्या. बीजे कडच्याही पाडा ना गाव वसवला, कोठं जातील कायजून. नांगजास र एकदा जमीन गेली का खपला सगला. कागदाचा पयसा खपून जाल, मंगा काय खाल, पोरांना काय द्याल? पांढर पेसी बनाल ? हिंडत रेहाल इकडं तिकडं ? गायचेन संभालून रेहजास.
[ साधी मराठी भाषा ]
गेल्या काही वर्षा पासून बुलेट ट्रेन विषयी खूप चर्चा होते. कोरियात आल्यावर म्हटलं एकदा बसून बघूया, आणि शेजारी बुलेट ट्रेन मुळे काय काय परिणाम झाले ते बघूया , अनुभवुया. त्या दिवशी सुवोन ते डायजेन पर्यंत गेलो, आणि परत आलो. फर्स्ट क्लास आणि इकॉनॉमी असा दोन्ही अनुभव घेतला. जाताना KTX ट्रेन नी गेलो ती नॉन स्टॉप होती तिचा पहिला स्टॉप वर उतरलो आणि येताना ITX ने आलो ती ४ ठिकाणी थांबून सुवोन ला पोचली.
बुलेट ट्रेन : सुवोन ते डायजेन
अंतर : १०७ किमी
तिकीट :
फर्स्ट क्लास १८,१०० वोन (११३० रुपये), इकॉनॉमी क्लास १२,००० वोन (७५० रुपये)
वेळ : ६९ मिनिटे
आपल्या कडचा प्रवास
लोकल ट्रेन : डहाणू ते अंधेरी
अंतर १०२ किमी
लोकल ट्रेन तिकिट - १४० मिनिटी (लोकल)
सेकंड क्लास - २५ रुपये
एक्सप्रेस तिकिट - १३० मिनिटे (सौराष्ट्र एक्सप्रेस)
३ टियर एसी ४९५, स्लीपर १४०
सुपर फास्ट तिकीट - ९३ मिनिटे (पश्चिम एक्सप्रेस)
फर्स्ट क्लास १२४४ रुपये, २ टियर एसी ७४४, ३ टियर एसी ५४०, स्लीपर १७०
प्रवास आणि अनुभव छान होता. खिडकीत बसून मला बाहेरचे निरीक्षण करायचे असल्याने मी पूर्ण वेळ बारीक सारीक गोष्टी बघून त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो. पण एक गोष्ट ठळक जाणवली या बुलेट ट्रेन चा ट्रॅक कुठे हि जबदरदस्तीने ओढून ताणून लादलेला वाटला नाही. कोरियात यांनी ट्रान्सपोर्ट इन्फ्रा खूप प्राथमिकता देऊन बनवले आहे, आणि खूप इफेक्टिव्ह पद्धतीने प्रत्येक शहर जोडले आहे. हे लोक बोलतात कोरियात कुठून हि देशात कुठेही जाऊन माणूस काही काम असेल तर ते करून त्याच दिवसात परत येऊ शकतो. असो त्यांच्या प्राथमिकते नुसार त्यांनी बनवले आहे.
ट्रॅक च्या शेजारी खूप चांगल्या पद्धतीने शेती करताना दिसले, अगदी काहीही फुटाच्या अंतरावरून शेती केली जात होती. थोडे कारखाने पण दिसले, गावे दिसली, त्यांचे पारंपरिक देव दिसले. शहारा पासून लांब असल्याने येथील ग्रामीण परिसर होता. नद्यात पण अगदी स्वच्छ नितळ पाणी होते, येथे कारखान्यातून पाणी नदीत सोडायचे झाल्यास आधी ते शुद्ध केले जाते तपासले जाते आणि नंतर सोडतात.
येथे जाणवले जेव्हडे महत्व कारखाने आणि औद्योगिक प्रगतीला दिलाय त्यापेक्षा जास्त किंवा तितकेच महत्व नदी, जमीन आणि शेतीला दिले आहे. मला वाटले त्यांनी बरोबर ओळखलेय कितीही औद्योगिक प्रगती करा जेवायला जमिनीतूनच येणार आहे. प्रत्येक ठिकाणी याची प्रचिती येत होती. शहरातली नदी त पण शुद्ध पाणी, दोन्ही बाजूने जॉगिंग ट्रॅक, ,बसायला बेंच, सायकल चालवायला ट्रॅक. ग्रामीण भागात पण नदीचे पाणी शुद्ध होते. भारतातले चित्र डोळ्या समोर आले आणि मन अस्वस्थ झाले.
[ दोन सामाजिक शब्द ]
भारतात आपण बऱ्याच वेळेस डोळे बंद करून कॉपी करतो इतराना किंवा एखाद्या औद्योगिक समूहाच्या आर्थिक फायद्यासाठी सामान्य माणसांचा बळी दिला जातो असे लोक बोलतात, आणि ते खरे हि वाटतेय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी मोठ्या प्रमाणावर अनुसूचित क्षेत्रातली जमीन जाते आहे , मोठ्या प्रमाणावर वन जमीन आणि आदिवासींची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. या विरोधात गुजरात, दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्र येथील सगळ्यांनी एकत्रित आवाज उठलाय. पेसा आणि इत्तर कायद्या नुसार आंदोलन सुरु असताना हट्टी साशनाने नियम बदलून पळवाट काढलीय.
साशकीय अधिकारी भूमी संपादनासाठी देण्यात येणाऱ्या पत्रावर आणि अनेक इत्तर ठिकाणी पण उल्लेख असतो माननीय पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. तसेच पालघर जिल्हा परिसरात बडोदरा एक्सप्रेस वे, फ्रेट कॅरिडॉर, कोस्टल हायवे, पोर्ट वे, पोर्ट रेल, इंडस्ट्रियल कॅरिडॉर असे अनेक १५ ते १७ मेगा प्रोजेक्ट येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर आदिवासींची जमिनी जाणार आहेत, कागदोपत्री गेल्या पण आहेत काही. दुर्दैवाने या विषयी सामान्य जनात गांभीर्य नाही. या जिल्ह्यातले सगळे पाणी मुंबई, ठाणे, मीरा भायंदर ला पळवलेय आज डॅम शेजारी गावांना प्यायला पाणी नाहीय, वरून वसई विरार ताव मारून बसलाय पाण्यासाठी. येथील शेतीला पाणी नाही आणि अक्राळ विक्राळ वाढणाऱ्या शहरांची तहान भागवतोय. येथील वस्त्यांनी आणि कारखान्यांनी नद्या दूषित केल्या आहेत. जमिनी हस्तांतरित झाल्या आहेत.
हो ना इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचे आहेच, गरज आहेच अपल्याना आज ना उद्या. पण प्राथमिकता कोणत्या गोष्टीनां द्यावी, हे न कळण्या इतके आपण गुंग झालोयत का या विकासाच्या स्वप्नात ? जे रेल नेटवर्क आणि हायवे आहेत त्यांची कपॅसिटी आणि इफिशियंसी वाढवण्यासाठी काही प्रयत्न नाही दिसत. आणि पडीक जमीन बिगर शेती जमीन सोडून निवडून अनुसूचित क्षेत्र टार्गेट करून येथील लोकसंख्येचे प्रमाण बिघडवणे सुरु आहे.
नैसर्गिक स्रोत आणि पर्यावरण ज्या वेगाने आपण नष्ट करतोय नक्कीच आपले भविष्य चांगले नाही. सामान्य माणसांचे प्राथमिक प्रश्न आणि सामान्य जीवनमान उंचावण्यासाठी, शेती आणि शेती पूरक, पर्यावरण फ्रेंडली उद्योग, स्थानिकांना मजबूत करणारे उपक्रम प्रामाणिक पणे राबविण्यासाठी शासनात आणि आपल्या नेतृत्वात संवेदना तयार होणे गरजेचे आहे. ठरवले तर खूप काही होऊ शकते, एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
६० वर्षानंतर देशाच्या आर्थिक राजधानी जवळ असलेला हा परिसर, येथील प्रश्न झपाट्याने प्रगती व्हायला हवी होती. दुर्दैवाने परिस्तिथी अधिक बिकट बनते आहे, कुपोषण, शिक्षण, बेरोजगारी, सुरक्षा, जल, जंगल, जमीन जाते आहे. बाहेरची लोकसंख्येचे प्रमाण इतके वाढते आहे कि पूर्ण सोशिअल, पोलिटिकल स्ट्रक्चर बदलते आहे. आदिवासी समाजासाठी विशेष संविधानिक अधिकार आहेत त्या नुसार आदिवासी विकास करणे आणि अनुसूचित क्षेत्रात प्राथमिकतेच्या गोष्टी सोडवणे हि का नाही माननीय पंतप्रधानांची महत्वाकांक्षा बनू शकत ? किमान राष्ट्रपतींची तरी ? किमान राज्यपालांची? किमान आदिवासी विकास मंत्र्यांची ?
किमान स्थानिक लोकप्रतिनिधींची ? तरी बनू शकते का?