आपण या पृथ्वीचा एक अंश आहोत!

5 views
Skip to first unread message

चेतन Chetan

unread,
Sep 7, 2014, 1:29:53 PM9/7/14
to adi...@googlegroups.com, AYUSH Adivasi Yuva Shakti

आपण या पृथ्वीचा एक अंश आहोत!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/41885276.cms

पृथ्वीराज तौर

दर वर्षी ऑगस्टच्या तिस‍ऱ्या आठवड्यात रेड इंडियन आदिवासी १९व्या शतकातील आपले नेता सिएटल यांच्या स्मरणार्थ 'चिफ सिएटल डे' साजरा करतात. हा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी जणू पर्यावरण दिन असतो. सिएटल यांनी तत्कालिन वॉशिंग्टन सरकारला दिलेला संदेश आज आपण सर्वांनीच नीट लक्षात घेतला पाहिजे...


सिएटल. बहुतेकांच्या परिचयाचं अमेरिकेतील एक शहर. १९व्या शतकातील रेड इंडियन आदिवासी प्रमुखाच्या नावावरून या शहराला हे नाव दिलं गेलं. सिएटल हे वायव्य किना‍ऱ्यावरील आदिवासी टोळीचे प्रमुख होते. धाडसी योद्धा आणि दूरदृष्टी असणारा नेता म्हणून तरुण वयातच सिएटल यांना मान्यता मिळाली. विशाल अशा जनसमूहाला संबोधित करण्याची व खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या वक्तृत्वात होती. त्यांचा आवाजही मोठा होता. असं सांगतात की, पाऊण मैलावरच्या म्हणजे जवळ जवळ सव्वा किलोमीटर अंतरावर असणा‍ऱ्या श्रोत्यापर्यंत सिएटल यांचा आवाज थेट पोहचायचा.

अमेरिकेच्या इतिहासात एकोणिसाव्या शतकातील काळ अतिशय धामधुमीचा होता. गोरे अमेरिकन व स्थानिक रेड इंडियन यांच्यात सतत संघर्ष होत असे. गो‍ऱ्यांचं वसाहतवादी धोरण आणि अधिकाधिक जमीन मिळवण्याची त्यांची अभिलाषा यांना रेड इंडियन खीळ घालत असत. छोट्या मोठ्या लढाया होत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह मैदानात उतरलेल्या गो‍ऱ्यांकडून रेड इंडियन मारले जात. त्या काळात सिएटल यांनी शांतता, सलोखा आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी पावलं उचलली. सन १८५३च्या मागेपुढे वॉशिंग्टन सरकारचे गव्हर्नर आयझॅक स्टिव्हन्स आणि सिएटल यांची भेट झाली. रेल्वे रुळ बांधण्यासाठी व इतर शासकीय गरजांसाठी वॉशिंग्टन सरकारने रेड इंडियनांकडून जमिनीची मागणी केली होती. गव्हर्नरने जमीन खरेदी करण्याची तयारी दाखवली. आपण जमीन दिली नाही, तरी गोरे लोक बंदुकीच्या बळावर आपली जमीन हिसकावून घेतील हे सिएटल यांना आपल्या पूर्वानुभवांवरून ठाऊक होतं. या पार्श्‍वभूमीवर ११ मार्च १८५४ रोजी गव्हर्नर आयझॅक स्टिव्हन्सन यांनी आयोजित केलेल्या सभेला रेड इंडियन आदिवासी टोळीप्रमुख म्हणून सिएटल यांनी संबोधित केलं. त्यावेळी सिएटल यांनी दिलेला संदेश पर्यावरणाच्या दृष्टीने आज १६० वर्षानंतरही तेवढाच महत्त्वाचा आणि सर्वांच्याच डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.

मूळ संदेश सिएटल यांनी 'लुशोटसिड' या आपल्या बोलीभाषेत जनसमूहासमोर मांडला. त्याचवेळी तत्कालीन समाजाच्या 'चिनूक जॉरगन' या व्यवहारभाषेत त्याचा अनुवाद ऐकवला गेला. १८५३-५४ साली शिक्षणाचं कार्य करण्यासाठी त्या परिसरात गेलेल्या डॉ. हेन्री स्मिथ यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचला. पुढे ३३ वर्षानंतर सन १८८७ साली सिएटलच्या संदेशाचं इंग्रजी भाषांतर डॉ. स्मिथ यांनी 'संडे स्टार'मध्ये प्रकाशित केलं. सन १८९१मध्ये प्रकाशित झालेल्या फ्रेडरिक जेम्स ग्रांट लिखित 'हिस्ट्री ऑफ सिएटल' या ग्रंथात तो पुनर्मुद्रित करण्यात आला. नंतरच्या काळात १९२९, १९३१ आणि १९६० साली प्रकाशित झालेल्या विविध पुस्तकांमधून सिएटलचा हा संदेश प्रकाशित होत राहिला.

दरम्यान १९३२ साली जॉन रिच यांनी एका पॅम्पलेटवरती सिएटल यांचं हे भाषण छापलं आणि सर्वदूर पोहचवलं. हा संदेश प्रकाशित करत असताना बहुतेक अनुवादक व प्रकाशकांनी त्यात स्वतःचं काहीएक मिसळलं. त्यामुळे या संदेशाच्या थोड्याफार फरकाच्या अनेक आवृत्त्या आज उपलब्ध आहेत. १९७० नंतर प्रारंभ झालेल्या पर्यावरणवादी चळवळींनी या संदेशाचा जगभर विस्तार केला. सिएटल यांच्या या संदेशाला लोकभाषेची लय आहे. तो काव्यात्म आहे. काळजावर कोरून ठेवावीत अशी अनेक वचनं त्यात सहज आलेली आहेत. हा संदेश पर्यावरणीय मूल्य जगभर रुजवण्यास आणि आपलं आपल्या जमिनीवर प्रेम वाढवण्यासही साहाय्यभूत ठरणारा आहे.

सिएटल यांचं ७ जून, १८६६ साली निधन झालं. इ.एम. सम्मीस यांनी १८६५ साली क्ल‌िक केलेलं सिएटल यांचं एक छायाचित्र आणि हा संदेश तेवढाच आता शिल्लक आहे-

'हे आभाळ तुम्ही विकत तरी कसं घेणार ?

पाऊस आणि वाहत्या वा‍ऱ्याचे मालक तुम्ही कसे होऊ शकता ?

माझी आई सांगायची-

या मातीचा प्रत्येक कण आमच्या माणसांसाठी पवित्र आहे,

झाडाचं एकेक पान, वाळूचे सगळे किनारे,

धुक्यात वेढली गेलेली जंगलं,

ही गवताची मैदानं,

किड्यांचं आणि भुंग्यांचं गुणगुणणं

हे सगळं आम्हाला पवित्र आहे

ते आमच्या लोकांच्या स्मृतींशी गुंफलेलं आहे.

माझे वडील सांगायचे -

की झाडांमधून वाहणारा रस मला शिरांमधून वाहणाऱ्या रक्ताइतकाच परिचीतय्,

आपण या पृथ्वीचा एक अंश आहोत

आणि ही जमीन आपलंच एक अंग आहे.

ही सुगंधी फुलं आमच्या बहिणी आहेत.

ही हरणं,

हे घोडे,

हे गरुड,

हे सगळे आमचे भाऊ आहेत.

पर्वतांची शिखरं,

पठारांवरची हरळी

आणि घोड्यांचे शिंगरू आम्ही एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत.

माझ्या पूर्वजांचा आवाज मला सांगतो -

की नद्यांमधून आणि झऱ्यांमधून प्रवाहीत होणारं हे पाणी,

केवळ पाणीच नाहीय.

तर माझ्या पूर्वजांचं रक्तय्,

या पाण्यातील प्रत्येक प्रतिबिंबामध्ये

माझ्या पूर्वजांच्या गाथा आणि आठवणी लपलेल्या आहेत.

या निर्झरांच्या खळखळाटात

मला ऐकू येतो माझ्या पणजीचा आवाज -

या नद्या आमच्या जीवनसंग‌िनी आहेत

त्या आमची तहान भागवतात

त्यांच्या लाटांवर खेळतात आमच्या छोट्या छोट्या होड्या

आणि त्या आमच्या बाळांचं भरण पोषण करतात

नि म्हणून,

या नद्यांवर तितकंच प्रेम कर

जितकं सख्ख्या भावावर करतोस.

माझ्या आजोबांनी मला सांगितलं -

ही हवा अनमोल आहे.

ही हवा सगळ्या सजीवांचं पोषण करते

आणि आम्हाला आमचा आत्मा देते.

या हवेनंच दिला मला माझा श्‍वास,

पहिला आणि शेवटचाही.

तू या जमिनीला पवित्र ठेव,

या हवेला पवित्र ठेव,

जेणेकरून सुगंधाचा अनुभव आणि आनंद घेता येईल.

जेव्हा अखेरचे रेड इंडियन स्त्री-पुरुष या जंगली संपदेसोबत लुप्त होतील,

तेव्हा या हिरव्या पठारावर ढगाच्या एखाद्या तुकड्यासारखी त्यांची आठवण धूरकट होत जाईल.

तोपर्यंत नदीचे किनारे

आणि ही जंगलं शिल्लक राहतील का ?

मरून गेलेल्या माझ्या लोकांचे आत्मे तोपर्यंत जिवंत राहतील का ?

माझ्या पूर्वजांनी मला सांगितलं -

की, आपण या पृथ्वीचे मालक नाही आहोत,

आपण या भूमीचे केवळ एक अंग आहोत...


--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages