तोरा नको !!!
तन्वी आपटेनामक नवविवाहिता आपल्या सासूबाईंच्या सुटकेसमधून “नऊवारी’ बाहेर काढते, त्या वेळी तिचा नवरा आणि नवऱ्याबरोबर “कॉम्बो ऑफर’मध्ये मिळालेली तिची नणंद या दोघींनाही चक्कर यायचीच बाकी असते. कारण तन्वी हिला अत्याधुनिक म्हणणेही “जुनाट’ ठरले असते एवढी ती बिनधास्त होती. आचार- विचारांची बंधनं फक्त बायकांवरच का, नवरेमंडळींना त्यातून “सूट’का, असा तिचा सवाल असायचा. अशा विचारांमुळे साडी वगैरे परंपरागत वस्त्रप्रावरणं तिच्यापासून चारहात लांबच राहायची. जीन्स, टी-शर्ट किंवा टी-शर्ट-थ्री फोर्थ हा तिचा नेहमीचा पेहराव. नातेवाईक, बिल्डिंगमधले स्नेही या सर्वांनी तिच्या या “Fashion Statement’वर नाके मुरडली होती. लग्न झालेल्या बाईला असा ड्रेस शोभतो का, असा या मंडळींचा सवाल असायचा. यावर तीचं उत्तर ठरलेलं असायचं. “लग्न झालेले पुरुष बर्म्युडा घालून सगळीकडं हिंडतात, मग मी थ्री फोर्थ का घालायची नाही’. या तिच्या युक्तिवादापुढे सगळ्यांची बोलती बंद व्हायची. घरात तन्वी आणि सासूबाई यांच्यात तिचा पेहराव आणि बाकीचे विचार यावरून अनेक युद्धे, लढाया व्हायच्या; पण प्रत्येक वेळी माघार सासूबाईंनाच घ्यायला लागायची; तर अशा तन्वीने सासूबाईंच्या सुटकेसमधून नऊवारी साडी बाहेर काढली तेव्हा नवऱ्याला आश्चर्य वाटले नसते तरच नवल होते. तिने नऊवारी बाहेर काढून ठेवली तेव्हा बेडवर लोळत पडलेल्या थ्री फोर्थची नजर नऊवारीवर गेली. त्या वेळी या दोघींच्यात रंगलेल्या सवाल जवाबांचा सामन्याचे (अर्थातच दुरंगी) थेट प्रक्षेपण…