‘रागिणी एमएमएस २’ची कथा सुरू होते या चित्रपटाचा पहिला भाग जेथे संपतो तेथेच! पहिल्या भागामध्ये बॉयफ्रेंडच्या गूढ मृत्यूनंतर वेडी झालेली रागिणी मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. रागिणी आणि तिचा बॉयफ्रेंड उदय यांच्यामध्ये नक्की काय झाले, याचा शोध घेत त्या दोघांवर चित्रपट निर्माण करण्याचे निर्माता-दिग्दर्शक रॉक्सने (प्रविण दबास) ठरविले आहे. ज्या बंगल्यामध्ये एका अदृश्य शक्तीचा वावर आहे त्याच बंगल्यामध्ये रॉक्सला चित्रपटाचे शूटिंग करायचे आहे. रागिणीच्या भूमिकेसाठी रॉक्सने सनीला (सनी लिऑन) निवडले आहे. नक्की त्या बंगल्यामध्ये काय झाले, हे माहित करून घेण्यासाठी सनी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन रागिणीची भेट घेते आणि चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होते.
शुटिंगदरम्यान चित्रपटाच्या युनिटमधील काही जण (दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री) त्या बंगल्यातच राहण्याचा निर्णय घेतात. रागिणीवर उपचार करणारी मानसोपचारतज्ज्ञही (दिव्या दत्ता) या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा चंग बांधते. शूटिंगदरम्यान चित्रपटाच्या टीमला त्या बंगल्यामध्ये काय अनुभव येतात? रागिणीची भूमिका करणारी सनी कोणत्या प्रसंगाला सामोरी जाते? त्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाचा इतिहास काय आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘रागिणी एमएमएस २’ पाहायला हवा.