कातकरी कुटुंबीय घरांच्या प्रतीक्षेत
तीन वर्षांपासून प्रलंबित : आदिवासी विकास
प्रकल्पाकडे दुर्लक्ष
आदिवासींना अपमानास्पद वागणूक
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील
सहा आदिवासी कातकरी कुटुंबांचे
संसार तब्बल तीन वर्षापासून
उघड्यावर आहेत. घरकुल योजनेचा लाभ
जव्हार आदिवासी विकास प्रकल्प
कार्यालयाकडून बहुउद्देशीय
सामाजिक शैक्षणिक संस्था जामसर
यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. परंतु
घरकुलांची कामे सलग तीन वर्षापासून अर्धवट
स्थितीत आहेत. त्यामुळे कातकरी कुटुंबांना उघड्यावर
वास्तव्य करावे लागत आहे. याबाबत वारंवार प्रकल्प
कार्यालयाशी संपर्क साधुनही प्रकल्प
कार्यालयातील कर्मचारी त्यांना कोणतीही दाद
देत नाहीत. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांकडे
एकनाथ पवार या बाधीत कुटुंबप्रमुखाने तक्रार दाखल
केली असून संस्थाचालक आणि आदिवासी विकास
प्रकल्प जव्हार यांची मिलिभगत असल्याचा आरोप
केला आहे.
मोखाडा तालुक्यातील सुनिता नवसु भोई
(खोडाळा), भाऊ बाबू पागी (डोल्हारा), एकनाथ
पवार (खोच), विष्णु काशिनाथ वाघ (खोच), गोपाळ
बाळु वळवी (पोरोरा), लक्ष्मण किसन
वळवी (पोरोरा) या सहा लाभार्थ्यांचीे घरकुले
तब्बल तीन वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहेत. सलग तीन
वर्षाचे उन्हाळे, पावसाळे आणि हिवाळे
या कुटुंबांनी दुसर्यांच्या पागोळ्याखाली काढलेले
आहेत. यातील विष्णु काशिनाथ वाघ
यांची पत्नी नुकतीच बाळंत झाली असून आज हे कुटुंब
नवजात बालकासह अक्षरश: वार्यावर गुजराण करीत
आहे. संस्थाचालक संतोष पडु भोये याने या घरकुलाचे पैसे
काढून घेतले असून आजमितीस तो फरार असल्याचे
या कुटुंबाचे म्हणणे आहे.
वास्तविक कोलम,
माडीया आणि कातकरी समाजाच्या शैक्षणिक
सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अतीदुर्बल
घटक म्हणून दारिद्रय़रेषेची अट शिथील करून शासनाने
विशेष सवलती प्रदान केलेल्या आहेत.