सुयोग्य विचारांच्या दिशेनं

5 views
Skip to first unread message

चेतन Chetan

unread,
Apr 30, 2014, 3:02:25 AM4/30/14
to adi...@googlegroups.com

सुयोग्य विचारांच्या दिशेनं

डॉ. वैशाली देशमुख

किशोरवयात स्वतःमध्ये विकसित होत असणाऱ्या अनेक कौशल्यांपैकी एक म्हणजे क्रिटिकल आणि क्रिएटिव्ह थिंकिंग. ज्याला सारासार विचार करण्याचं कौशल्य असं म्हणता येईल.

मेंदूचं सॉफ्टवेअर किशोरवयात फाइनट्यून होत असत. या विकसित होत असणाऱ्या अनेक कौशल्यांपैकी एक म्हणजे क्रिटिकल आणि क्रिएटिव्ह थिंकिंग. ज्याला सारासार विचार करण्याचं कौशल्य असं म्हणता येईल. आजच्या किशोरांना पावलोपावली असा विचार करण्याची गरज भासते. विशेषतः माध्यमांशी डील करताना ही गरज जास्त जाणवते. माध्यमं उपयुक्त आहेत, आवश्यक आहेत, सर्वव्यापी आहेत. या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. पण ती काहीशी बेबंद झाली आहेत. मुख्य म्हणजे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. आपल्या वाढत्या वयाच्या मुलांना माध्यमांपासून दूर ठेवणं अवघडच नाही, तर अशक्य आहे. ते प्रॅक्टिकलही नाही. माध्यमांसह मित्रमैत्रिणींचा दबाव, व्यसनं, करिअर प्लॅनिंग, नाती जपणं अशा किती तरी आव्हानांना तोंड देताना ही विचारपद्धती उपयोगी पडते. ही आव्हानं आजच्या जीवनांचा अपरिहार्य भाग झाली आहेत. त्यांना तोंड द्यायला जे काही मर्यादित पर्याय आपल्याकडे आहेत, त्यातला एक म्हणजे बरं-वाईट, योग्य-अयोग्य काय याचा निवाडा करण्याचा विवेक मुलांना शिकवणं. कुठल्याही गोष्टीकडं डोळे उघडे ठेवून कसं पाहावं, फेस व्हॅल्यूवरच कसं जाऊ नये, रिअल लाइफ आणि रील लाइफ यातला फरक कसा ओळखावा, हे कळणं जगण्याच्या प्रत्येकबाबतीत उपयोगी पडतं. मुलांना घोकंपट्टी करण्याऐवजी सारासार विचार करायला शिकवलं पाहिजे. उदा. शिवाजी महाराजांचा जन्म किती तारखेला झाला, असं विचारण्याऐवजी त्यांचा जन्म झाला नसता, तर तर इतिहास कसा बदलला असता, त्यांच्या आईच्या मनात शिवाजी महाराजांबाबत काय विचार आले असतील, असे प्रश्न मुलांना विचार करण्यास उद्युक्त करतात. अशीच समोर काहीच पर्याय उरलेला नसताना आपल्या एका समस्येतून मार्ग काढणाऱ्या चतुर मुलीची एक गोष्ट सांगते, एका व्यापाऱ्याला त्याच्या भल्या मोठ्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडता येईना. सावकार सारख्या जप्तीच्या नोटिसा देत होता. खरं तर सावकाराची नजर व्यापाऱ्याच्या तरुण मुलीवर होती. एके दिवशी सावकार त्या व्यापाऱ्याला म्हणाला, 'मी तुला कर्ज माफ करेन. पण माझ्या काही अटी मान्य कर. मी एका पिशवीत काळा आणि पांढरा दगड घेईन. त्यातून तुझ्या मुलीनं एक दगड न पाहता निवडायचा. तिनं जर काळा दगड उचलला तर तिला माझ्याशी लग्न करावं लागले. पण तिनं पांढरा दगड उचलला तर कोणतीही अट न घालता मी तुझे कर्ज माफ करेन. ही गोष्ट करायला तू नकार दिलास, तर आजच मी घरादारावर जप्ती आणेन.' आपल्या मुलीवर व्यापाऱ्याचा फार जीव होता. त्यामुळे सावकाराच्या मागणीला तिने मान्य करावे, हे त्याला रुचेना. पण व्यापाऱ्याची मुलगी धीट होती. बाबांना धीर देऊन ती पुढे आली.

दरम्यान सावकाराने वाळूतले दोन काळे दगड पिशवीत टाकल्याचे तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते. तिनं पिशवीतला एक दगड उचलला आणि कोणाच्याही लक्षात येण्याआधी तो चुकून खाली पाडला. मग गोड हसून ती सावकाराला म्हणाली, 'काही हरकत नाही. तुमच्या हातात कोणता दगड राहिला आहे ते पाहूया, म्हणजे मग मी कोणत्या रंगाचा दगड घेतला होता ते समजेल.' तिनं पिशवीतला दगड पाहिला आणि म्हणाली, ' पिशवीत काळा दगड आहे, म्हणजे मी पांढरा दगड उचलला असणार. थँक्स. माझ्या बाबांची सुटका केल्याबद्दल.' सावकाराचा डाव त्याच्यावरच उलटला होता. या मुलीनं जसा सारासार विचार केला आणि ती धाडसानं समोर आलेल्या प्रसंगाला सामोरी गेली, तसा सारासार विचार करता यायला हवा.


--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages