व्हाईट ब्रेस्टेड वॊटर हेन [ White-breasted Waterhen - Amaurornis phoenicurus ] असं सोप्प ईंग्रजी नाव धारण केलेली ही लाजरी पाणकोंबडी १००% भारतिय पक्षी आहे. रॆलिडी कुटुंबातल्या [ Family: Rallidae ] ह्या पक्षाचा आकार साधारणपणे आपल्या तित्तराएवढाच असतो. स्वभावाने अतिशय लाजरी असलेली ही पाणकोंबडी ओळखायला अगदी सोप्पी असते. लांबट चोच, डोक्यापासून अगदी पुर्ण पाठभर शेपटीपर्यंत गडद उदी काळा रंग असलेल्या ह्या पाणकोंबडीचं पोटं आणि मानेचा खालचा भाग पांढरा असतो. बरेचदा ह्या कोंबडीच्या अंगावर पांढरट ठिपकेही दिसून येतात. या पाणकोंबडीची चोच लांबट तर असतेच पण चक्क पिवळ्या रंगाची असते.ही चोच मिलनाच्या काळात शेवाळी रंगाकडे झुकते असं निरिक्षण अनेक पक्षी निरिक्षकांनी नोंदवलय. या पाणकोंबडीच्या बुडाजवळ लालसर ठिपका असतो जो शेपुट उडवुन चालताना किंवा अन्न गोळा करताना ती वाकल्यावर दिसतो. ही बया चालताना आपली शेपटी अगदी मजेमजेने वरखाली उडवत चालते हे पहाण्यासारखं असतं.
मला आदित्यने विचारलं होतं की ह्या पक्षाला त्याने खुप वेळ ओरडताना ऐकलं जे त्याला खुप मजेशीर वाटलं. अगदी बरोबर आहे. "क्वाक्क क्वाक्क कर्र्र्र" असं ओरडणारी ही बया पावसाळ्यात भरपुर मनसोक्त डणकत असते नी तेव्हा तिचं हे असं ओरडणं सहज ऐकु येतं. पण त्याच बरोबर जुन ते साधारण सप्टेंबर ऒक्टोबर या काळात तिच्या विणिचा हंगाम असतो तेव्हाही हे ओरडगाणे ऐकायला मिळतं. यांच घरटं पाणवठ्याच्या जवळ पाणगवत, काटक्याकुटक्यांनी बनवलेलं असतं. या ओबडधोबड घरट्यात पाणकोंबडी गुलाबी पांढरट रंगाची साधारण ६/७ अंडी घालते. दोन्ही पालक ही अंडी उबवण्याचं आणि पिल्लांची काळजी घेण्याच काम करतात. साधारण १९/२० दिवसांनी ही अंडी उबून पिल्लं बाहेर येतात. जन्माला आलेली ही पिल्लं अतिशय काटकुळी नी काळ्या रंगाची असतात. या पिल्लांचे पाय त्यांच्या पालकांसारखेच लुकडे , मळकट मातकट रंगाचे असतात. या लांबुळक्या पायांचा उपयोग त्यांना दलदलीतुन, चिखलातून चालताना होतो. पाणकोंबडी भले पाणथळीत वावरणारा पाणपक्षी असला तरीही अजिबात उत्तम पोहू शकत नाही.
पाणकोंबडी पाणपक्षी असल्याने लहानसहान मासे, पाण्यातले किडे, गांडुळ आणी लहान गोगलगाय यावर ताव मारते. याच जोडीला पाणवनस्पतींची मुळं, धान्याच्या बियाही त्या फ़स्त करतात. हे पाणपक्षी एकटे किंवा जोडीजोडीनेच वावरताना दिसतात. आपल्या देशात बहुतांश भागात आढळणारा हा पक्षी अतिशय लाजरा नी सावध असतो. धोक्याची जराही चाहूल लागताच अतिशय वेगाने पाणकोंबडी सुस्साट वेगाने, डोकं खाली करून पळून जाते. सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत चपळपणे सतत फ़िरणारी ही पाणकोंबडी रात्री झुडुपांचा आसरा घेते. आकाराला साधारण ३०/३२ सेमी असलेली ही पाणकोंबडी वजनाला अगदी नगण्य म्हणजे २५०/३०० ग्राम्स एवढीच असते.
आपल्या देशात बहुतेक सर्वत्र हा पक्षी आढळत असल्याने विविध भाषांमधे याला अनेक नावे आहेत. अभ्यासक याला रेल [ Rallidae कुटुंबावरुन ] म्हणुनही उल्लेखतात. या कुटुंबातले अजुन काही प्रकार आपल्या देशात पहायला मिळतात. यांच्या भरपूर संख्येने होण्याऱ्या विणिने अजुनही पाणकोंबडी नामशेष नाही झाली हे नशिब. गावाकडे कधीमधी ह्या कोंबड्या पकडून खाल्ल्या जातात. दलद्लीचे प्रदेश, डबकी, गवताळ पाणथळी, तलाव अशा पाण्याच्या जागी सहज वावरताना दिसणाऱ्या ह्या पाणकोंबड्यांबद्दल विचार करून आपण निसर्गात सहज दिसणाऱ्या जिवांकडे पहायला हवय याची जाणिव करुन दिलीय.