मराठी अनुवादकांच्या या इ-कट्ट्यावर आपले स्वागत आहे.
साहित्याचा अनुवाद, तांत्रिक भाषांतर, यंत्रसिद्ध भाषांतर (मशीन ट्रान्स्लेशन) अशा विविध विषयांत रस असलेल्या
व्यावसायिक व हौशी अनुवादकांना एकत्र आणून त्यांच्यात अनुवादविषयक
विचारांचे आदानप्रदान घडवून आणावे हा या कट्ट्याच्या निर्मितीमागील उद्देश
आहे. शिवाय, हा कट्टा आंतरजालावर असल्याने, सदस्यांना फारसा वेळ व श्रम
खर्च न करता इतर अनुवादकांपर्यंत पोहोचता येईल व त्यांच्यातील चर्चेला गती
प्राप्त होईल हेही महत्त्वाचे.
या कट्ट्यावर आपण पुढील स्वरूपाची पत्रे पाठवू शकता-
१. अडलेल्या शब्दांची/वाक्यांची भाषांतरे सुचवण्याची विनंती.
२. स्रोत संहितेतले न कळलेले शब्द, सांस्कृतिक संदर्भ यांचे अर्थ वा यांबद्दल अधिक माहिती पाठवण्याची विनंती.
३. अनुवादकांसाठीच्या कार्यशाळा, अनुवादकांनी चालवलेल्या अनुदिनी, अनुवादासंबंधीची पुस्तके, शब्दकोश यांबद्दलची माहिती.
४. अनुवादप्रक्रियेचा एखादा पैलू, अनुवादनातील एखादी विशिष्ट समस्या (उदा.
विशेष नामांचे भाषांतर वा लिप्यंतर) यांविषयीचे विचार व त्यावर अधिक चर्चा करण्याचे आवाहन.
५. एखाद्या प्रकाशित अनुवादाचे परीक्षण वा त्यावरील मते.
अनुवादासारख्या रोचक विषयावर आपल्याकडे बोलण्यासारखे खूप असेल हे नक्की; पण या कट्ट्यावर पत्रे पाठवताना आपल्या पत्रांचा विषय या कट्ट्याच्या उद्देशाशी सुसंगत असावा व पत्रातील भाषा सभ्य असावी अशी अपेक्षा आहे याचे कृपया भान ठेवा. असंबद्ध विषयांवरची व अशिष्ट भाषेतील पत्रे इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नाकारली जातील याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी.
पुन्हा एकदा, या व्यासपीठावर आपले स्वागत आहे व आपण येथे उत्साहाने भाग घ्याल अशी आशा आहे.