आदिवासी विकास खात्यातील निधीला भ्रष्टाचाराची पालवी
राज्याच्या दुर्गम भागातील आदिवासींच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या आदिवासी विकास खात्याकडे प्रचंड निधी असून इतर खात्यातून येथे प्रतिनियुक्तीवर आलेले ९९ टक्के अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहे. यामुळे आदिवासी विकास खाते ही अधिकाऱ्यांच्या दृष्टीने भ्रष्टाचारांची गंगा झाली आहे. असे असले तरी अन्य खात्यातून आदिवासी विकास खात्यात प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचे 'इन्कमिंग' सुरूच असून अमरावती, नाशिकला नुकतेच दोन अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर नेमण्यात आले आहे.
आदिवासी विकास खात्याकडील निधीतून आदिवासींचा किती विकास झाला, हा वादाचा मुद्दा असला तरी या निधीला भ्रष्टाचाराची पालवी मात्र सतत फुटतच राहिलेली आहे. आदिवासींच्या विकासाचे प्रश्न जलदगतीने मार्गी लागावे म्हणून शरद पवार मुख्यमंत्री असताना या खात्यात अतिरिक्त आयुक्तपदावर भारतीय प्रशासकीय व वनसेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे या खात्यात प्रतिनियुक्तींची दारे उघडी झाली. नेमका त्याचाच फायदा घेऊन इतर खात्यातील अनेक अधिकारी या मलईदार खात्यात येऊन गैरव्यवहार करीत असल्याचे वारंवार निष्पन्न झाले आहे. १९९६ पासून आतापर्यंत या खात्यात प्रतिनियुक्तीवर आलेले ९९ टक्के अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले. काही दिवसांपूर्वी अमरावतीचे अतिरिक्त आयुक्त एस.झेड. वाळिंबे यांना ९० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. नंतरच्या झडतीत त्यांच्याकडे कोटय़वधीची बेहिशेबी मालमत्ता सापडली. वाळिंबे वनखात्याचे अधिकारी होते. प्रतिनियुक्तीवर ते या खात्यात आले. या घटनेनंतर आता प्रतिनियुक्ती बंद करा, अशी मागणी खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा दोन अधिकाऱ्यांना या खात्यात प्रतिनियुक्तीवर धाडले आहे.
विशेष म्हणजे, ज्या अमरावतीत लाचखोरीचा प्रकार घडला तेथे मंत्रालयात उपसचिव असलेल्या एका अधिकाऱ्याला प्रतिनियुक्ती दिली आहे. कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालय संवर्गात नोकरीत लागलेला हा अधिकारी उपजिल्हाधिकारी दर्जाचासुद्धा नाही. त्याला थेट अतिरिक्त आयुक्त करण्यात आले आहे. दुसरा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकच्या अतिरिक्त आयुक्तपदी कृषी खात्यात सहसंचालक असलेल्या एका अधिकाऱ्याला नेमण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, आदिवासी विकास खात्यातील अतिरिक्त आयुक्त दर्जाची पदे प्रशासकियव वनसेवेतील अधिकाऱ्यांनाच देण्यात यावी, असा शासनाचा नियम आहे. त्याला बगल देऊन इतर खात्यातील अधिकाऱ्यांचे 'इन्कमिंग' या खात्यात सुरू झाले आहे. आदिवासी विकासाशी संबंधित अनुभव किंवा दुर्गम भागातील माहिती किंवा काम केल्याचा अनुभव एखाद्या अधिकाऱ्याला असेल तर त्याला प्रतिनियुक्ती देणे एक वेळ समजू शकेल. मात्र, तसा कोणतीही अनुभव नसताना या अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे.
पदोन्नतीची फाइल मंत्रालयातच
आदिवासी विकास खात्यातील अनेक अधिकारी आयुक्त दर्जाच्या पदोन्नतीसाठी पात्र आहेत. मात्र, त्यांच्या विभागीय पदोन्नतीची फाईल मंत्रालयात गेल्या अनेक वर्षांंपासून धूळखात पडली आहे. प्रतिनियुक्ती करता यावी, यासाठीच ती फाईल अडवून धरण्यात आली आहे, असा अधिकारी संघटनेचा आरोप आहे.
http://www.loksatta.com/maharashtra-news/99-percent-tribal-department-officials-involved-corruption-895902/