होली / शिमगा : आंबा खाने, पापड्या / धिंडऱ्या खाया चला घरा जाव!
सिमगट सिमगट टोटेरा आज त आमचे कनेरा … भल भलय !!!
Happy Shimga & Holi, shimgat Shimgat totera
आपल्या भारतात सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारताच्या सर्वच प्रदेशात सणांचे आगळेवेगळे वैशिष्टपुर्ण रुप आपणांस पहावयास मिळते.प्रत्येक प्रदेशाच्या चालीरीती,भाषा,तेथील संस्कृती यांनुसार सण साजरे करण्याच्या पद्धतीही भिन्न भिन्न आहेत. येथील सणांच्या मांदीयाळीतील एक वैशिष्टपुर्ण सण म्ह्णजे "होळी". हा सण फार पुर्वीपासूनच मोठया आनंदात अनं उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात तर ह्या सणाला मोठया उत्सवाप्रमाणे साजरा करतात. ग्रामीण भागात तर "एक गाव एक होळी" अशीच प्रथा आजपण आहे. होळी पेटविण्याच्या निमित्ताने सर्व गावाने एकत्र यावे हा यामागचा मुख्य हेतु. होळीची एक मजेशीर गंमत आहे बघा! इतर सणांना आपण मंगलमय वातावरण तयार करत असतो पण या सणाला चक्क होळीच्या भोवती फ़िरुन सर्वजण बोंब मारत असतात. हे करण्यामागचा एकच उद्देश की होळी हा सण समाजातील वाईट प्रवृत्ती आणि दुर्गुंण नाश करण्यासाठी असतो. अमंगल ते जाळायचं आणि अनिष्ट अशा गोष्टींच्या नावानं बोंब ठोकायची.
आदिवासी संस्कृतीत तर हा सण अगदी छानश्या पद्धतीने साजरा केला जातो. लहान होळी आणि मोठी होळी अश्या दोन टप्यात हा सण साजरा केला जातो. लहान होळीच्या दिवशी पाड्यातली लहान मुले एकत्र येऊन लहान लहान सुकलेली लाकडे गोळा करून लहानशी होळी करून तिच्याभोवती नाचतात. म्हणूनच बहुतेक याला लहान होळी असे म्हणतात. ह्या दिवशी तांदळाच्या पापड्या करतात अनं उन्हात सुकत घालतात. नंतर त्या पापड्या घरात ठेवल्या जातात.लहान होळीच्या आदल्या दिवशी घरातले सगळेजण एकत्र बसून आंबा खातात, याला आंबा खाणे असे म्हणतात, या नंतर सगळे जण औपचारिकतेने आंबा खायला सुरवात करतात. दुसऱ्या दिवशी मोठ्या होळीला गावातील सगळी माणसे वाळलेली लाकडे गोळा करतात.गावातील सगळी माणसे एकत्र जमल्यानंतर पूजेला सुरवात होते, होळीची पुजा गावातील भगतांकडून केली जाते. गावकरी घरी बनविलेले तांदळाचे पापड नवेद म्हणुन घेऊन येतात. पूजा झाल्यावर होळीला अग्नी दिला जातो. असे मानले जाते की वाईट प्रथा आणि वाईट सवयींचे होळीत दहन केले जाते.
अजुन एक छानशी रीत ह्या सणाच्या निमित्ताने असते ती अशी की ह्या वर्षी नवीन लग्न झालेले दांम्पत्य होळी भोवती गोल गोल नाचतात. होळीच्या सुरवातीस अर्पण केलेले नारळ अग्नी मुळे भाजून बाहेर येतात, ते गरम नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. पारंपारीक गाणी म्हटली जातात. आणि त्यानंतर सगळे जण आपल्या घरी परतून पापड्या टाळायला सुरवात करतात. होळीच्या दिवशी तयार केलेल्या पापड्यांना ह्या दिवशी विशेष महत्व असते त्यामुळे प्रत्येक घरात त्या बनविल्या जातात, इतर ठिकाणी धिंडऱ्या, भाकरी इत्यादी बनविले जाते. लहान होळीच्या दिवशी शिमगा खेळला जातो, एकमेकांच्या अंगावर पाणी/भेंडीचा रंग लावला जातो. त्या दिवशी गावातील काही लोक सोंग घेऊन, वेग वेगळे रूप घेऊन, नाच करून पोसत / फगवा गोळा करतात आणि त्यानंतर एकत्र बसून मेजवानी केली जाते. शिमग्याच्या दिवशी अशी प्रथा आहे की शेजाऱ्यांची एखादी वस्तू लपवायची, प्राथमिकता कोंबडा लपवण्यास दिला जातो, म्हणून ह्या लहान होळीला ’कोंबड होळी’ असेही म्हटले जाते. लहान मुलांना विविध नाच आणि सोंगकरण्या साठी एक प्रकारची पर्वणीच असते.
आपल्याकडे होळीला उत्तरभारतासारखे रंग खेळले जात नाहीत. त्याऎवजी सिमगा खेळला जातो.
रंगपंचमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जीवनातले वाईट रंग झटकून देवून नवीन उमेदीच्या रंगाने रंगून जावे तसेच एकमेकांमधील व्देषाचा रंग घालवून परत एकदा एकमेकांना प्रेमाच्या, आपुलकीच्या,मैत्रीच्या रंगात रंगवावे हाच या मागचा उद्देश. आपलॆ हॆ पुर्वापार चालत आलेले सण,उत्सव प्रत्येक सणांमागील विविधपद्दती आपण जपल्या पाहिजेत. आधुनिकीकरणाच्या या युगात आपल्या उत्सवांचा तोच थाट, तीच शैली आपण जपली पाहिजे. अनं हे उत्सव किती मंगलमय वातावरणात सर्वांच्या सोबतीने आपण साजरे करु यांकडे लक्ष पुरविले पाहिजे.
पण हे सर्व करत असतांना काही महत्वाच्या बाबींकडॆ ही आपण लक्ष दिले पाहिजे. जसे की,होळीच्या निमित्ताने दरवर्षी बेसुमार वृक्षतोड केली जाते. आपल्या काही क्षणांच्या आनंदासाठी कितीतरी वृक्षांचा आपण बळी देत असतो ही वृक्षतोड थांबवून आपण होळीसाठी वाळ्लेली लाकडॆ वापरली पाहिजॆत.’एक गाव एक होळी’ यांसारख्या संकल्पना रुजविल्या पाहिजेत.जेणेकरुन एकाच गावात अनेक होळ्या साजऱ्या करतांना वापरली जाणारे लाकडे वाचतील. रंगपंचमी ह्यासारख्या सणांना रंग खेळायला हरकत नाही पण रंगामुळे डोळे,कान,नाक यांना अपाय होत असेल तर तो रंगांचा बेरंग नाही का? रंगातल्या रसायनांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते क्वचित अंधत्व येऊ शकतं त्वचेचा आजारही जडू शकतो.हे सर्व टाळण्यासाठी कृत्रिम रंगाऎवजी नैसर्गिक रंग वापरले पाहिजेत.
आपण जर अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर आपल्या आनंदाला कुठेही गालबोट लागणार नाही आणि आपण आपले सणवार अशाच मोठ्या उत्सहात, दिमाखात साजरे करु शकू. अश्याच आनंदमय अन मांगल्यमय वातावरणात यंदाचा शिमगा आदिवासी परंपरा नी साजरी करून पर्यावरण जतन करून साजरी करण्यासाठी आम्ही आयुशच्या वतीने प्रयत्न करत आहोत.
मग देणार ना साथ?