नंदुरबार : महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या चारही राज्यांतील आदिवासी बहुल असलेल्या भागातून स्वतंत्र आदिवासी राज्य निर्मितीच्या मागणीला पुन्हा जोर आला आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त जवळपास सर्वच भागातील संघटनांनी आपल्या मागण्यांमध्ये या मागणीच्या ठरावाला प्राधान्य दिल्याने हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चारही राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. विशेषत: एका विशिष्ट पट्टय़ात आदिवासी बहुल लोकसंख्येचा परिसर विस्तारला आहे. या चारही राज्यातील आदिवासींमध्ये सांस्कृतिक साधम्र्य आहे. विविध प्रथा, परंपरा, संस्कृती एक असल्याने चारही राज्यातील आदिवासी संघटनांचा चांगला मिलाप झाला आहे. आदिवासी एकता परिषदेच्या महासंमेलनात या चारही राज्यातील आदिवासी एकत्र येऊन संस्कृतीचा जागर करतात. त्यातून एकतेचेही प्रदर्शन घडते. या परिसरातील आदिवासींचा विकास अपेक्षितपणे झाला नसल्याने समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हा भाग काहीसा वेगळा राहिल्याची भावना या जनमानसात आहे. याच पाश्र्वभूमीवर आपले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आणि विकासाची निश्चित दिशा आखण्यासाठी स्वतंत्र आदिवासी राज्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. विशेषत: सन 2000 मध्ये झालेल्या आदिवासी महासंमेलनात त्याचा ठरावही झाला. तेव्हापासून हा विषय चर्चेत आला आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त सर्वच ठिकाणी मेळावे, सभा झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात गुजरात आणि मध्य प्रदेशातील पदाधिकारीही उपस्थित होते. विशेषत: नंदुरबार, अक्कलकुवा आणि धडगावमध्ये समारंभ झाले. त्यात आदिवासी राज्याची मागणी अधिक प्रभावीपणे झाली. नुकतेच तेलंगणा राज्याच्या निर्मितीची घोषणा झाल्याने आदिवासी संघटनांनी स्वतंत्र आदिवासी राज्य निर्मितीच्या मागणीसाठी कंबर कसली असून त्याबाबत आंदोलनाची भूमिकाही स्वीकारली आहे. दुसरीकडे चोपडा येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगदीश वळवी यांनीही आदिवासींसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करुन सरकारला घरचा अहरे दिला हाता. आदिवासी राज्याचा नवा नकाशा 4आदिवासी महासंमेलनाने मागणी केलेल्या आदिवासी राज्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चारही राज्यातील 27 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि ठाणे या चार जिल्ह्यांसह राजस्थानमधील भिलवाडा, चितोडगड, उदयपूर, सिरोही, बनासकाठा, झालावाड, सांबरकाठा, राजगड, मध्य प्रदेशातील रतलाम, साजापूर, झाबुआ, उज्जैन, इंदूर, धार, पश्चिम निमाड, पंचमहल तर गुजरातमधील बडोदा, भरुच, सुरत, दमण, सिल्वासा, बलसाड, डांग या जिल्ह्यांचा समावेश आहे. |